दहा दिवसात कोरोनाचे लसीकरण सुरू होणार

- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची घोषणा

नवी दिल्ली – देेशात कोरोनाच्या दोन लसींना मंजुरी मिळाल्यावर लवकरच लसीकरण सुरू होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने  याबाबतची घोषणा केली. येत्या दहा दिवसात देशात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात होईल, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी जाहीर केले. यानुसार १४ ते १५ जानेवारीपासून देशात लसीकरण सुरू होईल, असा अंदाज बांधला जात आहे. तसेच लसीकरण कार्यक्रमाच्या तयारी तपासण्यासाठी पाच राज्यात घेण्यात आलेली ड्राय रन यशस्वी ठरल्याचेही आरोग्य मंत्रालयाकडून अधोरेखित करण्यात आले.

लसीकरण

देशात कोरोना साथीच्या आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांची संख्या १ कोटी ३ लाख ५० हजारांच्या पुढे गेली आहे. तसेच या साथीत दगावलेल्या रुग्णांची संख्या दीड लाखांवर पोहोचली आहे. याशिवाय देशातील १ कोटी कोरोना रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. गेल्या महिनाभरापासून देशात नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण घटले असले, तरी दरदिवशी यासाथीचे १६ ते २० हजार नवे रुग्ण देशात आढळून येत आहेत. त्याचवेळी ब्रिटनमधून आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे धोका वाढला आहे. मंगळवारी केरळात नव्या स्ट्रेनचे ११ रुग्ण आढळले. याआधी देेशात कोरोनाच्या नव्या प्रकाराच्या रुग्णांची संख्या ५८ वर पोहोचली होती. सोमवारच्या दिवसात नव्या स्ट्रेनचे २१ नवे रुग्ण आढळले होते. यामधील आठ महाराष्ट्रातील होते.

या पार्श्‍वभूमीवर देशात कोरोनाच्या दोन लसींना आपत्कालीत वापराची मंजुरी ‘द ड्रग्ज् कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’कडून (डीसीजीआय) देण्यात आली होती. लसींना मिळालेली मंजुरी देशातील कोरोनाविरोधातील लढाईत निर्णायक सिद्ध होईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते.

‘ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेका’ने विकसित केलेल्या ‘कोविशिल्ड’ तसेच ‘भारत बायोटेक’ व ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडीकल रिसर्च’ने (आयसीएमआर) विकसित केलेल्या ‘कोव्हॅक्सिन’ला मिळालेल्या मंजुरीनंतर लसीकरण कधी सुरू होईल, याबाबत प्रश्‍न होते.  मंगळवारी आरोग्य मंत्रालयाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत प्रश्‍न विचारण्यात आला होता. यावेळी येत्या १० दिवसात देशात कोरोनाच्या लसीकरणाला सुरूवात होईल, असे आरोग्य मंत्रालयाच्या अधिकार्‍याने सांगितले आहे. तसेच सुरुवातीच्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोना साथीच्या लढाईत महत्वाचा सहभाग घेणारे इतर कर्मचारी, पोलीस आदींना पहिल्या टप्प्यात लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात एकूण ३० कोटी नागरिकांना लस देण्यात येणार असून यामध्ये सुमारे २७ कोटी नागरिक ५० वर्षांवरील असणार आहेत.

leave a reply