दक्षिण अमेरिकी देशातून लिथियमची आयात करण्याची भारताची तयारी

नवी दिल्ली – लिथियमसाठी आतापर्यंत चीनवर अवलंबून असलेला भारत आता अर्जेंटिना, चिली आणि बोलिव्हियाला या दक्षिण अमेरिकी देशांमधून लिथियम आयात वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. चीनवरील याबाबतीतील निर्भरता पूर्णपणे कमी करण्याच्या दृष्टीने ‘लिथियम ट्रँगल’ असलेल्या देशांशी भारत सहकार्य वाढवित आहे. या देशांमध्ये भारत लिथियमच्या खाणी खरेदी करण्याच्या तयारीत असल्याची बातमी आहे. काही महिन्यांपूर्वीच भारत सरकारच्या खनिज विदेश लिमिटेडने अर्जेंटिनाबरोबर यासाठी एक करार केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. लिथियमचा भरमसाठ साठा असलेल्या या देशांकडून भारताला या खनिजाचा पुरवठा सुरू झाल्यास भारताची चीनवरील निर्भरता कमी होईल. तसेच लिथियमचा पुरवठ्याची शाश्‍वती मिळाल्यास देेशात ईलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्याच्या सरकारच्या योजनेलाही बळ मिळेल.

लिथियमची आयात

भविष्यातील इंधन म्हणून भारताला लिथियम बॅटरीजची आवश्यकता भासणार आहे. पेट्रोल, डिझेलवरील निर्भरता कमी करून देशात ई-वाहनांना चालना देण्याचे धोरण सरकारने आखले आहे. यासाठी सरकार ई-वाहनांच्या खरेदीवर सवलतीही देत आहे. २०३० पर्यंत देशात १०० टक्के ई-वाहने असतील यादृष्टीने सरकार योजना आखत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र यासाठी भारतात लिथियमची असलेली कमतरता हे मोठे आव्हान आहे. केवळ ई-वाहनांसाठी नाही, लॅपटॉप आणि मोबाईलच्या रिचार्जेबल बॅटरिज्ही लिथियमपासूनच बनलेल्या असतात.

भारतात लिथियमचे मोठे साठे नाहीत. गेल्यावर्षाच्या सुरुवातीलाच भारतात बंगळुरूपासून शंभर किलोमीटर अंतरावर लिथियमचा साठा सापडला आहे. मात्र भारताची भविष्यातील गरज भागविण्यासाठी हा साठा पुरेसा नाही. सध्या भारत चीनकडून लिथियम आयात करतो. मात्र गेल्या काही काळात भारत आणि चीनसंबंधत प्रचंड ताणले गेले आहेत. लडाखच्या गलवान खोर्‍यात विश्‍वासघाताने भारतीय सैनिकांवर हल्ला करणार्‍या चीनमधून आयात कमी करण्याचे धोरण भारताने अवलंबले आहे.

या पार्श्‍वभूमीवर भारत आता ‘लिथियम ट्रँगल’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या अर्जेंटिना, चिली, बोलिव्हिया या देशांमधून लिथियम आयात करण्यासाठी आणि येथे लिथियमच्या खाणी खरेदी करण्याचा प्रयत्न करीत आहे. हे देश जगातील सर्वाधिक लिथियम उत्पादन घेणार्‍या अग्रगण्य देशांमध्ये सामील आहे. या तीनही देशांच्या सीमांवर लिथियमचा अगणित साठा असून येथील खाणींमध्ये भारताने स्वारस्य दाखविले आहे. यादृष्टीने गेल्यावर्षी अर्जेंटिनाबरोबर भारताच्या खनिज विदेश लिमिटेडने एक करार केल्याचे वृत्त आहे.

खनिज विदेश लिमिटेडची स्थापना २०१९ सालीच नाल्को, हिंदुस्थान कॉपर, मिनरल एक्सप्लोरेशन लिमिटेड या तीन सरकारी कंपन्यांचे विलिनिकरण करून बनविली होती. देशाला आवश्यक असणार्‍या खनिजाच्या खरेदीची जबाबदारी खनिज विदेश लिमिटेडकडे देण्यात आली आहे.

दरम्यान, ई-वाहनांसाठी लिथियम आर्यन बॅटरिजसाठी आणखी विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ज्यामुळे यांचा चार्जिंग वेळ कमी करता येईल.

leave a reply