कोरोना साथीचे मूळ चीनच्या वुहान प्रयोगशाळेत

- अमेरिकी संसदेच्या नव्या अहवालातील ठपका

वॉशिंग्टन – कोरोनाची साथ चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतूनच सुरू झाली, असा ठपका ठेवणारा नवा अहवाल अमेरिकेच्या संसदेने प्रसिद्ध केला आहे. वुहानच्या प्रयोगशाळेत सुरक्षेच्या बाबतीत हलगर्जीपणा झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी समोर आल्या असून कोरोना विषाणूचा झालेला प्रसारही अशाच बेजबाबदारपणाचा भाग असल्याचे अमेरिकी सिनेटने तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे. अमेरिकी यंत्रणांकडून कोरोना साथीबाबत सुरू असलेल्या तपासात चीनच्या असहकार्यामुळे अडथळे आल्याचा आरोपही अहवालात करण्यात आला.

कोरोना साथीचे मूळ चीनच्या वुहान प्रयोगशाळेत - अमेरिकी संसदेच्या नव्या अहवालातील ठपकाअमेरिकेने कोरोना साथीसाठी चीनला जबाबदार धरण्याची गेल्या तीन महिन्यांमधील ही तिसरी वेळ ठरली आहे. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने आपल्या अहवालात कोरोना विषाणूची निर्मिती व फैलाव वुहानच्या प्रयोगशाळेतूनच झाल्याचा निष्कर्ष नोंदविला होता. त्यानंतर मार्च महिन्यात ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ने(एफबीआय) आपल्या अहवालात, कोरोना साथीचे मूळ चीनच्या वुहान प्रयोगशाळेत झालेल्या अपघातात असल्याचे म्हटले होते. आता अमेरिकी संसदेच्या अहवालातही, वुहान प्रयोगशाळेकडे निर्देश करण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनाच्या उगमाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर येत असल्याचे दिसते.

रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर रिचर्ड बर यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या पथकाकडून कोरोनासंदर्भातील अहवाल तयार करण्यात आला. ‘मडी वॉटर्स: द ओरिजिन ऑफ कोविड-19’ असे या अहवालाचे नाव आहे. तीनशेहून अधिक पानांच्या या अहवालात, चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतील प्रयोगांकडे तसेच जैविक सुरक्षेच्या मुद्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. कोरोना साथीचे मूळ चीनच्या वुहान प्रयोगशाळेत - अमेरिकी संसदेच्या नव्या अहवालातील ठपकाचीनमध्ये कोरोनाच्या विषाणूवर संशोधन सुरू होते व वुहानची प्रयोगशाळा त्याचे केंद्र होते, असा दावा अहवालात करण्यात आला. कोरोना विषाणूची नैसर्गिक उत्पत्ती दाखविणारे कोणतेही निश्चित व ठोस पुरावे समोर आले नसल्याकडेही अहवालाने लक्ष वेधले आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उघडपणे कोरोनाचा उल्लेख ‘वुहान व्हायरस’ व ‘चायना व्हायरस’ असा केला होता. सदर विषाणू व साथ चीनमधूनच फैलावल्याकडे ट्रम्प यांनी सातत्याने लक्ष वेधले होते. पण त्यावेळी डेमोक्रॅट पक्ष, प्रसारमाध्यमे, संशोधक व सोशल मीडियाने ट्रम्प यांचे दावे उडवून लावले होते.

2019 सालच्या अखेरीस चीनच्या वुहान शहरातून उगम पावलेल्या कोरोनाच्या साथीने जगभरात हाहाकार उडविला होता. या साथीत जवळपास 70 लाखांहून अधिक जणांचा बळी गेला असून अद्यापही काही देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. काही दिवसांपूर्वी चीनने यासंदर्भात एक अहवालही प्रसिद्ध केला होता. या अहवालात चीनने आपल्यावर झालेले आरोप धुडकावून लावले होते. मात्र चीनच्या या अहवालानंतरही ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने (डब्ल्यूएचओ) चीनकडून अधिक सहकार्य व स्पष्टीकरणाची गरज आहे, अशी मागणी केली होती.

हिंदी English

 

leave a reply