कोरोनाच्या साथीने जग परस्परावलंबी असल्याचे दाखवून दिले

- परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रिंगला

नवी दिल्ली – जगभरातील प्रमुख देशांनी भारताला आवश्यक असलेल्या वैद्यकीय साहित्याचा पुरवठा सुरू केला आहे. रशियाकडून भारताला सुमारे २० टन इतके वैद्यकीय साहित्य पुरविण्यात आले असून यामध्ये ऑक्सिजन कॉंन्सट्रेटर्स, व्हेंटिलेशनची उपकरणे, मॉनेटर्स व औषधांचा समावेश आहे. याबरोबरच १० कोटी डॉलर्स रक्कमेचे वैद्यकीय सहाय्य घेऊन अमेरिकेच्या विमानाने भारतासाठी उड्डाण केले आहे. आधीच्या काळात भारताने जगाला आवश्यक ते सहाय्य पुरविले होते, आता जगाकडून भारताला सहाय्य मिळत आहे, ही बाब जग परस्परावलंबी असल्याचे दाखवून देते, असे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रिंगला यांनी म्हटले आहे.

ऑक्सिजनचे ५५० प्लांटस्, चार हजार ऑक्सिजन कॉंन्सट्रेटर्स व दहा हजार ऑक्सिजन सिलेंडर्ससह ४० हजार रेमडेसिविर इंजेक्शन्स मिळविण्याचा भारताचा प्रयत्न आहे, अशी माहिती परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रिंगला यांनी दिली. २००४ साली तामिळनाडूमध्ये त्सुनामीचे संकट आल्यानंतर, भारताने आंतरराष्ट्रीय सहकार्य नाकारले होते. पण आता कोरोनाच्या साथीची दुसरी लाट आलेली असताना, भारत आंतरराष्ट्रीय सहकार्य स्वीकारत आहे. याचा अर्थ परदेशी सहाय्याबाबतच्या भारताच्या धोरणात बदल झालेला आहे का, असा प्रश्‍न माध्यमांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना परराष्ट्रसचिव हर्षवर्धन श्रिंगला यांनी याकडे धोरणातील बदल म्हणून पाहता येणार नाही, असे स्पष्ट केले.

कोरोनाची साथ आलेली असताना, भारताने जगभरातील ४० देशांना फार मोठे सहाय्य पुरविले होते. यामध्ये अमेरिका, रशिया, जपान, फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटन या देशांचा समावेश होता. आता हे देश भारताला सहकार्य करीत आहे. हे जग परस्परावलंबी आहे, हे यातून सिद्ध होते, असे परराष्ट्र सचिव श्रिंगला म्हणाले.

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या साथीविरोधात भारताला सहाय्याचा प्रस्ताव दिला होता. पण आपली आरोग्य व्यवस्था भक्कम असल्याचे सांगून भारताने हे सहाय्य नाकारले होते. आमचा सहाय्याचा प्रस्ताव अजूनही भारतासमोर आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. तसेच चीनसारखा देश देखील आपण भारताला सहाय्य करण्यासाठी उत्सुक असल्याचे वारंवार सांगत आहे. पण याबाबत भारत अतिशय सावध भूमिका स्वीकारत आहे.

१५ एप्रिलनंतर भारतातील कोरोनाची साथ प्रचंड प्रमाणात वाढली आणि त्याचा फार मोठा ताण देशाच्या आरोग्य यंत्रणांवर पडला होता. त्यामुळे ऑक्सिजन व इतर आवश्यक साहित्य व औषधांचा तुटवडा भासू लागला होता. मात्र आता ही साथ रोखण्यासाठी आवश्यक असलेली पावले जलदगतीने उचलण्यात येत आहेत. या आघाडीवर भारताला जगभरातील प्रमुख देश सहकार्य करू लागले आहेत.

गेल्या वर्षी कोरोनाची साथ धुमाकूळ घालत असताना, भारताने केलेल्या सहकार्याची कृतज्ञतापूर्ण आठवण ठेवून हे देश आत्ताच्या काळात भारताला सहाय्य पुरविणे ही आपली जबाबदारी असल्याचे मानत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनीही याची कबुली दिली आहे.

leave a reply