अरुणाचलच्या सीमेजवळ चीनकडून तीन गावांची उभारणी

नवी दिल्ली – लडाखमध्ये भारताकडून मिळालेल्या दणक्यानंतर चीनने आता अरुणाचल प्रदेशजवळ नवी कुरापत काढण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. भारत, भूतान व चीनच्या सीमा जोडणाऱ्या जंक्शनपासून काही अंतरावर चीनने तीन नव्या गावांची उभारणी केली आहे. उपग्रहांद्वारे काढलेल्या फोटोग्राफ्सच्या माध्यमातून ही माहिती समोर आली. चीनची ही कुरापत अरुणाचल प्रदेशच्या भागात भारताविरोधात संघर्षाची नवी आघाडी उघडण्याच्या योजनेचा भाग असल्याचा दावा विश्‍लेषकांनी केला आहे.

भारत-चीन यांच्यातील सीमावादात सुमारे साडेतीन हजार किलोमीटर्सच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा समावेश आहे. यामध्ये अरुणाचल प्रदेशच्या सीमेचाही समावेश असून त्याचा उल्लेख दक्षिण तिबेट करून तो आपलाच भूभाग असल्याचा दावा चीन करीत आहे. भारताने आक्रमक भूमिका घेऊन चीनचा हा दावा स्पष्टपणे फेटाळला आहे. भारताकडून अरुणाचलमध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची उभारणी सुरू करण्यात आली आहे. त्याचवेळी या भागातील संरक्षणसिद्धताही मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर चीनने आता अरुणाचलनजिक नव्या हालचालींना सुरुवात करून भारताला नवी चिथावणी दिली आहे.

गेल्याच महिन्यात चीनने अरुणाचल प्रदेशजवळ चीनच्या भागात सुरू असणाऱ्या रेल्वे प्रकल्पाचा वेग वाढविण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर ब्रह्मपुत्रा नदीवर मोठे धरण उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते. आता अरुणाचलच्या सीमेनजिक असलेल्या आपल्या हद्दीत तीन गावांची उभारणी करणे भारताविरोधातील योजनेतील पुढचा टप्पा ठरतो.

‘प्लॅनेट लॅब्स’ या कंपनीने भारत, भूतान व चीनच्या सीमा जोडणाऱ्या जंक्शननजिकचे काही फोटोग्राफ्स प्रसिद्ध केले आहेत. या फोटोग्राफ्समध्ये या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यातील तसेच नोव्हेंबर महिन्यातील फोटोग्राफ्सचा समावेश आहे. भारताच्या ‘बुमला पास’ म्हणून ओळखण्यात येणाऱ्या भागापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर चीनने तीन छोट्या गावांची उभारणी केल्याचे दिसत आहे. या गावांना जोडण्यासाठी डांबरी रस्त्यांचे बांधकाम केल्याचेही उघड झाले आहे. या गावांमध्ये 50हून अधिक घरे बांधण्यात आल्याचेही फोटोग्राफ्समध्ये स्पष्टपणे दिसते.

चीनने अशा रितीने गावांची उभारणी करून कुरापत काढण्याचा प्रयत्न करण्याची ही दुसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वी चीनने भूतानच्या हद्दीत घुसखोरी करून गावांची उभारणी केल्याचेही उपग्रहांच्या फोटोग्राफ्समधून उघड झाले होते. भूतानमध्ये केलेली ही घुसखोरी डोकलामपासून अवघ्या सात किलोमीटर्सच्या अंतरावर आहे.

लडाखच्या ‘एलएसी’च्या मुद्यावर आठ बैठका पार पडल्यानंतरही भारत व चीनमधील तणाव अजून निवळलेला नाही. उलट चर्चा सुरू असतानाच चीन नवी तैनाती करीत असल्याचे वृत्त समोर येत आहे. चीनच्या या कारवायांना भारताने खंबीर भूमिका घेत प्रत्युत्तर दिले आहे. लडाखपासून ते अरुणाचलपर्यंत भारताने आपली संरक्षणसज्जता वाढविली असून लष्करासह हवाईदल व नौदलही पूर्ण तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे चीनची बेचैनी वाढत असून भारतावरील दडपण वाढविण्यासाठी चीन प्रयत्नांची शर्थ करीत आहे. मात्र लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय सैनिकांसमोर आपली डाळ शिजत नाही, हे लक्षात आल्यानंतर चीन इतर ठिकाणाहून भारतीय लष्करावरील दडपण वाढविण्याच्या तयारीत असल्याचे यामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. माजी लष्करी अधिकारी तसेच सामरिक विश्‍लेषकांनी भारतीय लष्कराला चीन अशा डावपेचांचा वापर करू शकतो, याची आधीच पूर्वसूचना दिली होती. भारतीय लष्कराबरोबरच वायुसेनेनेही चीनबरोबरील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील आपली सज्जता वाढविली आहे. त्यामुळे लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर, कुठेही घुसखोरी अथवा आगळीक करण्याचा प्रयत्न चीनने केलाच, तर त्याला मुखभंग करणारे प्रत्युत्तर देण्याची पूर्ण सज्जता भारतीय सेनादलांनी ठेवलेली आहे.

leave a reply