खाजगी रुग्णालयातून २५० रुपयात कोरोनाची लस मिळणार

नवी दिल्ली – सरकारच्या लसीकरण केंद्रावर कोरोनाची लस मोफत मिळेल, मात्र खाजगी रुग्णालयात त्यासाठी नागरिकांना पैसे चुकते करावे लागती. खाजगी रुग्णालयात लसीचे मूल्य किती असेल, हे लवकरच निश्‍चित करून जाहीर केले जाईल, असे दोन दिवसांपूर्वी केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले होते. या पार्श्‍वभूमीवर शनिवारी कंेंद्रीय आरोग्य मंत्रालयाने खाजगी रुग्णालयातही कोरोना लस मिळेल, असे घोषित केले. मात्र याच्या किंमतीबाबतचा खुलासा करण्यात आला नाही. पण खाजगी रुग्णालयांसाठी २५० रुपये प्रति डोस इतके कोरोना लसीचे मूल्य निश्‍चित करण्यात आल्याची बातमी येत आहे. एका वृत्तसंस्थेने वरीष्ठ सरकारी अधिकार्‍यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

कोरोनाच्या लसीकरणाचा पुढील टप्पा १ मार्च पासून सुरू होत आहे. या टप्प्यात ६० वर्षांवरील वरिष्ठ नागरिकांना कोरोनाची लस दिली जाईल, तसेच ४५ ते ६० वयोगटातील व्याधीग्रस्त नागरिकांनाही लस मिळू शकेल, असे सरकारने गेल्या आठवड्यात जाहीर केले होते. यासाठी नागरिकांना आरोग्य सेतू अ‍ॅपद्वारे को-विन वेबसाईटवर नोंेदणी करावी लागणार आहेत. कॅन्सर, मधूमेह, उच्च रक्तदाब, फुफ्फुसासंबंधीत विविध आजार असलेल्या ४५ वर्षावरील नागरिकांना लस घेण्यासाठी आरोग्य प्रमाणपत्रही सादर करावे लागेल. नांेंदणीकृत डॉक्टरकडून हे प्रमाणपत्र आणावे लागेल, अशी माहिती समोर येत आहे.

पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, फ्रन्ट लाईन वर्कर्सला कोरोनाची लस मोफत देण्यात आली होती. आतापर्यंत पहिल्या टप्प्यातील ७० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. दुसर्‍या टप्प्यात जेष्ठ नागरिकांनाही लस मोफत देण्यात येणार आहे. मात्र केवळ सरकारच्या लसीकरण केंद्रावरच ही लस मोफत मिळेल. खाजगी रुग्णालयातून लस देण्यासाठी मूल्य द्यावे लागेल. हे मूल्य २५० रुपये निश्‍चित झाल्याचे वृत्त आहे. दोन लसी मिळून ५०० रुपये इतके कोरोनाच्या लसीचे मूल्य होणार असून यामध्ये १०० रुपये रुग्णालयाच्या सेवा मूल्याचाही समावेश आहे. मात्र सर्वच खाजगी रुग्णालयांमधून लस मिळणार नाही. आयुष्मान भारत योजनेशी जोडल्या गेलेल्या आणि लसीकरण मोहिमे सहभागी झालेल्या खाजगी रुग्णालयातच ही लस उपलब्ध होणार असल्याच्या बातम्या आहेत.

दरम्यान, शनिवारी पुन्हा एकदा कोरोनाच्या १६ हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली. चोवीस तासात १६ हजार ४४८ रुग्ण आढळले, तर ११३ जण या साथीने दगावले. महाराष्ट्रात सलग चौथ्या दिवशी ८ हजाराहून अधिक कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
महाराष्ट्रात शनिवारी ८६२३ नवे रुग्ण आढळले, तर ५१ जणांचा बळी गेला. शुक्रवारपेक्षा रुग्ण व बळींची संख्या जास्त आहे. मात्र मुंबईत नव्या रुग्णांची संख्या हजारापेक्षा

कमी नोंदविण्यात आली. मुंबईत चोवीस तासात ९८७ नवे रुग्ण आढळले.
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळत आहे. यामुळे अमरावतीत लॉकडाऊन आणखी आठ दिवसांनी वाढविण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर आणि भातूकली पालिका व नगरपंचायत क्षेत्राला कॉन्टेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.

leave a reply