१५ ते १८ वयोगटातील मुलांचे कोरोना लसीकरण सुरू होणार

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

नवी दिल्ली – १५ ते १८ वयोगटासाठी देशात ३ जानेवारी २०२२ पासून कोरोनाचे लसीकरण सुरू होईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. तसेच अजूनही कोरोनाच्या रुग्णांची सेवा करीत असलेल्या आरोग्य क्षेत्रात काम करणार्‍या तसेच फ्रंट लाईन वर्कर्सना १० जानेवारी २०२२ पासून कोरोनाचा प्रिकॉशन डोस दिला जाईल, असे पंतप्रधान म्हणाले. तर ६० वर्षावरील व्याधिग्रस्तानांही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार १० जानेवारीपासूनच प्रिकॉशन डोस दिला जाणार असल्याचे पंतप्रधानांनी जाहीर केले. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आणि ख्रिसमसच्या सणाचे औचित्य साधून आपण ही घोषणा करीत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. १५ ते १८ वयोगटातील युवकांचे लसीकरण सुरू झाल्यामुळे शाळा व कॉलेजात जाणार्‍या विद्यार्थ्यांचे मातापिता निर्धास्त होतील, असा विश्‍वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. त्याचवेळी देशाच्या कोरोनाविरोधी लढ्यात महत्त्वपूर्ण योगदान देऊन देशाला सुरक्षित राखणारे आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी तसेच फ्रंटलाईन वर्कर्स यांच्या सुरक्षेसाठी प्रिकॉशन डोस १० जानेवारीपासून सुरू जाईल, असे पंतप्रधान म्हणाले.

१५ ते १८ वयोगटातील मुलांचे कोरोना लसीकरण सुरू होणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणाएक व एकापेक्षा अधिक आजार असलेल्या ६० वर्षांवरील नागरिकांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार १० जानेवारीपासूनच प्रिकॉशन डोस उपलब्ध करून दिला जाणार आहे. याची घोषणा करताना पंतप्रधानांनी कोरोनाच्या लसीबाबत कुठल्याही भ्रम किंवा अफवांना बळी पडू नका, असे आवाहन जनतेला केले.

जगभरात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिअंटचे संक्रमण वाढत आहे. याबाबत देश वेगवेगळे अनुभव व निष्कर्ष मांडत आहेत. भारतीय संशोधक त्यावर बारकाईने नजर ठेवून आहेत. भारताही याचे संक्रमण आढळले असले तरी घाबरण्याचे कारण नाही. कारण कोरोनाचा विषाणू म्युटेट होत असताना, देशाचा निर्धार व क्षमताही अधिकाधिक विकसित होत आहे, असा विश्‍वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. कोरोनाच्या साथीला घाबरण्याचे कारण नसले तरी याबाबत सावध राहण्याचा संदेश पंतप्रधानांनी जनतेला दिला.

मास्कचा वापर व थोड्या अंतराने हात स्वच्छ ठेवण्यासारख्या मुलभूत गोष्टी आपल्याला विसरून चालणार नाहीत. व्यक्तीगत पातळीवर देण्यात आलेल्या या सूचनांचे पालन हे कोरोनाविरोधी लढ्यातील सर्वात मोठे शस्त्र ठरते. तर लसीकरण हे कोरोनाविरोधी लढ्यातील दुसरे प्रभावी शस्त्र आहे. या वर्षी १६ जानेवारीपासून देशात कोरोनाचे लसीकरण सुरू झाले. आत्तापर्यंत देशात याचे १४१ कोटी डोस देण्यात आले आहेत. या यशामागे सामुदायिक इच्छाशक्ती व प्रयास असल्याचे सांगून पंतप्रधानांनी त्यावर समाधान व्यक्त केले.

१८ वर्षापुढील वयोगटात येणार्‍या सुमारे ९० टक्के इतक्या नागरिकांना कोरोनाच्या लसीचा पहिला डोस मिळालेला आहे. तर याच वयोगटातील देशातल्या ६१ नागरिकांना दोन्ही डोस मिळालेले आहेत, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. हे देशाच्या आरोग्य यंत्रणेला मिळालेले मोठे यश ठरते, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. तसेच कोरोनाच्या साथीचा मुकाबला करण्यासाठी देशाच्या आरोग्यविषयक क्षमतेत मोठी वाढ करण्यात आल्याचा दावा पंतप्रधानांनी केला.

यानुसार देशात १८ लाख आयसोलेशन बेडस्, पाच लाख ऑक्सिजन सपोर्टेड बेडस्, एक लाख ४० हजार आयसीयू बेडस् उपलब्ध आहेत. तसेच देशात तीन हजाराहून अधिक पीएसए ऑक्सिजन प्लांटस्, चार लाख ऑक्सिजन सिलेंडर्स तयार आहेत. याबरोबरच कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या औषधांचा अतिरिक्त साठा तयार करण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना सहाय्य केलेले आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

leave a reply