रशियन नौदलाचा ब्लॅक सीमध्ये सराव

मॉस्को/किव्ह – रशियाने युक्रेनच्या सीमेजवळून आपले लष्कर माघारी घेतले असले तरी ब्लॅक सीमधील तणाव कमी झालेला नाही. रशियन नौदलाच्या ऍम्फिबियस युद्धनौका, विनाशिका, हेलिकॉप्टर्सनी ब्लॅक सीमध्ये लाईव्ह फायरिंग सराव सुरू केला आहे. रशियाचा हा सराव युक्रेनसह तुर्कीलाही इशारा असल्याचा दावा पाश्‍चिमात्य विश्‍लेषक करीत आहेत. तर रशियाच्या या सरावाला दोन दिवस उजाडत नाहीत, तोच अमेरिकेचे गस्तीजहाज ब्लॅक सीमध्ये दाखल झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून युक्रेनच्या डोन्बास प्रांताच्या सीमेवर निर्माण झालेला तणाव निवळल्याचा दावा केला जातो. रशियाने या भागात केलेली तैनाती कमी केल्याच्या बातम्या येत आहेत. पण इथली लष्करी तैनाती कमी केली असली तरी गेल्या काही दिवसात रशियाने ब्लॅक सीच्या क्षेत्रातील नौदलाची तैनाती वाढविली आहे.

रशियाच्या मोस्कवा विनाशिकेने आपल्या ताफ्यासह क्रिमिआच्या किनारपट्टीजवळच्या सागरी क्षेत्रात युद्धसराव सुरू केला आहे. सदर युद्धसराव युक्रेनसाठी इशारा असल्याचे उघड आहे. पण त्याचबरोबर रशियाच्या विरोधात युक्रेनला लष्करी पाठिंबा देणार्‍या तुर्कीसाठीही इशारा असल्याचे आंतरराष्ट्रीय विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

ब्लॅक सीमधील रशियाच्या या युद्धसरावाला काही तास उलटत नाही तोच अमेरिकेच्या सहाव्या आरमारातील ‘हॅमिल्टन’ गस्तीजहाज बॉस्फोरसचे आखात ओलांडून ब्लॅक सीमध्ये दाखल झाले. या क्षेत्रात तैनात नाटोच्या लष्कराला पाठिंबा देण्यासाठी ही गस्त असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले. तसेच आपल्या या गस्तीचा निर्णय फार आधीच घेण्यात आलेला होता, असे अमेरिकन नौदलाने म्हटले आहे.

leave a reply