सहा दिवसांपासून सुरू असलेल्या अफगाणी लष्कराच्या कारवाईत तालिबानचे 105 दहशतवादी ठार

काबुल – कतारची राजधानी दोहा येथे अफगाणिस्तानचे सरकार आणि तालिबानचे प्रतिनिधी चर्चा करीत आहे. या चर्चेला यश मिळत असल्याचे सांगून त्यावर अफगाणी सरकार व तालिबानने समाधान व्यक्त केले होते. असे असले तरी अफगाणिस्तानातील रक्तपातावर याचा परिणाम झालेला नाही. अफगाणिस्तानच्या लष्कराने गेल्या सहा दिवसात हेल्मंड, कंदहार आणि लघमान या प्रांतात केलेल्या कारवाईत तालिबानचे किमान 105 दहशतवादी ठार केले आहेत. त्याचवेळी तालिबानचे दहशतवादी देखील अफगाणी लष्करावर जोरदार हल्ले चढवित आहेत.

अफगाणिस्तानच्या दक्षिणेकडील लघमान प्रांतात अफगाणी लष्कर आणि नाटो लष्कराने गेल्या सहा दिवसांपासून तालिबानविरोधात मोठी कारवाई छेडली होती. लघमान प्रांताच्या पूर्वेकडील ‘दौलत शहा’ आणि ‘अलीशांग’ या दोन जिल्ह्यांमध्ये केलेल्या कारवाईत तालिबानचे 44 दहशतवादी ठार झाले असून यामध्ये सात महत्त्वाच्या कमांडर्सचा समावेश होता. त्याचबरोबर किमान 17 तालिबानी जखमी झाल्याची माहिती अफगाणी लष्कराचे ब्रिगेडिअर जनरल झल्मे नबार्ड यांनी दिली. हे दोन्ही जिल्हे तालिबानपासून मुक्त झाल्याचा दावाही ब्रिगेडिअर जनरल नबार्ड यांनी केला.

लघमान प्रांतात ही कारवाई सुरू असताना अफगाणी लष्कराने कंदहार प्रांतात हल्ला चढवून 18 तालिबानींना ठार केले. कंदहार प्रांताच्या ‘दंड’, ‘जेलाई’ आणि ‘मारौद’ या तीन जिल्ह्यांमध्ये अफगाणी लष्कराने कारवाई केली. कंदहार प्रांतात तालिबानचा सर्वात मोठा प्रभाव असल्याचा दावा केला जातो. या व्यतिरिक्त, शुक्रवार व शनिवार असे सलग दोन दिवस हेल्मंड प्रांतात केलेल्या कारवाईत 43 दहशतवाद्यांचा खातमा केल्याचे जाहीर केले.

यापैकी शुक्रवारी हेल्मंडच्या ‘नावे-ए-बराकझाई’ येथील कारवाईत 25 दहशतवादी ठार झाले. तसेच इथली तालिबानची सहा ठिकाणे उद्ध्वस्त केल्याचे अफगाणी लष्कराने म्हटले आहे. तर शुक्रवारीच हेल्मंड प्रांतातील ‘नाद अली’ जिल्ह्यातील हल्ल्यात किमान 18 दहशतवादी ठार झाल्याचे अफगाणी लष्कराने स्पष्ट केले. मात्र अफगाणी लष्कराबरोबर नाटोने चढविलेल्या हवाई हल्ल्यात 40 हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचे स्थानिक सांगत आहेत.

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातून पलायन केलेल्या दहशतवाद्यांनी सध्या हेल्मंड प्रांतात आश्रय घेतल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर, अफगाणी लष्कराच्या या कारवाईचे महत्त्व वाढले आहे.

leave a reply