पंतप्रधानांची २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा

१७ मे नंतर लॉकडाऊनचा चौथा टप्पा

नवी दिल्ली – ”कोरोनाविरोधी लढाईत सतर्क राहून व नियमांचे पालन करून आपले संरक्षण करायचे आहे आणि प्रगतीही साधायची आहे. जगातील आजची स्थिती पाहता ‘आत्मनिर्भर’ होणे हा एकमेव पर्याय आपल्यासमोर आहे आणि आत्मनिर्भरतेचा हा संकल्प संकटापेक्षा विराट असायला हवा” असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विविध उद्योग क्षेत्रासाठी २० लाख कोटी रुपयांच्या घसघशीत पॅकेजची घोषणा केली. हे आर्थिक पॅकेज ‘आत्मनिर्भर भारत अभियाना’साठी महत्वाचा भाग ठरेल, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. तसेच पंतप्रधानांनी लॉकडाऊनच्या पुढील टप्प्याचीही घोषणा केली असून याचे नियम वेगळे असतील, असा संदेश दिला आहे.

”२१वे शतक भारताचे असेल हे आपले स्वप्न नाही, तर आपली जबाबदारी आहे. भारताकडून जगालाही मोठ्या अपेक्षा असून भारतीयांचा आत्मनिर्भर बनण्याचा संकल्प हाच सध्याच्या जागतिक स्थितीत एकमेव मार्ग आहे. भारतीय संस्कृतीने कधीही आत्मकेंद्रित विचार केलेला नाही. ‘वसुधैव कुटुंबकम्’ हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे आणि भारताचा ‘आत्मनिर्भरते’चा विचार यावरच आधारलेला आहे.”, असे पंतप्रधानांनी जनतेशी संवाद साधताना म्हटले आहे. ” स्वयंपूर्ण भारताची ही इमारत पाच खांबांवर उभी असेल. अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, प्रशासन व्यवस्था, जनसांख्यिकी आणि मागणी हे ते पाच खांब आहेत. कोरोनाच्या संकटाशी सामना करताना स्वावलंबी भारताच्या नव्या संकल्पासह आर्थिक पॅकेजची घोषणा करीत आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.

देशातील सर्व प्रकारच्या उद्योगांना चालना देण्यासाठी हे पॅकेज असून हे पॅकेज भारताच्या सकल उत्पादन दाराच्या (जीडीपी) १० टक्के इतके असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. स्वावलंबी भारताच्या संकल्पाला तडीस नेण्यासाठी या पॅकेजमध्ये जमीन, मजूर, रोखता आणि कायदा याकडे लक्ष पुरविण्यात आले आहे. कुटीर उद्योग, गृह उद्योग, लघु आणि माध्यम उद्योगांसाठी हे पॅकेज असून कोट्यवधींना रोजगार देणारे हे उद्योग आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाचा मजबूत आधार असल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. शेतकरी, मजूर आणि प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या मध्यमवर्गासाठी हे पॅकेज असून अर्थमंत्री लवकरच याबाबत सविस्तर माहिती देतील, असे पंतप्रधानांनी सांगितले.

तसेच कोरोनाच्या संकटाने आपल्याला स्थानिक उत्पादन, स्थानिक बाजार आणि स्थानिक पुरवठ्याचे महत्व पटवून दिले आहे. त्यामुळे या ‘लोकल’साठी ‘व्होकल’ बना. अर्थात स्थानिक उत्पादनांचा पुरस्कार करा, स्थानिक उत्पादने खरेदी करण्याचा आग्रह धरा आणि त्याचा गर्वाने प्रचारही करा, असा संदेश पंतप्रधानांनी दिला. आज आंतरराष्ट्रीय असलेले ब्रँड कधीकाळी ‘लोकल’ होते हे विसरू नका. आपला देश हे करू शकतो, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

कोरोनाच्या संकटाशी आपली लढाई सुरु राहणार आहे. जगातील सर्व तज्ज्ञांनी ही लढाई फार काळ चालणार असल्याचेच म्हटले आहे. त्यामुळे १७ मे नंतर लॉकडाऊन सुरु राहणार असेल. पण तो वेगळ्या स्वरूपात असेल, अशी घोषणा पंतप्रधानांनी केली. यासंबंधी माहिती १८ मे आधी दिली जाईल, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. संकटाच्या या काळात मोठी मोठी राष्ट्र डगमगली आहेत, मात्र या परिस्थितीतही देशातील गरीब जनतेने संघर्ष आणि संयमाच्या शक्तीचे दर्शन घडविले आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

दरम्यान, देशातील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येने ७४ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. मंगळवारी महाराष्ट्रात ५३ जणांचा या साथीत बळी गेला, तर १,०२६ नवे रुग्ण आढळले. मुंबईत २८ जण दगावले असून शहरातील एकूण रुग्णांची संख्या १५०००च्या पुढे पोहोचली आहे.

leave a reply