चीनने जाहीर करण्याच्याही किमान दोन आठवडे आधी कोरोनाच्या साथीची सुरुवात झाली

- अमेरिकी संशोधकाचा दावा

वॉशिंग्टन/बीजिंग – चीनच्या राजवटीने ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’सह (डब्ल्यूएचओ) जगाला सांगण्यापूर्वी किमान १५ दिवस आधी आपल्याला वुहानमध्ये कोरोनाची साथ सुरू झाल्याची माहिती मिळाली होती, असा खळबळजनक दावा आघाडीचे अमेरिकी संशोधक इयान लिपकिन यांनी केला आहे. कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक असलेल्या लिपकिन यांना ‘सार्स’संदर्भातील संशोधनाबद्दल काही वर्षांपूर्वी चीननेच सन्मानित केले होते. त्यामुळे लिपकिन यांनी केलेले वक्तव्य चीनच्या राजवटीला बसलेली सणसणीत चपराक ठरली आहे.

दिग्दर्शक स्पाईक ली यांनी तयार केलेल्या एका माहितीपटात, प्राध्यापक लिपकिन यांनी आपल्याला वुहानमधील नव्या साथीबद्दल १५ डिसेंबरला कळल्याचे सांगितले. चीनच्या आरोग्य यंत्रणेतील तसेच सरकारमधील काही मित्रांच्या सहाय्याने आपण कोरोनाच्या साथीसंदर्भात माहिती मिळवत होतो, असे लिपकिन यांनी नमूद केले. चीनच्या ग्वांगझाऊ विद्यापीठातील संशोधक लु जिआहाई यांनी आपल्याला कोरोनाच्या साथीबाबत वेळोवेळी माहिती पुरविल्याचा दावाही अमेरिकी संशोधकांनी केला.

प्राध्यापक लिपकिन यांनी २०२० साली चीनला भेट देऊन कोरोना साथीसंदर्भात माहितीही घेतली होती. चीनवरून माघारी आल्यानंतर लिपकिन यांनाही कोरोनाची लागण झाली होती. सुरुवातीच्या काळात त्यांनी वुहान लॅबमधून व्हायरस पसरला असावा, या दाव्याला स्पष्ट विरोध केला होता. तसेच चीनने कोरोनाविरोधात केलेल्या उपायांचीही प्रशंसा केली होती. मात्र वुहान लॅबमधील काही प्रयोगांबद्दल कळल्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलली होती.

चीनच्या संशोधकांबरोबर जवळपास दोन दशके काम केलेल्या व चिनी राजवटीकडून सन्मानित झालेल्या संशोधकानेच चीनचा खोटेपणा समोर आणल्याने चीनची पुन्हा एकदा कोंडी झाल्याचे दिसत आहे. गेल्या काही महिन्यात कोरोनाची साथ चीनच्या वुहान लॅबमधूनच सुरू झाली व चीनने सांगण्यापूर्वीच त्याचा फैलाव सुरू झाला होता, हे सांगणारी माहिती सातत्याने समोर येत आहे. ही माहिती समोर आणणारे जागतिक स्तरावरील नावाजलेले संशोधक व तज्ज्ञ आहेत. त्यामुळे त्यांचा प्रतिवाद करण्यात चीन अपयशी ठरताना दिसत आहे.

२०१९ साली कोरोनाव्हायरसची सुरुवात झाल्यापासून चीनची याबाबतची भूमिक संशयास्पद राहिली आहे. आपल्यावर ठेवण्यात येणारा ठपका टाळण्यासाठी चीनने कोरोनाव्हायरसची माहिती सातत्याने दडपून ठेवली. तसेच त्याचा उगम इतर देशांमध्ये झाल्याचे फुटकळ दावेही प्रसिद्ध केले. कोरोना साथीबाबत बोलणार्‍या चिनी संशोधकांची बोलती बंद करण्यात आली. अनेक पत्रकारांनाही गायब करण्यात आले होते.

मात्र चीनकडून सुरू असणार्‍या या प्रयत्नांच्या पार्श्‍वभूमीवर, अमेरिका व युरोपिय देशांसह जगातील प्रमुख देशांनी कोरोनाव्हायरसचा उगम चीनमधूनच झाल्याचा ठपका ठेवला होता. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वर्षी कोरोनाव्हायरसचा उगम चीनच्या वुहान लॅबमधूनच झाल्याचा उघड आरोप केला होता. त्यानंतर अमेरिकेच्या अनेक वरिष्ठ नेते, अधिकारी तसेच संशोधकांनी वुहान प्रयोगशाळेकडेच बोट दाखविले होते. गेल्याच महिन्यात ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’चे (डब्ल्यूएचओ) प्रमुख संशोधक पीटर बेन एम्बारेक यांनी, कोरोनाव्हायरसचा पहिला रुग्ण (पेशंट झिरो) चीनच्या वुहान लॅबमधील कर्मचारीच असावा, त्यामुळे ही साथ वुहान लॅबमधूनच सुरू झाली असण्याची शक्यता अधिक आहे, असा दावा केला होता. अमेरिकेतील तसेच युरोपातील काही संशोधकांनी नोव्हेंबर महिन्यातच कोरोनाची साथ सुरू झाल्याची माहिती प्रसिद्ध केली होती.

leave a reply