भारत व ऑस्ट्रेलियामधील सहकार्य अधिकच भक्कम होईल

- ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचा दावा

नवी दिल्ली – ‘‘भारत हा ऑस्ट्रेलियाचा ‘ग्रेट फ्रेंड’ ठरतो. भारताची अर्थव्यवस्था जबरदस्त गती घेत आहे. अशा काळात भारत व ऑस्ट्रेलियाचे उर्जाविषयक सहकार्य अधिकच भक्कम होईल’’, असा विश्‍वास ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी व्यक्त केला. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांकडून ही विधाने येत असताना, भारताचे व्यापारमंत्री पियूष गोयल यांनी भारत व ऑस्ट्रेलियामध्ये २०२२ सालच्या अखेपर्यंत मुक्त व्यापारी करार संपन्न होणार असल्याची घोषणा केली. चीनबरोबरील ऑस्ट्रेलियाचा वाद विकोपाला गेलेला असताना, ऑस्ट्रेलियाचे भारताबरोबरील हे सहकार्य लक्ष वेधून घेणारे ठरते.

भारत व ऑस्ट्रेलियामधील सहकार्य अधिकच भक्कम होईल - ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचा दावाऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि अमेरिकेमध्ये ऑकस सहकार्य प्रस्थापित झाले असून हे लष्करी संघटन चीनला रोखण्यासाठीच असल्याचे सांगितले जाते. मात्र याच्यामुळे क्वाडचे सदस्यदेश असलेल्या भारत व जपानला धक्का बसल्याचे दावे केले जातात. त्यामुळे ऑकसचा क्वाडच्या एकजुटीवर परिणाम होऊ शकतो, असे काही विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. त्यावर बोलताना ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी हा दावा खोडून काढला. ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि अमेरिकेचे ऑकस संघटन क्वाडसाठी पूरक ठरेल. क्वाडचे सदस्य असलेल्या भारत व जपानलाही याची जाणीव आहे आणि हे दोन्ही देश ऑकसच्या सहकार्याला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत, असे पंतप्रधान मॉरिसन म्हणाले.

इतकेच नाही, तर भारताबरोबरील ऑस्ट्रेलियाचे मैत्रीपूर्ण सहकार्य अधिकाधिक भक्कम होत असल्याचा निर्वाळा ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी दिला. भारताची अर्थव्यवस्था जबरदस्त कामगिरी करीत असून यामुळे भारतातील ऊर्जेची मागणी वाढत जाईल. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे, व भारताला याची जाणीव आहे. म्हणूनच भारत व ऑस्ट्रेलियामधील ऊर्जाविषयक सहकार्य अधिकाधिक भक्कम होईल, असा विश्‍वास ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी व्यक्त केला. मात्र भारत व ऑस्ट्रेलियामध्ये विकसित होत असलेल्या सहकार्याचा ऑस्ट्रेलियाच्या चीनबरोबरील वादाशी संबंध जोडता येणार नाही, असे सांगून पंतप्रधान मॉरिसन यांनी वाद टाळला आहे.

ऑस्ट्रेलियाचे भारताबरोबरील सहकार्य स्वतंत्र आहे, असे पंतप्रधान मॉरिसन म्हणाले. दोन्ही देशांमधील मुक्त व्यापारी करारा आकार घेत असून गुरुवारी दोन्ही देशांच्या व्यापारमंत्र्यांची यावर चर्चा पार पडल्याची माहिती पंतप्रधान मॉरिसन यांनी दिली. या चर्चेसाठी ऑस्ट्रेलियाचे व्यापारमंत्री डॅन टेहन नवी दिल्लीत आले आहेत. त्यांच्याबरोबरील चर्चेदरम्यान भारताचे व्यापारमंत्री पियूष गोयल यांनी उभय देशांमधील मुक्त व्यापारी करार २०२२ सालच्या अखेरपर्यंत पूर्णत्त्वाला जाईल, असा विश्‍वास व्यक्त केला आहे.

leave a reply