रेल्वेच्या ५२३१ डब्ब्यांचे कोविड केअर केंद्रात रूपांतर

- १५ राज्यातील २१५ रेल्वे स्थानकांवर तैनात होणार

नवी दिल्ली – देशातील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने ५२३१ रेल्वे डब्यांचे रूपांतर कोविद केअर केंद्रात केले आहे. १५ राज्यातील २१५ रेल्वे स्थानकांवर हे डबे ठेवण्यात येणार आहेत.

मागील चार दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत सुमारे १० हजाराने वाढ झाली आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता रुग्णांना ठेवण्यासाठी रेल्वेच्या डब्याचा वापर करण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या नियमावलीनुसार या कोचेसचा वापर गंभीर नसलेल्या रुग्णांसाठी करण्यात येणार आहे. अपुऱ्या आरोग्यसुविधा असलेल्या राज्यांमध्ये आणि संशयीत तसेच निश्चित रोगनिदान झालेल्या रुग्णांसाठी विलगीकरण कक्षांची गरज भासेल तिथे हे कोच उपलब्ध करून दिले जातील.

आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, दिल्ली, गोवा, गुजरात, हरियाणा, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि ओडिशा या १५ राज्यांमध्ये रेल्वेचे डबे पुरवण्यात येणार आहेत. २१५ रेल्वे स्थानकापैकी ८५ स्थानकांवर रेल्वेकडून आरोग्यसेवा पुरविण्यात येणार आहेत. यासह १३० स्थानकांवर कर्मचारी आणि आवश्यक औषधे यांची सोय राज्यांकडून करण्यात आल्यास राज्यांच्या मागणीनुसार कोविद केअर कोच तैनात करण्यात येतील, असे रेल्वेने म्हटले आहे. या कोचच्या वीजपुरवठा, सुरक्षेची जबाबदारी रेल्वेतर्फे घेण्यात येणार आहे.

कोविड केअर केंद्रांव्यतिरिक्त २५०० डॉक्टर आणि ३५ हजार पॅरामेडिकल कर्मचारी भारतीय रेल्वेतर्फे नियुक्त करण्यात आले आहेत. विविध विभाग स्तरावर या नियुक्त्या हंगामी तत्वावर केल्या आहेत. रेल्वे रुग्णालयांपैकी १७ कोविड समर्पित रुग्णालयात ५ हजार खाटा व 33 रुग्णालय विभागात गंभीर पातळीवरच्या कोविड रुग्णांवर उपचार करण्यात येतील.

leave a reply