फ्लॉईड यांच्या मृत्यूनंतरच्या निदर्शनांमुळे अमेरिकेत परिस्थिती चिघळली – राजधानी वॉशिंग्टनसह अमेरिकेतील २४ राज्यांमध्ये संचारबंदीसह नॅशनल गार्डस् तैनात

वॉशिंग्टन – अमेरिकेत मिनीआपोलिस शहरात पोलिसांच्या कारवाईदरम्यान एका कृष्णवर्णीय नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर देशभरात तीव्र निदर्शनांसह हिंसाचाराचा भडका उडाला आहे. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनसह देशातील २४ राज्यांमध्ये अनेक शहरांत संचारबंदी लागू करण्यात आली असून नॅशनल गार्डस् तैनात करण्यात आले आहेत. हिंसाचार थांबला नाही तर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कर बोलवावे लागेल, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. अमेरिकेतील या घटनांचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावरही उमटण्यास सुरुवात झाली असून चीन, रशिया व इराण या देशांनी अमेरिकेवर टीकास्त्र सोडले.
गेल्या आठवड्यात सोमवारी २५ मे रोजी, अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील मिनीआपोलिस शहरात स्थानिक पोलिसांनी एका तक्रारीच्या पार्श्वभूमीवर ४६ वर्षांच्या जॉर्ज फ्लॉईड यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांच्या कारवाईदरम्यान डेरेक शॉविन या गौरवर्णीय अधिकाऱ्याने फ्लॉईड यांना धक्का देऊन खाली पाडले. शॉविन यांनी काही काळ जॉर्ज फ्लॉईड यांची मान आपल्या गुडघ्याखाली दाबून धरल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. याच कारवाईत फ्लॉईड यांचा मृत्यू झाल्याचे मानले जाते.

पोलिसांच्या कारवाईत कृष्णवर्णीय नागरिकाचा मृत्यू होणे ही घटना अमेरिकेत अत्यंत संवेदनशील मुद्दा मानला जातो. अशा प्रकरणांमधून अमेरिकेतील कृष्णवर्णीय समाजात असणारी नाराजी व असंतोषाची भावना उफाळून बाहेर येते. फ्लॉईड यांच्या मृत्यूनंतर मिनीआपोलिस व मिनेसोटा राज्यांमध्ये सुरू झालेली निदर्शने कृष्णवर्णीयांमधील असंतोषाचा उद्रेक मानला जातो. मात्र सुरुवातीला केवळ मिनेसोटा राज्यात मर्यादित असणाऱ्या निदर्शनांनी गेल्या काही दिवसात व्यापक रूप धारण केले आहे. अमेरिकेतील २४ राज्यांमध्ये ३० हून अधिक शहरांत फ्लॉईड यांच्या मृत्यूवरून सुरू झालेल्या निदर्शनांदरम्यान तीव्र हिंसा भडकली आहे.

मिनीआपोलिसमध्ये स्थानिक निदर्शकांनी पोलीस स्टेशनला जाळण्याची घटनाही घडली आहे. अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये हिंसक जमावाकडून लुटालूट व जाळपोळ सुरू आहे. राजधानी वॉशिंग्टनमध्येही संतप्त निदर्शकांनी व्हाईट हाऊसच्या परिसरात जळक्या बाटल्यांसह दगडफेक केली. यावेळी आंदोलकांनी राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानानजिक असणाऱ्या जुन्या प्रार्थनास्थळाचीही नासधूस केल्याची माहिती सुरक्षायंत्रणांनी दिली. तीव्र हिंसाचारामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पत्रकार परिषद सोडून अचानक बंकरमध्ये न्यावे लागल्याचीही घटना घडल्याचे सांगण्यात येते.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी जॉर्ज फ्लॉईड यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांशी फोनवरून संवाद साधला. फ्लॉईड यांचा मृत्यू तीव्र शोकांतिका असून त्याबद्दल संवेदना व्यक्त करून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी, कुटुंबाला पूर्ण न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. फ्लॉईड यांच्या मृत्यूनंतर ट्रम्प यांनी दिलेल्या वक्तव्यात सदर घटना अत्यंत गंभीर असल्याचे मान्य केले आहे. मात्र त्यावरून हिंसाचार घडविणारे फ्लॉईड यांचा अपमान करत असून कोणत्याही प्रकारची हिंसा खपवून घेतली जाणार नाही, असे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी बजावले.

फ्लॉईड यांच्या मृत्यूचा मुद्दा कृष्णवर्णीयांचे आंदोलन म्हणून ओळखण्यात येणाऱ्या ‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’ या आंतरराष्ट्रीय गटाने उचलून धरला आहे. २०१३ साली अमेरिकेतील एका पोलिसी कारवाईत ट्रॅव्हॉन मार्टिन या १७ वर्षांच्या कृष्णवर्णीय तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर सुरु झालेल्या निदर्शनांमधून ‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’ची स्थापना झाली. अमेरिकेव्यतिरिक्त कॅनडा, ऑस्ट्रेलिया व काही युरोपीय देशांमध्येही हा गट सक्रिय आहे. अमेरिकेतील डेमोक्रॅट पक्षाचे समर्थन असलेल्या या गटाची काही धोरणे, त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरून मिळणारा निधी आणि सदस्यांकडून सातत्याने होणारा हिंसेचा वापर यामुळे हा गट वादग्रस्त ठरला आहे.

दरम्यान, अमेरिकेत फ्लॉईड यांच्या मृत्यूनंतर भडकलेल्या हिंसाचाराचे आंतरराष्ट्रीय स्तरावरही पडसाद उमटले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या सुरक्षा परिषदेत रशिया व चीनने हा मुद्दा उचलून धरला. हॉंगकॉंगमध्ये आंदोलकांवर केलेल्या कारवाईच्या मुद्द्यावर चीनला लक्ष्य करणारी अमेरिका, मिनीआपोलिस व इतर भागातील हिंसाचाराबद्दल विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे टाळते असा टोला रशिया व चीनने लगावला आहे.

चीनच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी सोशल मीडियावर फ्लॉईड यांचे अखेरचे शब्द ठरलेल्या ‘आय कान्ट ब्रीद’चा(मी श्वास घेऊ शकत नाही. उल्लेख केला आहे. हा उल्लेख करताना चुनयिंग यांनी, अमेरिकी प्रवक्त्यांनी हॉंगकॉंगमधील आंदोलनाबद्दल केलेल्या निवेदनाचा आधार घेतला आहे. फ्लॉईड यांचा मृत्यू व त्यानंतर उफाळून आलेल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावरून इराणनेही अमेरिकेवर टीका केली आहे. अमेरिकेत सुरू झालेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ कॅनडासह ब्रिटन व जर्मनीमध्येही निदर्शने सुरू झाली आहेत.

दरम्यान, फ्लॉईड यांच्या मृत्युनंतर सुरू झालेल्या हिंसक निदर्शनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये सोमवारपर्यंत संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. हिंसक जमावाला रोखण्यासाठी प्रसंगी लष्कर तैनात करण्याचाही निर्णय घेतला जाऊ शकतो असे संकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत.

leave a reply