इस्रायलचे परराष्ट्रमंत्री एली कोहेन भारतभेटीवर

नवी दिल्ली – इस्रायलचे परराष्ट्रमंत्री एली कोहेन भारतात आले असून त्यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही देशांमधील व्यापार, गुंतवणूक, संरक्षण व कृषी क्षेत्रातील सहकार्यावर प्रमुख्याने चर्चा झाल्याचे सांगितले जाते. भारताबरोबर मुक्त व्यापारी करार करण्यासाठी इस्रायल उत्सुक असल्याचे यावेळी परराष्ट्रमंत्री कोहेन म्हणाले. तर इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांबरोबरील चर्चा फलदायी ठरल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे. पॅलेस्टाईनच्या गाझापट्टीतून इस्रायलवर हल्ले झाल्यामुळे वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्याच्या भारतभेटीचा अवधी कमी करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आपण मायदेशी परतणार असल्याचे परराष्ट्रमंत्री एली कोहेन यांनी स्पष्ट केले.

इस्रायलचे परराष्ट्रमंत्री एली कोहेन भारतभेटीवरकॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज्‌‍-सीआयआयच्या कार्यक्रमात बोलताना इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारताबरोबरील मुक्त व्यापारी कराराचे महत्त्व अधोरेखित केले. भारत व इस्रायल एकमेकांचे स्पर्धक नाहीत, तर एकमेकांसाठी पूरक ठरणारे देश आहेत, असा दावा एली कोहेन यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरील भेटीत आपण दोन्ही देशांमधील मुक्त व्यापारी करारावर प्रामुख्याने चर्चा करणार असल्याचे कोहेन म्हणाले. भारतात येण्यापूर्वी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत देखील इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी द्विपक्षीय व्यापारासाठी फार मोठी संधी असल्याचे म्हटले आहे.

भारत आणि इस्रायलच्या द्विपक्षीय संबंधांना ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. १९९२ साली भारत व इस्रायलचा द्विपक्षीय व्यापार अवघा २० कोटी डॉलर्स इतका होता. मात्र गेल्या वित्तीय वर्षात उभय देशांमधील ७.८६ अब्ज डॉलर्सवर गेला, याकडे कोहेन यांनी लक्ष वेधले. मुक्त व्यापारी करारानंतर उभयपक्षी व्यापारात अधिक मोठी वाढ होईल, असा विश्वास एली कोहेन यांनी व्यक्त केला आहे. याबरोबरच भारत, अमेरिका, युएई व सौदी अरेबिया मिळून आखाती क्षेत्रात रेल्वेसेवा उभारण्याची तयारी करीत आहेत, याचे इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी स्वागत केले.

आखातातील या रेल्वेमुळे भारतीय उत्पादने इस्रायलच्या हैफा बंदरावर सहजतेने पोहोचतील, असा दावा कोहेन यांनी केला. इस्रायल, आखाती देश व भारत मिळून पूर्वेकडील देशांसाठीचा महामार्ग खुला करीतल, असे आपल्याला वाटत असल्याचे एली कोहेन पुढे म्हणाले. २०१७ साली भारताचे पंतप्रधान मोदी इस्रायलच्या भेटीवर गेले होते. त्यानंतर २०१८ साली इस्रायलच्या पंतप्रधानांनी भारताला भेट दिली. यामुळे दोन्ही देशांचे सहकार्य नव्या उंचीवर पोहोचले आणि उभय देशांमधील मैत्री अधिकच दृढ झाली, असा दावा कोहेन यांनी केला. या वर्षाच्या अखेरीस इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू पुन्हा एकदा भारताच्या भेटीवर येत आहेत. त्यामुळे उभय देशांचे सहकार्य अधिकच व्यापक होईल, असा दावा परराष्ट्रमंत्री कोहेन यांनी केला आहे.

हिंदी

 

leave a reply