बुर्किना फासोतील संघर्षात ७३ ठार

औगारू – बुर्किना फासोच्या पूर्वेकडील लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ३३ जवानांचा बळी गेला तर १२ जण जखमी झाले. यानंतर लष्कराने केलेल्या कारवाईत किमान ४० दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा केला. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून बुर्किना फासोच्या लष्करावर हत्याकांडाचे आरोप होत आहेत.

पश्चिम आफ्रिकेतील बुर्किना फासो हा देश छोट्या-मोठ्या दहशतवादी व कट्टरपंथी संघटनांनी पिंजून काढला आहे. २०१५ सालापासून बुर्किना फासोचे लष्कर बंडखोर, दहशतवादी आणि सशस्त्र कट्टरपंथी टोळ्यांविरोधात कारवाई करीत आहे. यामध्ये आत्तापर्यंत १० हजारांहून अधिक जणांचा बळी गेल्याचा दावा केला जातो. तर २० लाख जण विस्थापित झाले आहेत. जवळपास दोन तृतियांश देश बुर्किना फासोच्या सरकारच्या नियंत्रणाखाली असून इतर भागावर या टोळ्यांचे राज्य आहे.

या देशाचे लष्कर देखील आपल्या सरकारवर नाराज असल्याचा दावा केला जातो. गेल्या वर्षभरात दोन वेळा सरकारविरोधातील लष्कराच्या बंडाळीचे कट उधळून लावण्यात आले. सरकारवर भ्रष्टाचाराचे तर येथील लष्करावर हत्याकांडाचे आरोप झाल्यामुळे बुर्किना फासोची जनता हवालदिल झाली आहे.

leave a reply