तैवानच्या हवाई हद्दीत चीनची नवी घुसखोरी

तैवानच्या हवाई हद्दीततैपेई – चीनने पाणबुडीभेदी विमान तैवानच्या हवाई क्षेत्रात रवाना करून तैवानला आणखी एक चिथावणी दिली आहे. शनिवारी चीनच्या या विमानाने तैवानच्या ‘एअर डिफेन्स आयडेंटीफिकेशन झोन’मध्ये शिरकाव केला होता. याआधीही चीनच्या लढाऊ विमाने तैवानच्या हवाई क्षेत्रात घुसखोरी केल्याचे उघड झाल होते. याद्वारे चीन तैवानच्या हवाई क्षेत्रातील घुसखोरी ही सर्वसामान्य बाब असल्याचे चित्र उभे करीत आहे. याद्वारे तैवानवरील लष्करी दडपण कायम ठेवण्याचे चीनचे डावपेच असल्याचा दावा जगभरातील विश्‍लेषकांकडून केला जातो.

चीनच्या आक्रमकतेविरोधात तैवाननेही हालचाली सुरू केल्या असून लोकशाहीवादी देशांबरोबरील लष्करी तसेच इतर पातळ्यांवरील सहकार्य अधिकच दृढ केले आहे. याचे परिणाम दिसू लागले असून जपान व भारतासह युरोपिय देश देखील तैवानच्या या प्रयत्नांना प्रतिसाद देत आहेत. लिथुआनिया या युरोपिय देशाने तैवानबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. यावर संतापलेल्या चीनने लिथुआनियाला इतिहासाच्या कचर्‍यात फेकून देऊ, अशी धमकी दिली होती. लिथुआनियाच्या संसद सदस्याने याला प्रत्युत्तर दिले असून इतिहासाच्या कचर्‍यात साम्यवादाचा समावेश फार आधीच झालेला आहे, असे चीनला सुनावले होते.

युरोपिय महासंघाने लिथुआनियाला पाठिंबा देण्याची घोषणा केली असून चीनच्या अरेरावीला कडाडून विरोध केला आहे. तर तैवानने सेमीकंडक्टर क्षेत्रात लिथुआनियाबरोबर सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी ख्रिसमसच्या दिवशी चीनने आपले पाणबुडभेदी विमान तैवानच्या हवाई क्षेत्रात धाडून पुन्हा एकदा तैवानवरील दडपण वाढविण्याचा प्रयत्न केला होता. तैवानच्या माध्यमांनी याची माहिती दिली. पण रविवारी तैवान लिथुआनियाबरोबर सेमीकंडक्टर क्षेत्रात सहकार्य करण्याची बातमी आली आहे. याद्वारे लष्करी तसेच राजनैतिक पातळीवरही तैवान चीनच्या आक्रमकतेला प्रभावी उत्तर देत असल्याचे समोर येत आहे.

तैवानच्या हवाई हद्दीतअमेरिका व जपानने तैवानच्या सुरक्षेसाठी लष्करी सराव सुरू केल्याच्या बातम्या नुकत्याच प्रसिद्ध झाल्या होत्या. ब्रिटन, फ्रान्स व जर्मनी हे देश देखील तैवानबाबत चीनने स्वीकारलेल्या धोरणांना कडाडून विरोध करीत आहेत. भारताने तैवानबरोबर सहकार्य व्यापक करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. यामुळे संतापलेला चीन तैवानच्या हवाई हद्दीत लढाऊ विमानांची घुसखोरी वाढवून आपला निषेध व्यक्त करीत असल्याचे दिसते. पण तैवानने चीनच्या आक्रमकतेला सडेतोड प्रत्युत्तर देण्याची जबरदस्त तयारी ठेवलेली आहे. काही झाले तरी तैवानची जनता चीनच्या कम्युनिस्ट राजवटीसमोर मान तुकवणार नाही, असे तैवानचे नेते ठामपणे सांगत आहेत. यामुळे अस्वस्थ झालेल्या चीनच्या आक्रमकतेत अधिकाधिक वाढ होत चालली असून चीन तैवानवर हल्ला चढविण्याचा विचार करीत असल्याचे दावे लष्करी विश्‍लेषक करीत आहेत.

leave a reply