जगभरात कोरोनाचा फैलाव वाढला

बीजिंग – सोमवारी कोरोनाव्हायरसने जगभरात २,७०० हून अधिक जणांचा बळी घेतला असून जगभरात ८० हजाराहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर आत्तापर्यंत १५ लाखांहून अधिक जण या साथीतून बरे झाले आहेत. अमेरिका, रशिया, ब्राझिलमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडत असल्याचे जॉन हॉप्किन्स विद्यापीठाच्या माहितीतून उघड झाले. तर या साथीचे उगमस्थान असलेल्या वुहानमध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर चीनवरील टीकेची तीव्रता अधिकच वाढली आहे. अशा परिस्थितीत, चीनने वुहान शहरातील सुमारे एक कोटी दहा लाख जणांची फेरचाचणी घेण्याची घोषणा केली आहे.

जगभरात कोरोनाव्हायरसमुळे दगावलेल्यांची संख्या २,८७,७००च्या पुढे गेल्याचे जॉन हॉप्किन्स विद्यापीठाने जाहीर केले. यामध्ये अमेरिकेतील ८१,७९५ तर युरोपातील १,५४,१४२, लॅटीन अमेरिकेतील १७,०४८ आणि आफ्रिकेतील २,३५५ बळींचा समावेश आहे. गेल्या चोवीस तासात अमेरिकेत ८३० तर ब्राझिलमध्ये ३९६, फ्रान्समध्ये २६३, ब्रिटनमध्ये २१०, इटलीत १७९, स्पेनमध्ये १२३ व रशियात १०७ जणांचा बळी गेला आहे.

या साथीचे जगभरात जवळपास ४३ लाख रुग्ण असून यापैकी १५,३७,७०० जण उपचारांती बरे झाले आहेत. एकट्या अमेरिकेत कोरोनाव्हायरसचे १३,८५,७४२ रुग्ण असून युरोपात १६,६५,४०५ रुग्णांची नोंद झाली आहे. येत्या आठवड्याअखेरीपर्यंत अमेरिकेत एक कोटी जणांची कोरोना चाचणी पूर्ण करणार असल्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. तर रशियामध्ये गेल्या चोवीस तासात १०,८९९ रुग्ण आढळले असून याबरोबर रशियातील या साथीच्या रुग्णांची संख्या २,३२,२४३ वर पोहोचली आहे.

अमेरिका, युरोप, लॅटीन अमेरिका आणि आफ्रिकेत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत असताना, या साथीचे उगमस्थान असलेल्या चीनच्या वुहान शहरात या साथीची दुसरी लाट धडकली आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये वुहान शहरात २० हून अधिक रुग्ण सापडल्यानंतर चीन सरकारने स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाई केली आहे. तसेच संपूर्ण वुहान शहरात पुन्हा कोरोनाच्या चाचण्या घेणार आहे. पुढील दहा दिवस ही चाचणी सुरू राहणार असल्याची घोषणा वुहानच्या प्रशासनाने केली.

वूहान शहर कोरोनाच्या साथीतून मुक्त झाल्याचा दावा करून चीनने आपण या साथीच्या विरोधातील युद्धात विजय मिळविला असे घोषित केले होते. तसेच युरोपात ही साथ थैमान घालत असताना या साथीवर मात करण्यासाठी चीन आपल्या अनुभवाचा लाभ युरोपीय देशांना करून देईल, असे दावेही चीनने ठोकून दिले होते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत चीनच्या राजदूतांनी आपला देश या साथीच्या विरोधात साऱ्या जगाला सहाय्य करीत असल्याचे मोठ्या अभिमानाने सांगितले होते. पण आता चीनने केलेले हे सारे दावे खोटे असल्याचे वूहानमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या रूग्णांनी दाखवून दिले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनच्या विश्वासार्हतेला अधिकच धक्का बसल्याचे दिसत आहे.

leave a reply