देशातील कोरोनाच्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 15 हजारांच्या पुढे

- सलग दुसऱ्या दिवशी तीन हजाराहून अधिक नव्या रुग्णांची नोंद

नवी दिल्ली – देशात सलग दुसऱ्या दिवशी तीन हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. यामुळे देशातील कोरोनाच्या ॲक्टिव्ह अर्थात उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढून 15 हजारांच्या पुढे गेली आहे. दरदिवशी नोंद होत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या गेल्या सहा महिन्यातील उच्चांक पातळीवर पोहोचली आहे. दिल्ली आणि तमिळनाडूच्या सरकारने यानंतर रुग्णालयांमध्ये मास्क सक्ती केली आहे. तसेच उत्तर प्रदेश सरकारने प्रशासनाला ॲलर्ट राहण्यास बजावले आहे.

देशातील कोरोनाच्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 15 हजारांच्या पुढे - सलग दुसऱ्या दिवशी तीन हजाराहून अधिक नव्या रुग्णांची नोंदकेंद्रीय आरोग्य विभागाकडून देशातील कोरोनाच्या दैनंदिन स्थितीबाबतची माहिती शुक्रवारी सकाळी जाहीर करण्यात आली. गेल्या चोवीस तासात एक लाख 18 हजार कोरोना चाचण्या देशभरात झाल्या. यामध्ये तीन हजार 95 रुग्णांना कोरोनाचे निदान झाले. 2 ऑक्टोबर 2022 रोजी एका दिवसात तीन हजार 375 रुग्ण आढळले. त्यानंतर सहा महिन्याने एका दिवसात इतके रुग्ण सापडले आहेत. याआधी गुरुवारी चोवीस तासात तीन हजार 62 रुग्ण आढळले होते आणि ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 13 हजारांच्या पुढे गेली होती, तर गुरुवारी ही संख्या 15 हजार 208 वर पोहोचली आहे. यातील महाराष्ट्र, केरळ आणि गुजरात या तीन राज्यातच 9115 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

शुक्रवारी महाराष्ट्रात एका दिवसात सुमारे 700 नवे कोरोना रुग्ण आढळले. गेल्या पाच महिन्यात एका दिवसात प्रथमच इतके रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रातील दैनंदिन रुग्णसंख्येत झालेली ही वाढ 63 टक्के आहे. केरळमध्येही 700 हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच महाराष्ट्र आणि केरळमध्ये रुग्णालयात दाखल कराव्या लागणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्याही वाढत आहे. तसेच दिल्लीतही कोरोनाच्या 60 रुग्णांना रुग्णालयात भरती करावे लागले आहे. देशात कोरोना रुग्ण वाढत असताना जागतिक आरोग्य संघटनेचा एक अहवालही समोर आला आहे. डब्ल्यूएचओच्या एपडेमीऑलॉजी रिपोर्टनुसार गेल्या 28 दिवसात भारतात कोरोनाच्या रुग्णसंख्येत 437 टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही 114 टक्क्यांनी वाढले आहे. संपूर्ण दक्षिण पूर्व आशियात गेल्या 28 दिवसात 27 हजाराहून अधिक रुग्ण आढळले आहेत. या क्षेत्रात रुग्णांच्या संख्येतील ही वाढ 152 टक्के आहे. यामध्ये सर्वाधिक वाढ ही भारतात झाली आहे.

तसेच भारतातील या वाढीसाठी ‘एक्सबीबी1.16’ हा कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिअंटचा उपप्रकार कारणीभूत असल्याचा दावाही या अहवालात करण्यात आला आहे. 22 देशात ‘एक्सबीबी1.16’ या उपप्रकाराचे 800 हून अधिक सिक्वेन्सेस सापडले आहेत. यातील बहुतांश भारतातील आहेत. त्यामुळे भारतात ‘एक्सबीबी1.16’ हा ओमिक्रॉनचा उपप्रकार इतर व्हेरिअंटची जागा घेऊ लागल्याचा निष्कर्षही अहवालात मांडण्यात आला आहे.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य विभागाने पुन्हा एकदा सोशल डिस्टंन्सिंग पाळण्याचे, मास्क लावण्याचे, तसेच इतर कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहेत.

त्याचवेळी देशात ‘एच3एन2’ या ‘इन्फ्लूएंजा ए’ उपप्रकाराचेही रुग्ण वाढले आहे. देशात इन्फ्लूएंजाच्या रुग्णांमध्ये दिसून येत असलेली वाढ ही ‘एच3एन2’च्या वाढलेल्या संक्रमणामुळेच असल्याचे इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च-आयसीएमआरने म्हटले आहे. ‘एच3एन2’मुळे कित्येक रुग्णांना रुग्णालयातही भरती करण्याची वेळ येत आहे.

leave a reply