भारताने पाकिस्तानला चर्चेचा प्रस्ताव दिलेला नाही – परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

नवी दिल्ली – भारत सरकार पाकिस्तानशी चर्चा करण्यासाठी उत्सुक आहे, असा दावा पाकिस्तानी पंतप्रधानांचे सुरक्षाविषयक सल्लागार मोईद युसूफ यांनी केला होता. पण या चर्चेत काश्मीरच्या प्रतिनिधींचाही समावेश असावा अशी पाकिस्तानची अट आहे. ती मान्य झाल्यास मगच पाकिस्तान या चर्चेला तयार होईल, असा दावा मोईद युसुफ यांनी केला होता. मात्र भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानबरोबर चर्चेसाठी प्रस्ताव देण्यात आलेला नाही व तसे प्रयत्‍नही भारताने केलेले नाहीत, असे स्पष्ट केले. इतकेच नाही तर सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेले पाकिस्तानचे सरकार अशा स्वरूपाचे खोटेनाटे दावे करून आपल्या अपयशाकडून जनतेचे लक्ष इतरत्र वळविण्याचे प्रयत्‍न करीत असल्याचा टोला भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी लगावला आहे.

चर्चेचा प्रस्ताव

एका भारतीय पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीत मोईद युसूफ यांनी भारताकडून पाकिस्तानला चर्चेचा प्रस्ताव मिळाल्याचे दावे ठोकून दिले होते. पण पाकिस्तानने मात्र काश्मीरचे प्रतिनिधी या चर्चेत सहभागी झाल्याखेरीज चर्चा शक्य नसल्याची भूमिका घेतली आहे, असा दावा युसूफ यांनी केला. वेगळ्या शब्दात भारत चर्चेसाठी मनधरणी करीत आहे, असा देखावा निर्माण करण्याचा प्रयत्‍न त्यांनी या मुलाखतीद्वारे केला. मात्र भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या दाव्यातील हवा काढून घेतली आहे. याआधी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग तसेच परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पुढच्या काळात पाकिस्तानबरोबर चर्चा व्हायची असेल, तर ती पाकव्याप्त काश्मीरबद्दल होईल, असे ठणकावले होते, तर दुसर्‍या बाजूला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारत चर्चेला तयार नसल्याची तक्रार आंतरराष्ट्रीय समुदायाकडे केली होती.

अशा परिस्थितीत भारत पाकिस्तानकडे चर्चेची मागणी करीत असल्याचे मोईद यांनी केलेले दावे पाकिस्तानी माध्यमांनाही पटलेले नाहीत. म्हणूनच पाकिस्तानी माध्यमांनीही मोईद युसूफ यांची खिल्ली उडवली आहे. त्यातच या मुलाखतीत युसूफ यांनी भारत पाकिस्तानात दहशतवाद माजवत असल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा केला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर हे पुरावे मांडण्याची आपण तयारी केली आहे, असे युसूफ यांनी म्हटले होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या विरोधात पाकिस्तानने कुठलीही तक्रार केली तरी त्याकडे कोणीही लक्ष देणार नाही. असे असताना युसूफ यांनी केलेली ही विधाने हास्यास्पद ठरतात, असे पाकिस्तानी पत्रकारांनी म्हटले आहे. तर नाव न सांगण्याच्या अटीवर, भारतीय अधिकार्‍याने मोईद युसूफ यांचा हा दावा केविलवाणा प्रयत्‍न असल्याचा टोला हाणला आहे.

याआधीही जम्मू-काश्मीरसह भारताचा इतर भूभाग पाकिस्तानच्या नकाशात सहभागी करण्याची शक्कल युसूफ यांनी लढविली होती. पण त्यांचे हे प्रयत्‍न पाकिस्तानवरच उलटले होते. ज्या एससीओ’च्या बैठकीत पाकिस्तानने हा नकाशा प्रदर्शित करण्याचा प्रयत्‍न केला होता, त्या बैठकीचे आयोजन करणार्‍या रशियाने पाकिस्तानला खडे बोल सुनावले होते. मात्र अशा प्रकारच्या कारवाई करीत राहून काश्मीर प्रश्नावर आपण फार मोठे यश मिळवीत आहोत, असे चित्र उभे करणे ही इम्रान खान यांच्या सरकारची गरज बनली आहे.

काश्मीरप्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर उपस्थित करण्यापेक्षा पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार पाकिस्तानी जनतेसमोर आपण काहीतरी करीत असल्याचे दाखवू पाहात आहे. खान यांनी पाकिस्तानचे हसे केले असून याआधी पाकिस्तानची इतकी फजिती कधीच झाली नव्हती, अशी टीका मान्यवर विरोधीपक्षनेते करीत आहेत. पाकिस्तानी माध्यमेदेखील इमरान खान यांच्या सरकारने जनतेचा भ्रमनिरास केल्याची सडकून टीका करीत आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनीही पाकिस्तानचे सरकार आपले अपयश झाकण्यासाठी प्रत्येक गोष्टीत भारताला खेचण्याचा प्रयत्न करीत आहे, अशी चपराक लगावली.

भारताने कलम ३७० हटवून जम्मू व काश्मीरला केंद्रशासित प्रदेश घोषित केले. त्यानंतरच्या काळात पाकिस्तानचे सरकार काहीही करू शकले नाही, ही टीका टाळण्यासाठी इम्रान खान यांची सुरू असलेली धडपड आता केविलवाण्या स्थितीत पोहोचली आहे. महागाई आणि बेकारी पाकिस्तानात थैमान घालत आहे. पाकिस्तानच्या विरोधी पक्ष नेत्यांनी एकजूट करून इमरान खान यांच्या सरकारविरोधात भक्कम आघाडी उघडली आहे. या सरकारला डिसेंबर महिना पाहू देणार नाही, असा निर्धार विरोधीपक्षाचे नेते व्यक्त करीत आहेत. राजधानी इस्लामाबादमध्ये सरकार विरोधात मोठे आंदोलन करण्याची घोषणा विरोधी पक्षांनी केली आहे व त्याला जनतेचे समर्थनही मिळत आहे. यामुळे दडपणाखाली आलेले इम्रान खान यांचे सरकार आपल्या अस्तित्वासाठी धडपडत आहे. या धडपडीत पाकिस्तानच्या सरकारकडून नव्या चुका होत आहेत. मोईद युसुफ यांनी भारताबाबत केलेले दावे, हा याच चुकांच्या मालिकेतला भाग ठरतो आहे.

leave a reply