बेलारूसमधील रशियन अण्वस्त्रांच्या तैनातीवरून संयुक्त राष्ट्रसंघामध्ये रणकंदन

संयुक्त राष्ट्रसंघ – युक्रेनला सीमा भिडलेल्या बेलारूसमध्ये अण्वस्त्रे तैनात करण्याची तयारी रशियाने केली आहे. याचे तीव्र पडसाद संयुक्त राष्ट्रसंघात उमटले. युक्रेन व अमेरिकेने यावर गंभीर चिंता व्यक्त केली. रशिया आण्विक विनाशाचे दडपण टाकून युक्रेमधील आपला पराभव टाळण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. चीनने यासंदर्भात रशियावर थेट टीका करण्याचे टाळले असले तरी अण्वस्त्रप्रसारबंदीच्या नियमांचे सर्वच देशांनी पालन करावे, असे सांगून आपली नाराजी व्यक्त केली आहे. तर संयुक्त राष्ट्रसंघातील बेलारूसच्या राजदूतांनी रशियन अण्वस्त्रांची तैनाती आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी अत्यावशक असल्याचा दावा केला. रशियाचे राजदूत व्हॅसिली नेबेन्झिया यांनी अमेरिकेने नाटोच्या सदस्यदेशांमध्ये तैनात केलेल्या अण्वस्त्रांचे काय? असा सवाल करून अमेरिकाच अण्वस्त्रप्रसारबंदीचे उल्लंघन करीत असल्याचा ठपका ठेवला आहे.

बेलारूसमधील रशियन अण्वस्त्रांच्या तैनातीवरून संयुक्त राष्ट्रसंघामध्ये रणकंदन25 मार्च रोजी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी बेलारूसमध्ये रशियन अण्वस्त्रे तेनात करण्याची घोषणा केली होती. यामुळे युरोपिय देशांमध्ये खळबळ माजली. विशेषतः युक्रेनने यावर आगपाखड सुरू केली होती. युक्रेनच्या संयुक्त राष्ट्रसंघातील राजदूतांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांना दिलेला शब्द मोडला, असा आरोप केला. राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या रशिया भेटीत संयुक्त निवेदनात राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी अण्वस्त्रधारी देशांनी दुसऱ्या देशात अण्वस्त्रे तैनात करू नये, असे आवाहन केले होते. पण अवघ्या चार दिवसातच पुतिन यांनी बेलारूसमध्ये अण्वस्त्रे तैनात करण्याची घोषणा केली, असा ठपका युक्रेनच्या राजदूतांनी ठेवला. रशियाच्या या निर्णयावर चीनने नाराजी व्यक्त केली आहे, याकडे लक्ष वेधून युक्रेनच्या राजदूतांनी त्यावर समाधान व्यक्त केले आहे.

मात्र बेलारूसचे संयुक्त राष्ट्रसंघातील राजदूत व्हॅलेंटाईन रेबाकोव्ह यांनी सध्याच्या स्थितीत आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने रशियन अण्वस्त्रांची तैनाती करण्यात येत असल्याचे सांगून याचे समर्थन केले. तसेच नाटोचे सदस्य असलेल्या देशांनी लष्करी हालचालींमध्ये वाढ केल्यानेच ही परिस्थिती उद्भवली, असा ठपका रेबाकोव्ह यांनी ठेवला. तर रशियाचे राजदूत व्हॅसिली नेबेन्झिया यांनी रशिया बेलारूसमध्ये अण्वस्त्रे नाही तर ‘टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स’ तैनात करीत असल्याचे स्पष्ट केले. यामुळे अण्वस्त्रप्रसारबंदी कायद्याचे उल्लंघन होत नसल्याचा दावा देखील रशियन राजदूतांनी केला. बेलारूसमधील रशियन अण्वस्त्रांच्या तैनातीवरून संयुक्त राष्ट्रसंघामध्ये रणकंदनत्याचवेळी अमेरिकेने नाटो सदस्यदेशांमध्ये अण्वस्त्रे तैनात केली आहेत, याकडे लक्ष वेधून अमेरिका हाच अण्वस्त्रप्रसारबंदीचे उल्लंघन करणारा देश असल्याचा आरोप राजदूत व्हॅसिली नेबेन्झिया यांनी केला.

यावर अमेरिकेचे राजदूत रॉबर्ट वुड यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. अण्वस्त्रप्रसारबंदीवर चर्चा सुरू असतानाच, अमेरिकेने नाटोच्या सदस्यदेशांमध्ये आपल्या अण्वस्त्रांच्या तैनातीचा मुद्दा मांडला होता. त्यावर कित्येक दशकांपासून रशियाने मौन पाळले होते. मात्र 2014 साली रशियाने युक्रेनवर आक्रमण केले आणि त्यानंतर रशिया या मुद्यावर बोलू लागल्याचा ठपका अमेरिकन राजदूतांनी ठेवला. बेलारूसमध्ये आपली अण्वस्त्रे तैनात करून रशिया आण्विक विनाशाचे संकेत देत आहे. याद्वारे युक्रेनच्या युद्धातील आपल्या पराभवाचे रुपांतर विजयात करण्याचा रशियाचा प्रयत्न असल्याची घणाघाती टीका अमेरिकेचे राजदूत रॉबर्ट वुड यांनी केली आहे.

leave a reply