तुर्की अझरबैजान युद्धात ‘पाकिस्तानी स्पेशल फोर्सेस’चा वापर करीत आहे

- आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशिनयान

'पाकिस्तानी स्पेशल फोर्सेस'येरेवान/अंकारा – आर्मेनिया व अझरबैजानमध्ये सुरू असलेल्या युद्धात तुर्कीकडून त्यांच्या लष्कराबरोबरच पाकिस्तानी लष्कराच्या ‘स्पेशल फोर्सेस’चाही वापर करण्यात येत असल्याचा आरोप आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशिनयान यांनी केला आहे. गेल्या महिन्यात आर्मेनिया-अझरबैजान युद्ध सुरु झाल्यापासून पाकिस्तानवर हा आरोप होण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी १९९०च्या दशकात झालेल्या आर्मेनिया-अझरबैजान युद्धातही पाकिस्तानी लष्कर अझरबैजानच्या बाजूने सहभागी झाले होते. या युद्धात अझरबैजानवर माघारीची नामुष्की ओढवली होती.

आर्मेनिया-अझरबैजानमध्ये सुरू असलेले युद्ध थांबावे म्हणून आंतरराष्ट्रीय समुदायाकडून आवाहन करण्यात येत आहे. त्याचवेळी तुर्की व पाकिस्तानसारखे देश मात्र अझरबैजानला उघड सहाय्य करीत असल्याचे समोर येत आहे. तुर्कीने पहिल्याच दिवशी अझरबैजानला मोठ्या प्रमाणात लष्करी सहाय्य दिल्याचे तसेच सिरियन दहशतवाद्यांच्या तुकड्या पाठविल्याचे समोर आले होते. त्यापाठोपाठ आता पाकिस्तानचाही त्यातील सहभाग उघड होत असून हा देश तुर्कीसाठी या युद्धात सहभागी झाल्याचे आर्मेनियन पंतप्रधानांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे. पाकिस्तान तसेच अझरबैजानने आर्मेनियन पंतप्रधानांचा आरोप फेटाळून लावला असून, तो तथ्यहीन असल्याचा खुलासा केला आहे.

'पाकिस्तानी स्पेशल फोर्सेस'

गेल्या काही वर्षात पाकिस्तान दहशतवादाचा समर्थक देश म्हणून समोर येत असून, चुकीच्या धोरणांमुळे या देशाने आपले अनेक पारंपरिक मित्रदेश गमावले आहेत. सध्या चीन व तुर्की वगळता आंतरराष्ट्रीय स्तरावर या देशाला फारसे मित्र राहिलेले नाहीत. त्यामुळे या देशांबरोबर मैत्री टिकविण्यासाठी पाकिस्तान कोणत्याही थराला जाण्याची तयारी दाखवित आहे. आर्मेनिया-अझरबैजान युद्धात पाकिस्तानने घेतलेला सहभाग तुर्कीबरोबरील जवळीक कायम राखण्याच्या प्रयत्नांचा भाग असल्याचे दिसत आहे. तुर्कीकडून काश्मीर मुद्यावर पाकिस्तानला समर्थन देण्यात येत असून, त्याची परतफेड करण्यासाठी पाकिस्तान तुर्कीच्या मोहिमांमध्ये सामील होत असल्याचे दावे करण्यात येतात.

'पाकिस्तानी स्पेशल फोर्सेस'यापूर्वी पाकिस्तानी लष्कराने सौदी अरेबियासाठी येमेनमधील युद्धातही सहभाग घेतला होता. या युद्धात सौदीने उभारलेल्या आघाडीला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले आहे. या युद्धात सामील झालेल्या पाकिस्तानवर इराणकडून जबरदस्त टीकाही झाली होती. ही पार्श्वभूमी असतानाही पाकिस्तानने तुर्कीसाठी आर्मेनिया-अझरबैजान युद्धात घेतलेला सहभाग त्या देशातील सरकार व लष्कराचे अपयश दाखवून देणारा ठरतो.

काही दिवसांपूर्वी आर्मेनियाचे उपपरराष्ट्रमंत्री अवेत अदोन्त्स यांनी एका भारतीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, अझरबैजानमध्ये पाकिस्तानी जवान सक्रिय असल्याचे सांगितले होते. ही बाब पुराव्यांनिशी लवकरच सिद्ध होईल, असे उपपरराष्ट्रमंत्री अदोन्त्स यांनी म्हटले होते. अदोन्त्स यांच्या वक्तव्यावर सोशल मीडियात प्रतिक्रिया उमटली होती. ‘आर्मेनियाने अजिबात काळजी करू नये. पाकिस्तानी लष्कराचा युद्ध हरण्याचा खूप मोठा इतिहास आहे. तुमच्या विरोधात लढणारे पाकिस्तानी जवान तुमच्यासाठी शुभ संकेत ठरतील’, असा टोला भारताच्या एका माजी सुरक्षा अधिकाऱ्याने लगावला होता.

leave a reply