‘एलएसी’वरील तणावाला सर्वस्वी चीनच जबाबदार

- भारताचे परराष्ट्र सचिव हर्ष श्रृंगला

लंडन – चीनने लडाखच्या ‘एलएसी’वरील यथास्थिती बदलण्याचा एकतर्फी प्रयत्‍न केल्यामुळे उभय देशांमधील संबंध बिघडल्याचा आरोप भारताचे परराष्ट्र सचिव हर्ष श्रृंगला यांनी केला. त्याचबरोबर आपली अखंडता आणि सार्वभौमत्वाशी भारत कुठल्याही प्रकारची तडजोड मान्य करणार नाही, यावर भारत ठाम असल्याचे श्रृंगला यांनी बजावले. तर चीनचा वाढता विस्तार आणि जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, भारताने सध्या इंडो-पॅसिफिक क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रित केल्याचे भारताच्या परराष्ट्र सचिवांनी स्पष्ट केले.

हर्ष श्रृंगला

भारताचे परराष्ट्र सचिव हर्ष श्रृंगला हे सध्या युरोपिय देशांच्या दौर्‍यावर असून त्यांनी फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटनबरोबरील भारताचे द्विपक्षीय तसेच सामरिक सहकार्यावर चर्चा केली. या देशांनी देखील इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील भारताच्या भूमिकेचे स्वागत करुन येथील नव्या आघाडीत सहभागी होण्याचे जाहीर केले आहे. या युरोप दौर्‍यामध्ये भारताच्या परराष्ट्र सचिवांनी ‘एलएसी’च्या मुद्यावरुन चीनच्या विस्तारवादावर निशाणा साधला. जर्मन वृत्तसंस्थेशी बोलताना, श्रृंगला यांनी ‘एलएसी’वरील तणावासाठी चीन जबाबदार असल्याचा ठपका ठेवला.

गेल्या कित्येक वर्षांपासून भारत आणि चीनमध्ये सीमारेषेवर एकमत नसल्याचे श्रृंगला यांनी मान्य केले. पण लष्करी सामर्थ्याच्या जोरावर सीमारेषा बदलण्याचा प्रयत्‍न झाला तर त्याचा थेट परिणाम उभय देशांच्या संबंधांवर होईल, असे सांगून परराष्ट्र सचिवांनी चीनवर टीका केली. लडाखच्या ‘एलएसी’वर चीनने केलेल्या आक्रमक हालचाली चिंताजनक असून काहीही झाले तरी भारत आपल्या अखंडता किंवा सार्वभौमत्वाशी तडजोड होऊ देणार नसल्याचे श्रृंगला यांनी ठणकावले. त्याचबरोबर हाँगकाँगमधील परिस्थितीवर भारताची नजर असल्याचेही श्रृंगला म्हणाले. हाँगकाँगमध्ये भारत वंशियांची मोठी संख्या असल्यामुळे येथील घडामोडींवर भारताचे कायम बारीक लक्ष असेल, अशा शब्दात श्रृंगला यांनी हाँगकाँगबाबत भारताची भूमिका मांडली.

हर्ष श्रृंगला

तर ब्रिटनमधील ‘पॉलिसी एक्स्चेंज’ या अभ्यासगटाने आयोजित केलेल्या बैठकीत बोलताना भारताच्या परराष्ट्र सचिवांनी इंडो-पॅसिफिक बाबत भारताची भूमिका मांडली. इंडो-पॅसिफिक सागरी क्षेत्रातून जगातील सुमारे ६५ टक्के व्यापारी वाहतूक केली जाते. भारताचा बराचसा व्यापार देखील या सागरी क्षेत्रातून केला जातो. अशा परिस्थितीत या क्षेत्रातील चीनच्या वाढता प्रभावामुळे नियमांवर आधारित सागरी सुरक्षा आणि स्थैर्य सुनिश्चित करण्यासाठी इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील देशांबरोबर सहकार्य वाढविणे आवश्यक बनले आहे, असे सांगून श्रृंगला यांनी चीनला लक्ष्य केले. तर सुरक्षा प्रदान करणारा देश म्हणून भारत इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा आणि वाहतूकीचे स्वातंत्र्य भक्कम करण्याचा प्रयत्‍न करीत असल्याचे श्रृंगला यांनी सांगितले.

दरम्यान, भारताने पुढाकार घेतलेल्या इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सहकार्यात ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीने सहभागी होण्याची घोषणा केली असून जर्मनीने पुढच्या वर्षापासून हिंदी महासागरातील गस्तीसाठी विनाशिका रवाना करण्याचे जाहीर केले. तर फ्रान्सने देखील यासंबंधीचे संकेत याआधीच दिले होते. इंडो-पॅसिफिक क्षेत्रासंबंधी भारत आणि युरोपिय देशांमधील वाढत्या सहकार्यावर चीनच्या कम्युनिस्ट राजवटीच्या मुखपत्राने काही दिवसांपूर्वीच प्रतिक्रिया दिली होती. हे सहकार्य यशस्वी होणार नसल्याचा दावा चीनच्या मुखपत्राने केला होता.

leave a reply