सामरिकदृष्ट्या महत्वाच्या ‘झोजिला’ टनेलच्या बांधकामास सुरुवात     

नवी दिल्ली –  श्रीनगर आणि लेहला जोडणाऱ्या ‘झोजिला’ भुयारी मार्गाच्या बांधकामाला प्रारंभ झाला. केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बटन दाबले आणि या भुयारी मार्गासाठी पहिला स्फोट घडवून आणण्यात आला. या बोगद्यामुळे श्रीनगर खोरे आणि लेहदरम्यान संपूर्ण वर्षभर वाहतूक सुरु राहू शकेल.

'झोजिला'

श्रीनगर-कारगिल-लेह राष्ट्रीय महामार्गावर झोजिला पास ११ हजार ५७८ फूट उंचीवर आहे. हिवाळ्यात येथे मोठया प्रमाणावर बर्फवृष्टी होते.  यामुळे झोजिला पास येथून वाहतूक वर्षाचे फक्त सहा महिने सुरु असते. मात्र  ‘झोजिला’ बोगद्यामुळे वर्षभर वाहतूक सुरु राहण्यास मदत मिळेल. या भुयारी मार्गामुळे श्रीनगर आणि लेह दरम्यान प्रवासासाठी लागणारा वेळ  ३ तासांवरून केवळ १५ मिनिटांवर येणार आहे. सध्याच्या घडीला हा मार्ग वाहनाने जाण्यासाठीचा जगातील हा सर्वात धोकादायक मार्ग आहे.

 ‘झोजिला’ भूयारी मार्ग हा १४.१५ किलोमीटर लांबीचा असून हा प्रकल्प भौगोलिक दृष्ट्या संवेदनशील असल्याचे गडकरी म्हणाले. हा बोगदा आशियातील सर्वात जास्त लांबीचा भुयारी मार्ग असून त्यामुळे या प्रदेशातील आर्थिक स्थिती सुधारण्यास मोठ्या प्रमाणात मदत मिळेल. तसेच  स्थानिकांना रोजगार मिळेल, असे गडकरी यांनी अधोरेखित केले. सुरक्षा आणि दर्जा याच्याशी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता या बोगद्याच्या आराखड्याची पुनर्रचना करण्यात आल्याने चार हजार  कोटी रुपयांची बचत झाली आहे. वेळापत्रकानुसार या बोगद्याच्या कामाला सहा वर्ष लागणार असल्याचे सांगण्यात येते आहे.

'झोजिला'

कारगिल, द्रास आणि लडाखमधील नागरिकांकडून मागील ३० वर्षांपासून झोझिला भुयारी मार्ग उभारण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर ही प्रतीक्षा संपली आहे.  या भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाल्यावर ती आधुनिक भारताच्या इतिहासातील अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी ठरेल. लडाख,  गिलगीट-बाल्टिस्तानमध्ये चीन आणि पाकिस्तानच्या हालचाली आणि येथे आपत्कालीन परिस्थितीत जलदगतीने लष्कराच्या जवानांना रसद पोहोचविण्याकरिता हा मार्ग सामरिक दृष्ट्या अतिशय महत्वाचा ठरेल.

सुरक्षेच्या दृष्टीनेसीमा भागातील पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यात येत आहे. सीमेवर अल्पावधीत मोठ्या संख्येने लष्करी तैनातीसाठी चीनने आपल्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभारल्या आहेत.यापार्श्वभूमीवर भारतानेही सीमाक्षेत्रातील पायाभूत सुविधांना गती दिली आहे. भारताकडून चीनलगतच्या सीमाभागातील पायाभूत सुविधांचे विकासप्रकल्प जोमाने हाती घेण्यात आले आहेत. दोन दिवसापूर्वीच चीन आणि पाकिस्तानच्या सीमेलगतच्या ४४पुलांचे संरक्षणमंत्र्यांनी उद्‍घाटन केले होते. याआधी अटल टनेलचे पंतप्रधानाच्या हस्ते राष्ट्रार्पण झाले होते.

leave a reply