निर्वासितांच्या समस्येवर राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यापेक्षा ट्रम्प यांची धोरणे चांगली

- अमेरिकी गटाच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष

वॉशिंग्टन – अमेरिकेतील निर्वासितांची समस्या हाताळण्यासाठी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राबविलेली धोरणे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यापेक्षा चांगली होती, असा निष्कर्ष अमेरिकी सर्वेक्षणातून समोर आला आहे. ५० टक्क्यांहून अधिक अमेरिकी नागरिकांनी बायडेन यांच्या धोरणांवर नाराजी दर्शविल्याचे ‘रासमुसेन रिपोर्टस्’च्या सर्वेक्षणातून उघड झाले आहे. ‘एबीसी न्यूज’ या वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेल्या अहवालातही बायडेन यांच्याविरोधातील नाराजी वाढत असल्याचे समोर आले असून, निर्वासितांचा मुद्दा त्यासाठी कारणीभूत ठरल्याचे सांगण्यात आले आहे.

निर्वासितांच्या समस्येवर राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यापेक्षा ट्रम्प यांची धोरणे चांगली- अमेरिकी गटाच्या सर्वेक्षणातील निष्कर्षकाही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या ‘होमलॅण्ड सिक्युरिटी’ विभागाने हैतीतून आलेल्या १२ हजारांहून अधिक निर्वासितांना अमेरिकेत मोकळे सोडून दिल्याचे जाहीर केले होते. ही संख्या जास्त असू शकते, असे संकेतही अधिकार्‍यांकडून देण्यात आले होते. या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकी नागरिकांसह राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आपली अमेरिका वेगाने मानवतेची घाणेरडी कचराकुंडी बनत चालली आहे, अशी घणाघाती टीका माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली होती. या मुद्यावर, रिपब्लिकन पक्षाने राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याविरोधात अविश्‍वास प्रस्तावही दाखल केला होता.

माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकेत आलेल्या तसेच घुसखोरी करणार्‍या निर्वासितांविरोधात आक्रमक भूमिका स्वीकारली होती. मेक्सिको सीमेवरून घुसखोरी करणार्‍या निर्वासितांना रोखण्यासाठी ‘मेक्सिको वॉल’च्या उभारणीबरोबरच ‘रिमेन इन मेक्सिको’सारखे धोरणही राबविले होते. त्यात मेक्सिकोतून अमेरिकेत येणार्‍या निर्वासितांची प्राथमिक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांना मेक्सिकोतच ठेवण्याच्या तरतुदीचा समावेश होता. त्यामुळे बेकायदेशीररित्या अमेरिकेत येऊ पाहणारे हजारो निर्वासित मेक्सिकोतच अडकून पडले होते. या निर्वासितांविरोधात मेक्सिको सरकारलाही कारवाई करणे भाग पडले होते. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे सीमेवरून घुसखोरी करणार्‍या निर्वासितांच्या संख्येत मोठी घट दिसून आली होती.

मात्र बायडेन यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर एकापाठोपाठ बेकायदा निर्वासितांना मोकळीक देणारे निर्णय घेण्यास सुरुवात केली होती. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर काही दिवसातच ‘रिमेन इन मेक्सिको’ रद्द करून अवैध निर्वासितांसाठी अमेरिकेच्या सीमा खुल्या केल्या होत्या. बायडेन यांच्या या निर्णयाला गेल्या महिन्यात अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला होता. ट्रम्प यांनी देशात घुसणार्‍या अवैध निर्वासितांना रोखण्यासाठी तयार केलेले ‘रिमेन इन मेक्सिको’ धोरण राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी पुन्हा लागू करावे, असा आदेश अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. आता नव्या सर्वेक्षणांमधून अमेरिकी जनताही बायडेन यांना धक्का देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘रासमुसेन रिपोर्टस्’च्या सर्वेक्षणात, ५१ टक्के नागरिकांनी ट्रम्प यांची धोरणे चांगली होती, असे मत नोंदविले आहे. ११ टक्के जणांनी दोन्ही राष्ट्राध्यक्षांची धोरणे समानच असल्याचे म्हंटले आहे. बहुतांश नागरिकांनी हैतीतील निर्वासितांना अमेरिकेत मोकळे सोडण्याच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गेल्याच आठवड्यात, ‘गॅलप पोल’च्या सर्वेक्षणातही ५३ टक्के नागरिकांनी बायडेन यांच्या कारभाराविरोधात निराशाजनक मत नोंदविले होते. आयोवा प्रांतातील एका सर्वेक्षणात हेच प्रमाण ६२ टक्क्यांवर गेल्याचे समोर आले होते.

leave a reply