देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या एक लाख ८० हजारांवर

बळींची संख्या पाच हजारांवर पोहोचली

नवी दिल्ली – देशातील कोरोनामुळे दगावलेल्यांची संख्या पाच हजारांच्या पुढे गेली असून एकूण रुग्णांची संख्या एक लाख ८० हजारांवर  पोहोचली आहे. शुक्रवारपासून शनिवारच्या सकाळपर्यंत देशात २६४ जणांचा या साथीने बळी गेला आणि तब्बल ७ हजार ९९४ नवे रुग्ण आढळले. गेल्या काही दिवसांपासून देशात दिवसाला सहा हजाराहून अधिक नवे रुग्ण आढळत होते. मात्र आता दिवसाला सुमारे आठ हजार नव्या रुग्णांची नोंद होऊ लागल्याने चिंतेत भर पडली आहे.

गेल्या अकरा दिवसात देशात ७३,४३५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. १९ मे रोजी देशातील या साथीच्या रुग्णांची संख्या १,००,३२८ होती., तर शनिवारच्या सकाळपर्यंत देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या १,७३,७६३ वर पोहोचली. तसेच या साथीच्या एकूण बळींची संख्या  ४,९७१ झाली आहे. एका दिवसात कोरोनाच्या बळींचा आणि नव्या रुग्णांच्या नोंदीचा आतापर्यंतचा नवा उच्चांक शनिवारी नोंदविण्यात आला. तसेच शनिवारी रात्रीपर्यंत राज्यांनी जाहीर केलेल्या माहितीवरून देशात या साथीने दगावलेल्यांची संख्या पाच हजारांच्या पुढे गेली असून एकूण संख्या १,८०००० जवळ पोहोचल्याने स्पष्ट होते. 

शनिवारी  महाराष्ट्रात ९९ जण या साथीने दगावले, तर दिवसभरात २,९४० नवे रुग्ण आढळले. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ६५ हजारांवर पोहोचली आहे. मुंबईत चोवीस तासात ५४ जण कोरोनाने दगावले, तर  १,५१० नवे रुग्ण सापडले. त्यामुळे मुंबईतील रुग्णांची संख्या ३८,५०० च्या पुढे गेली आहे. महाराष्ट्रात शुक्रवारी ११४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. यामुळे राज्यातील कोरोनाची लागण झालेल्या पोलिसांची संख्या २,३२५ वर पोहोचल्याचीही माहिती समोर येते.आतापर्यंत राज्यात २६ पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झाला  आहे. 

दरम्यान दिल्लीत चोवीस तासात १,१६३ नवे रुग्ण आढळले. मुंबईनंतर एका दिवसात हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळलेले दिल्ली हे देशातील दुसरे शहर ठरले आहे. सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीत हजाराहून जास्त रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे दिल्लीतील रुग्णांची संख्या १८,५०० पर्यंत पोहोचली आहे. या राज्यात आतापर्यंत ४०० रुग्ण कोरोनाने दगावले आहेत. तामिळनाडूतील कोरोनाच्या रुग्णांची संख्या २१ हजारांच्या पुढे गेली असून या राज्यात एका दिवसात ९३८ नवे रुग्ण आढळले. गुजरातमध्ये  ४१२ नवे रुग्ण आढळले, यातील २५३ रुग्ण एकट्या अहमदाबादमध्ये आढळले आहेत. त्यामुळे गुजरातमधील रुग्णांची संख्या १६ हजारांच्या पुढे गेली आहे. 

leave a reply