इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात हिंसेचा भडका

इस्लामाबाद – इस्लामाबाद, रावळपिंडी, कराची, लाहोरसह पाकिस्तानच्या जवळपास सर्वच शहरांमध्ये आगडोंब उसळला आहे. या देशाच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या घरांवर हल्ले सुरू झाले असून पेशावरमधील रेडिओ स्टेशन देखील पेटवून देण्यात आल्याचे वृत्त आहे. रावळपिंडीमधील लष्कराच्या मुख्यालयावर निदर्शकांनी हल्ले केले असून त्यांनी इथे तोडफोड सुरू केली आहे. माजी पंतप्रधान व प्रमुख विरोधी पक्षनेते इम्रान खान यांना अटक झाल्यानंतर पाकिस्तानात हिंसेचे हे सत्र सुरू झाले व त्यात दहा ते बाराजण दगावल्याचे सांगितले जाते. खान यांनी आपल्या अटकेनंतर समर्थकांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर पाकिस्तानात हाहाकार माजला असून इथे आणीबाणी जाहीर करण्याची वेळ ओढावल्याचे दावे केले जातात. मात्र इम्रान खान यांना झालेली अटक कायदेशीर असल्याचे दावे करून पाकिस्तानचे सरकार व लष्कराने त्याचे समर्थन केले.

इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात हिंसेचा भडकाइस्लामाबाद येथे न्यायालयात हजर राहण्यासाठी निघत असतानाच, इम्रान खान यांनी आपल्याला अटक होऊ शकते, असे एका व्हिडिओद्वारे जाहीर केले होते. ही अटक झाल्यानंतर आपल्या समर्थकांनी रस्त्यावर उतरून याला विरोध करावा, असा संदेश देखील इम्रान खान यांनी दिला. त्यानुसार इम्रान खान यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी हिंसक निदर्शने सुरू केली. पाकिस्तानच्या जवळपास सर्वच प्रमुख शहरांमध्ये तोडफोड, जाळपोळ आणि हाणामारीचे सत्र सुरू झाले. पाकिस्तानी लष्करानेच इम्रान खान यांच्या अटकेसाठी पुढाकार घेतल्याने संतप्त जमावाने लष्करी अधिकाऱ्यांना लक्ष्य केल्याचे दिसत आहे.

पाकिस्तानच्या लष्करी तळांवर अगदी रावळपिंडीमधील लष्कराच्या मुख्यालयावर इम्रान खान यांच्या समर्थकांनी हल्ला चढविला. निर्मिती झाल्यापासून पाकिस्तानात लष्कराविरोधात इतक्या मोठ्या प्रमाणात जनक्षोभ उसळला नव्हता. पण इम्रान खान यांच्या समर्थकांनी पाकिस्तानात सर्वात प्रभावशाली मानल्या जाणाऱ्या लष्करावरच हल्ले चढविले आहेत. सरकारी कार्यालये देखील खान यांच्या समर्थकांच्या हल्ल्याचे लक्ष्य बनल्याचे दिसत आहे. ज्या पद्धतीने इम्रान खान यांनी सर्वांसमोर धक्काबुक्की करून ताब्यात घेण्यात आले, ते पाहता त्यांच्या जीवाला धोका असल्याची चिंता खान यांचे समर्थक करीत आहेत.

इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात हिंसेचा भडकाइम्रान खान यांचे काही बरेवाईट झाले तर सारे पाकिस्तान पेटवून देण्याची भाषा त्यांचे समर्थक करीत आहेत. तर दुसऱ्या बाजूला इम्रान खान यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची प्रकरणे असून त्यांची अटक न्याय्य ठरते, असा दावा अंतर्गत सुरक्षामंत्री राणा सनाउल्लाह यांनी केला आहे. इम्रान खान यांनी पाकिस्तानी लष्कराचा अवमान करणारी विधाने व आरोप केल्याचा ठपका लष्कराने ठेवला आहे. एका लष्करी अधिकाऱ्याने आपल्याला ठार करण्याचा कट आखला होता असा आरोप इम्रान खान यांनी केला होता. मात्र या आरोपामुळे लष्कराचा अपमान होत नाही, असे इम्रान खान यांचे म्हणणे आहे.

पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांवर व त्यांच्या निवासस्थानावर होणारे हल्ले बनावट आहेत. पाकिस्तानी लष्करच हे हल्ले घडवून देशात मार्शल लॉ लागू करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप इम्रान खान यांच्या समर्थकांनी केला आहे. पाकिस्तानचे लष्कर व सरकार यांचा इम्रान खान यांच्याबरोबरील संघर्ष पाकिस्तानचे तुकडे पाडणारा ठरेल, असे इशारे तटस्थ निरिक्षकांनी केला आहे. आधीच अर्थव्यवस्था गाळात बुडालेली असताना, हे अराजक व अस्थैर्य पाकिस्तानच्या चिरफळ्या उडविल्यावाचून राहणार नाही, असे विश्लेषक देखील बजावत आहेत. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या दौऱ्यावर आलेल्या चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी देखील पाकिस्तानच्या नेत्यांना राजकीय विसंवाद संपविण्याचा परखड सल्ला दिला होता. त्याची आठवण हे विश्लेषक करून देत आहेत.

हिंदी

 

leave a reply