केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांचा अमेरिकेला इशारा

वॉशिंग्टन – भारताचे रशियाबरोबरील संरक्षणविषयक सहकार्य रोखणे, हे आपले ध्येय असल्याची कबुली अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनने दिली आहे. पेंटॅगॉनचे प्रवक्ते जॉन किरबाय यांनी ही घोषणा केली. याद्वारे पुढच्या काळात रशियाबरोबरील भारताच्या सहकार्याबाबत अमेरिका अधिक कठोर निर्णय घेणार असल्याचे संकेत किरबाय यांनी दिले आहेत. त्याचवेळी अमेरिकेला भारताचे महत्त्व मान्य असल्याचे सांगून भारताबरोबरील मैत्री अमेरिकेसाठी महत्त्वाची ठरते, अशी सारवासारव किरबाय यांनी केली. मात्र खरोखरच अमेरिकेला भारताशी मैत्री हवी असेल, तर मित्रदेशाला कमकुवत करण्याचे प्रयत्न अमेरिकेने सोडून द्यायला हवे, असा टोला भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लगावला आहे.

जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या बैठकीसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अमेरिकेच्या भेटीवर आहेत. त्याच्या आधी भारत व अमेरिकेमधील टू प्लस टू चर्चेसाठी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर व संरक्षणमंत्री राजनाथ सिंग अमेरिकेच्या भेटीवर होते. यावेळी भारत रशियाकडून खरेदी करीत असलेल्या इंधनाचा मुद्दा अमेरिकेकडून उपस्थित करण्यात आला होता. त्याला परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिले. भारताच्या कितीतरी अधिक पट युरोपिय देश रशियाकडून इंधनाची खरेदी करीत आहेत, त्याकडे अमेरिका लक्ष द्यायला तयार नाही, या दुटप्पीपणावर जयशंकर यांनी बोट ठेवले होते. तसेच भारताने रशियाकडून खरेदी केलेल्या हवाई सुरक्षा यंत्रणेच्या व्यवहारानंतर भारतावर निर्बंध लादायचे की नाही, ते सर्वस्वी अमेरिकेनेच ठरवायचे आहे, असेही जयशंकर पुढे म्हणाले होते.

अमेरिकेच्या निर्बंधांची भारत पर्वा करणार नाही, असा इशाराच याद्वारे परराष्ट्रमंत्र्यांनी दिला होता. त्यानंतरही अमेरिकेने रशियाबरोबरील सहकार्यावरून भारतावर दडपण टाकण्याच्या हालचाली सोडून दिलेल्या नाहीत. अर्थमंत्री सीतारामन अमेरिकेत असतानाही, पेंटॅगॉनच्या प्रवक्त्यांनी अमेरिका रशियाबरोबरील भारताचे संरक्षणविषयक सहकार्य खपवून घेणार नसल्याचा संदेश दिला आहे. यासाठी अमेरिका अधिक कठोर धोरण स्वीकारणार असल्याची धमकीच पेंटॅगॉनच्या प्रवक्त्यांनी केलेल्या विधानातून समोर येत आहे. मात्र अर्थमंत्री सीतारामन यांनी यावरून अमेरिकेला समज दिली आहे.

देशाच्या उत्तर व पश्चिमेला लाभलेल्या शेजाराचा, अर्थात चीन व पाकिस्तान या शेजारी देशांकडून भारताला मिळणाऱ्या सुरक्षाविषयक आव्हानांची जाणीव अर्थमंत्री सीतारामन यांनी करून दिली. कोरोनाची साथ असतानाही भारताच्या उत्तरेकडील सीमेवर तणाव निर्माण झाला होता. तर पश्चिमेकडील सीमेवरील परिस्थितही आव्हानात्मकच आहे. याबरोबरच अफगाणिस्तानातील दहशतवादविरोधी कारवाईसाठी मिळालेली शस्त्रास्त्रे भारताच्या विरोधात वापरली जातात. अशा परिस्थितीत भारतासमोर दुसरा पर्याय असू शकत नाही, असे सांगून रशियाबरोबरील भारताच्या संरक्षणविषयक सहकार्याचे सीातारामन यांनी जोरदार समर्थन केले.

जर अमेरिकेला भारताबरोबर मैत्री अपेक्षित असेल, तर मग मित्रदेशाला कमकुवत करण्याचे प्रयत्न अमेरिकेने सोडून द्यायला हवेत, अशा नेमक्या शब्दात अर्थमंत्री सीतारामन यांनी अमेरिकेला प्रत्युत्तर दिले. पाकिस्तान व चीनबाबतचे बायडेन प्रशासनाचे धोरण, भारताचा विश्वासघात करणारे आहे. त्यामुळे भारत रशियासारख्या आपल्या पारंपरिक मित्रदेशाशी सहकार्य करण्याचे नाकारून पूर्णपणे अमेरिकेवर विसंबून राहू शकत नाही, याची जाणीव सीतारामन यांनी परखड शब्दात करून दिली. त्याचवेळी सध्या बायडेन यांच्या नेतृत्त्वाखाली असलेली अमेरिका भारताला कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहे, हे देखील अर्थमंत्र्यांनी राजनैतिक भाषेत मांडल्याचे दिसत आहे. अशा कारवाया करून अमेरिकेला भारताकडून मैत्री तसेच सहकार्याची अपेक्षा ठेवता येणार नाही, हा संदेशही सीतारामन यांच्या विधानातून देण्यात आला आहे.

leave a reply