संघर्षबंदीच्या मुदतवाढीनंतरही सुदानमधील संघर्ष कायम

-  सौदी संघर्षबंदीचा नवा प्रस्ताव देणार  तुर्कीच्या लष्करी विमानावर गोळीबार

कैरो/खार्तूम – गृहयुद्धात अडकलेल्या सुदानमधील परदेशी नागरिकांच्या सुटकेसाठी संघर्षबंदीची मुदत वाढविण्यात आली होती. पण यानंतरही राजधानी खार्तूम आणि शेजारच्या ओंदूर्मान शहरात गोळीबार तसेच रॉकेट हल्ले सुरू आहेत. या संघर्षातील जीवितहानीची माहिती दडविण्यात आली आहे. पण या सुदानमधून बाहेर पडणाऱ्या परदेशी नागरिकांची सुरक्षा धोक्यात आल्याची टीका होत आहे. खार्तूम विमानतळावर उभ्या असलेल्या तुर्कीच्या लष्करी विमानावर गोळीबार झाला. निमलष्करीदलाने हा हल्ला केल्याचा आरोप तुर्कीच्या लष्कराने केला.

सुदानमधील गृहयुद्धाला शुक्रवारी दोन आठवडे पूर्ण झाले. हा संघर्ष रोखण्यासाठी अमेरिकेने ७२ तासांची संघर्षबंदी जाहीर केली होती. या काळात अमेरिका, भारत, सौदी अरेबिया, ब्रिटन तसेच इतर देशांनी सुदानमधील आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी व्यापक मोहिमा सुरू केल्या. पण ७२ तासांच्या व त्यानंतर मुदत वाढविलेल्या संघर्षबंदीच्या काळातही लष्कर व निमलष्करीदलातील संघर्ष सुरू आहे. राजधानी खार्तूम युद्धक्षेत्र बनले असून स्थानिकही यात सुरक्षित राहिलेले नाहीत.

गृहयुद्धामुळे विस्थापित झालेली लाखो सुदानी जनता शेजारच्या देशांमध्ये आश्रयासाठी धाव घेत आहे. लष्कर व निमलष्करीदलातील हा संघर्ष रोखण्याठी पाश्चिमात्य तसेच अरब व आफ्रिकी देश मध्यस्थाची भूमिका बजाविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सुदानचा निकटतम अरब देश असलेला सौदी अरेबिया लष्करप्रमुख जनरल बुरहान आणि निमलष्करीदल प्रमुख जनरल दागालो यांना नव्या संघर्षबंदीचा प्रस्ताव देणार आहे. सुदानमधील दोन्ही गट हा प्रस्ताव स्वीकारतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.

पण हा प्रस्ताव येण्याआधी सुदानमध्ये अडकलेल्या परदेशी नागरिकांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गेल्या दोन आठवड्यांच्या संघर्षात परदेशी नागरिकांवर बंदूका ताणून त्यांना लुबाडण्याच्या घटना समोर आल्या होत्या. संघर्षाच्या पहिल्या दोन दिवसातच संयुक्त राष्ट्रसंघाच्या कर्मचाऱ्यांचाही बळी गेला होता. तसेच सौदी अरेबियाच्या विमानावर रॉकेट हल्ले झाले होते. यावेळी सौदीचे नागरिक व अधिकारी विमानतळाच्या क्षेत्रात नव्हते, म्हणून ते बचावले होते. पण आत्ता तर आपल्या नागरिकांच्या सुटकेसाठी खार्तूम आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झालेल्या तुर्कीच्या लष्करी विमानावरच गोळीबार झाला.

लष्करी मालवाहू विमानाच्या पंखावर गोळीबार झाल्यामुळे जबर नुकसान झाल्याचे समोर आले आहे. तुर्कीचे नागरिक विमानात बसण्याच्या तयारीत असताना हा हल्ला झाला. सुदानच्या लष्कराने यासाठी निमलष्करीदलाला जबाबदार धरले आहे. तसेच जनरल दागालो यांचे बंडखोर सशस्त्रदल संघर्षबंदीच्या तयारीत नसल्याचा आरोपही लष्कराने केला. निमलष्करीदलाने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. पण गेल्या काही दिवसांपासून सुदानमध्ये लागू झालेल्या संघर्षबंदीचे निमलष्करीदलानेच उल्लंघन केल्याचे आरोप लष्कराकडून केले जात आहेत. त्याचबरोबर निमलष्करीदलाकडे अतिप्रगत शस्त्रास्त्रे कशी आली, असा प्रश्नही सुदानचे लष्कर उपस्थित करीत आहे.

दरम्यान, या गृहयुद्धामुळे सुदानचा कोष रिकामा होऊ लागल्याची चिंता व्यक्त केली जाते. तर या संघर्षाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय समुदायाचे सुदानमधील हितसंबंध परस्परविरोधी असल्याचे समोर येऊ लागले आहे. अमेरिका व युरोपिय मित्र देश तसेच अरब देश देखील सुदानमधील गृहयुद्धात परस्परविरोधी गटात असल्याचा दावा केला जातो.

leave a reply