जम्मू-काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेनजिक सात हजारांहून अधिक बंकर्सची उभारणी

बंकर्सश्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमा व नियंत्रणरेषेनजिक सात हजारांहून अधिक बंकर्सचे बांधकाम पूर्ण झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पाकिस्तानकडून सातत्याने होणारा गोळीबार व मॉर्टर्सच्या हल्ल्यापासून नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे बंकर्स उभारले जात आहेत. काही महिन्यांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये नियंत्रणरेषेवरील परिसरात भूमिगत ‘कम्युनिटी बंकर्स’ची उभारणी सुरु झाल्याचेही सांगण्यात आले होते.

जम्मूचे विभागीय आयुक्त संजीव वर्मा यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जम्मूच्या सीमाभागातील बंकर्सच्या उभारणीचा आढावा घेतला. यावेळी बंकर बांधकामाचा वेग वाढवावा अशा सूचना वर्मा यांनी दिल्या आहेत. पाकिस्तानकडून सातत्याने होणाऱ्या गोळीबारापासून वाचविण्यासाठी जम्मू विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये १४,४६० बंकर्स उभारण्यात येणार आहेत. जम्मू विभागातील आंतरराष्ट्रीय सीमा व नियंत्रणरेषेवर ६,८३९ वैयक्तिक आणि ९३८ कम्युनिटी असे एकूण ७ हजार ७७७ बंकर्स बांधल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

बंकर्स

सांबा येथे एकूण १५६९ बंकर्स पूर्ण झाले आहेत, जम्मूमध्ये ११६१ बंकर्स, कठुआमध्ये १५१९, राजौरीमध्ये २,६०३ आणि पुंछमधील ९२५ बंकर्स पूर्ण झाले आहेत. त्याचवेळी ३३४ बंकर्स पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. या बांधकामासह विभागीय आयुक्तांनी प्रभागातील विविध जिल्ह्यात सैन्याच्या भूसंपादनासंदर्भातही चर्चा केली. भूसंपादनाची प्रकरणे त्वरित निकालात काढण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या कालावधीत बंकर्स बांधकामातील अडचणीवरही चर्चा झाली.

जम्मू-काश्मीरच्या बोनियार व उरीमधल्या नियंत्रणरेषेच्या परिसरात १८ भूमिगत बंकर्स उभारले जाणार आहेत. यापैकी सहा बंकर्सचे काम सुरु झाले आहे. प्रत्येक बंकरसाठी १० लाख रुपये इतका खर्च येणार आहे. सीमेवर गोळीबार सुरु झाल्यास सीमाभागातील नागरिक या बंकर्समध्ये आश्रय घेऊ शकतात. उरी सेक्टरमध्ये सततच्या गोळीबारामुळे इथली जनता भीतीच्या छायेत वावरत आहेत. त्यामुळे सुरक्षेसाठी सातत्याने बंकर्सची मागणी करण्यात येत होती. दरम्यान, यावर्षी जम्मू-काश्मीरच्या नियंत्रणरेषेवर पाकिस्तानकडून ३८०० हून अधिक वेळा संर्घषबंदीचे उल्लंघन झाल्याची माहिती समोर आली आहे.

leave a reply