महाराष्ट्रात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटच्या रुग्णवाढीने चिंता वाढल्या

-डेल्टा प्लसचे तीन उपप्रकार सापडले; पाच जणांचा बळी

कोरोनाच्या डेल्टा प्लसमुंबई – महाराष्ट्रातून जिनोम तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यात आतापर्यंत 76 जणांना कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटची लागण झाल्याचे समोर आले आहे. तसेच पाच जणांचा या व्हेरियंटमुळे बळी गेला आहे. या डेल्टा प्लसच्या रुग्णांपैकी 10 जणांनी कोरोनावरील लसीचे दोन्हीही डोस घेतले होते. त्यामुळे डेल्टा प्लस व्हेरियंटचे संक्रमण वेगाने वाढत आहे का? असा प्रश्‍न उपस्थित असून ही तिसऱ्या लाटेची सुरुवात नाही ना? अशीही भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे या डेल्टा प्लसच्या वंशावळीतील तीन प्रकारही महाराष्ट्रात आढळले आहेत. त्यामुळे चिंता अधिकच वाढल्या आहेत.

देशात अजूनही कोरोनाचे दिवसाला सुमारे 40 हजार रुग्ण आढळत आहेत. सर्वाधिक रुग्णांची नोंद ही केरळात होत असून सर्वाधिक बळीही याच राज्यात जात आहेत. सोमवारीही केरळात 12 हजाराहून अधिक कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद झाली असून 142 जणांचा बळी गेला. महाराष्ट्रातही चोवीस तासात सुमारे पाच हजाराहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. तसेच सव्वाशेहून अधिक जणांचा बळी जात आहे. याशिवाय नव्या रुग्णांच्या नोंदीच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांची नोंद कमी होत असल्याने ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.

यामध्ये आता डेल्टा प्लसचे रुग्ण वाढू लागल्याचे लक्षात आले असून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात हे रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रातून जिनोम सिक्वेन्ससाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये आतापर्यंत डेल्टा प्लसचे 76 नवे रुग्ण आढळले आहेत. सर्वाधिक डेल्टा प्लस रुग्णांची नोंद रत्नागिरी जिल्ह्यात झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत डेल्टा प्लसचे 15 रुग्ण सापडले आहेत. त्यानंतर जळगावात 13, मुंबईत 11, कोल्हापूरामध्ये सात, पुणे आणि ठाण्यात प्रत्येकी सहा, पालघर, रायगडमध्ये प्रत्येक तीन रुग्णांची नोंंद झाली आहे. याशिवाय नांदेड, गोंदिया, सिंधुदूर्ग जिल्ह्यात प्रत्येकी दोन, चंद्रपूर, अकोला, सांगली, नंदूरबार, औरंगाबाद, बिड या जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लसचा एक-एक रुग्ण आढळला आहे.

महाराष्ट्रात आढळलेल्या डेल्टा प्ससच्या 76 रुग्णांमध्ये 37 पुरुष रुग्ण, तर 39 महिला रुग्ण आहेत. यातही 19 ते 45 वयोगटातील सर्वाधिक रुग्ण असून या वयोगटातील 39 जणांना डेल्टा प्लसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच महाराष्ट्रात आतापर्यंत सापडलेल्या डेल्टा प्ससच्या एकूण रुग्णांपैकी 22 जणांनी कोरोनावरील लस घेतली होती. यातील 10 जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते. या दोन्ही डोस घेतलेल्या रुग्णांपैकी दोघांना कोव्हॅक्सिन, तर आठ जणांनी कोविशिल्ड घेतली होती.

तसेच डेल्टा प्लसचे राज्यात जे पाच बळी गेले आहेत, त्यातील दोघांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले होते, अशी माहिती राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने दिली आहे. पण त्याचवेळी डेल्टा प्लसच्या 76 रुग्णांपैकी 37 जणांना रुग्णालयात भरती करण्याची वेळ आली नाही. तर 71 जण पूर्णपणे बरे झाले आहेत, असेही आरोग्य विभागाने अधोरेखित केले आहे. मात्र डेल्टा प्लसचे विविध जिल्ह्यात आढळलेले रुग्ण पाहता जिनोम सिक्वेन्सिंगसाठी अधिक नमुने पाठविण्याची आवश्‍यकता असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

दरम्यान, डेल्टा प्लसचे सब लिनियज अर्थात या डेल्ट प्लस व्हेरियंटच्या वंशावळीतील तीन उपप्रकारांची नोंंदही महाराष्ट्रात झाल्याचे वृत्त आहे. कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचे देशात आतापर्यंत 13 उपप्रकार आढळले आहेत. त्यांना ‘एवाय.1’ ते ‘एवाय.13’ अशी नावे देण्यात आली आहेत. यातील पहिल्या तीन उपप्रकारांची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. ‘एवाय.1’, ‘एवाय.2’, ‘एवाय.3’ अशी या तीन उपप्रकारांची नावे आहेत.

महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे जे रुग्ण आढळले आहेत. त्यातील 31 प्रकरणे ही डेल्टा प्लसच्या ‘एवाय.1’ या उपप्रकारातील आहेत. तसेच ‘एवाय.3’ उपप्रकारातील 20 आणि ‘एवाय.2’ ची लागण झालेले 10 रुग्ण आढळले आहेत. यातील ‘एवाय.3’ उपप्रकार हा जून महिन्यात सापडला होता व तो काही भागात पसरत असल्याचे लक्षात आले आहे. मात्र आरोग्य विभागाने डेल्टा प्लस व्हेरियंटच्या या उपप्रकारांबाबत खुलासा केलेला नाही. कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरियंट हा मोनोक्लोनल अँटीबॉडीज कॉकटेलच्या उपचारांनाही दाद देत नसल्याचे याआधी समोर आले होते. त्यामुळे महाराष्ट्रात आढळत असलेले डेल्टा प्लस व त्याच्या उपप्रकारातील या रुग्णांनी चिंता वाढल्या आहेत.

leave a reply