लॉकडाऊनच्या कालावधीत चीनच्या शांघाय शहरात कोरोनामुळे 50 जणांचा बळी

- स्थानिकांमध्ये तीव्र असंतोष

शांघाय – सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने पुन्हा लादलेले कठोर निर्बध, जीवनावश्यक वस्तूंची टंचाई व सेन्सॉरशिप यामुळे चीनच्या शांघायमधील जनतेत असंतोषाची भावना तीव्र झाली आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस लागू करण्यात आलेला लॉकडाउन महिना पूर्ण होत असतानाही मागे घेण्यात आलेला नाही. काही दिवसांकरीता शिथिल केलेल्या निर्बंधांनंतर पुन्हा कठोर लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाली आहे. ही अंमलबजावणी करताना जुन्या समस्या कायम असल्याने शांघायमधील जनतेत संताप व नाराजीची भावना आहे. विविध माध्यमांमधून जनतेचा असंतोष बाहेर पडत आहे. याच कालावधीत शहरातील सुमारे 50 रुग्णांचा कोरोना साथीत मृत्यू झाला आहे.

शांघाय हे चीनसह आशिया खंडातील प्रमुख आर्थिक व व्यापारी केंद्र म्हणून ओळखण्यात येते. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून या शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली होती. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाऊन जाहीर करून हे निर्बंध 5 एप्रिलपर्यंत असतील, अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र त्यानंतर परिस्थिती सुधारण्याऐवजी अधिकाधिक बिघडत चालली आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत भर पडत असून बळींची संख्याही वाढते आहे. गेल्या 48 तासांमध्ये शांघायमध्ये कोरोनाचे 35 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत, तर 23 जणांचा मृत्यू झाला आहे.

जवळपास महिना पूर्ण होत आला असतानाही निर्बंधांमधून मोकळीक मिळण्याऐवजी ते अधिकच कठोर झाल्याने स्थानिक जनतेच्या संतापाचा कडेलोट होताना दिसत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांशी झटापट व वाद होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. काही भागांमध्ये लोकांनी एकत्र येऊन आरोग्य कर्मचारी तसेच सुरक्षेसाठी तैनात जवानांना शिवीगाळ केल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. चीनच्या सोशल मीडियावरही असंतोषाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. शांघायमधील परिस्थिती दाखविणाऱ्या एक सहा मिनिटांच्या व्हिडिओला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.

‘व्हॉईस ऑफ एप्रिल’ असे नाव असलेल्या या व्हिडिओमध्ये लॉकडाऊनच्या काळातील शांघायमधील स्थिती दाखविण्यात आली आहे. त्यात लोकांकडून ‘हेल्प’ अशी दिली जाणारी हाक, वादविवाद, हताश नागरिक, चाचणीसाठी लागलेल्या रांगा अशा वेगवेगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे. चीनच्या सत्ताधाऱ्यांनी तातडीने हालचाली करून हा व्हिडिओ हटविला असला तरी त्यानंतरही त्याचे पडसाद सोशल मीडियावर उमटत आहेत. अनेक युजर्सनी वुहानमध्ये दोन वर्षांपूवी घडलेल्या घटनांची तुलना करून काहीच बदल झालेला नाही, अशी खंत व्यक्त केली आहे.

दरम्यान, राजधानी बीजिंगमध्ये 10 शालेय विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याचे वृत समोर आले आहे. या वृत्तामुळे चीनच्या सत्ताधारी वर्तुळात खळबळ उडाली असून शहराच्या विविध भागांमध्ये तातडीने व्यापक चाचण्या सुरू करण्यात आल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली.

leave a reply