‘सीआयए’ने गुप्तपणे अमेरिकन्सचा डाटा जमा केल्याचा आरोप

‘सीआयए’नेवॉशिंग्टन – अमेरिकेची केंद्रीय गुप्तचर यंत्रणा ‘सीआयए’ने सिनेटला विश्‍वासात न घेता, अमेरिकन जनतेची माहिती जमा केली आहे. ही सर्व माहिती सीआयएने एका प्रोग्राममध्ये साठविल्याचा आरोप सत्ताधारी डेमोक्रॅट्स पक्षाच्याच वरिष्ठ सिनेटर्सनी केला. सीआयए व ‘नॅशनल सिक्युरिटी एजन्सी-एनएसए’ यामध्ये सहभागी आहे, असे दावे अमेरिकन सिनेटच्या ‘इंटेलिजन्स कमिटी’चे सदस्य रॉन वेडन आणि मार्टीन हेन्रीच यांनी केले आहेत.

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात सिनेटर वेडन आणि सिनेटर हेन्रीच यांनी सीआयएच्या या ‘सिक्रेट प्रोग्राम’ची माहिती उघड करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. गेली काही वर्षे सीआयए आणि एनएसए अमेरिकन जनतेची माहिती जमा करून एका प्रोग्राममध्ये जमा करीत आहेत. यासाठी सदर यंत्रणा दहशतवादविरोधी कारवाईचे कारण देत असल्याचे वेडन आणि हेन्रीच यांनी म्हटले आहे.

डेमोक्रॅट पक्षाच्या या दोन्ही सिनेटर्सनी यासाठी राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेचे अध्यक्ष एव्रील हेन्स आणि सीआयएचे प्रमुख विल्यम बर्न्स यांना पत्र पाठवून यावर चिंता व्यक्त केली होती. एप्रिल महिन्यात पाठविलेले सदर पत्र आणि सीआयएची काही कागदपत्रे गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर सीआयएच्या या गोपनीय कारवाईची माहिती उघड झाली.

‘सीआयए’नेसीआयए आणि एनएसए, या दोन्ही संस्था परदेशी मोहिमांसाठी उभारल्या आहेत. नियमानुसार त्यांचा वापर देशांतर्गत कारवायांसाठी केला जाऊ शकत नाही. आपल्या देशाच्या जनतेच्या हितसंबंधांची सुरक्षा करणे, ही या यंत्रणांची जबाबदारी आहे. असे असताना दोन्ही यंत्रणांनी अमेरिकन जनतेवर पाळत ठेवली आणि त्यांची परदेशी व्यक्तींशी झालेली संभाषणे जमा केल्याचा ठपका सिनेटर वेडन आणि हेन्रीच यांनी ठेवला.

गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या या पत्रामध्ये, सीआयए किती वर्षांपासून अमेरिकन जनतेची माहिती गोळा करीत आहे, कोणते तपशील जमा केले, याचे तपशील देण्यात आलेले नाहीत. पण सीआयएने जमा केलेली ही माहिती अमेरिकन सिनेटपासूनही दडवून ठेवल्याचा आरोप सिनेटर वेडन आणि सिनेटर हेन्रीच यांनी केला.

सीआयएची ही कारवाई, अमेरिकन जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करणारी आणि अमेरिकी नियमांचे उल्लंघन करणारी ठरते, अशी टीका या सिनेटर्सनी केली. साधारण दशकभरापूर्वी, २०१३ साली सिनेटर वेडन यांनी नॅशनल इंटेलिजन्सचे तत्कालिन प्रमुख जेम्स क्लॅपर यांच्यासमोर एनएसएबाबत प्रश्‍न केला होता. एनएसएने लाखो अमेरिकी नागरिकांची माहिती जमा केली आहे का? असा साल वेडन यांनी केला होता. त्यावेळी क्लॅपर यांनी त्याला नकारार्थी उत्तर दिले होते.

मात्र काही काळानंतर सिनेटच्या इंटेलिजन्स कमिटीसमोरच्या सुनावणीत क्लॅपर यांनी सिनेटर वेडन यांना आपण चुकीची माहिती दिल्याची कबुली दिली होती. त्यामुळे सीआयए आणि एनएसए या दोन्ही संस्था कुठल्याही परवानगीशिवाय अमेरिकन नागरिकांची माहिती जमा करीत असल्याच्या आरोपांना बळ मिळाले होते. जेम्स क्लॅपर हे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात नॅशनल इंटेलिजन्सचे प्रमुख होते.

leave a reply