अमेरिकेने उघुरांचा वंशसंहार करणार्‍या चीनच्या हिवाळी ऑलिंपिकवर बहिष्कार टाकावा

- निक्की हॅले, माईक पॉम्पिओ यांच्यासह रिपब्लिकन सिनेटर्सची मागणी

वॉशिंग्टन – ‘हिटलर ज्यूधर्मियांचे हत्याकांड घडविणार हे आधीच ठाऊक असते तर अमेरिकेने 1936 सालच्या बर्लिन ऑलिंपिकमध्ये सहभाग घेतला असता का? नक्कीच नाही! आत्ताच्या काळात चीनची कम्युनिस्ट राजवट उघडपणे उघुरांचा वंशसंहार करीत आहे. म्हणूनच अमेरिकेने 2022 साली चीनमध्ये होणार्‍या हिवाळी ऑलिंपिकमध्ये अजिबात सहभागी होऊ नये’, अशी मागणी संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅले यांनी केली. हिटलरच्या नाझी जर्मनीपेक्षाही कम्युनिस्ट चीन अधिक धोकादायक आहे, असा इशाराही हॅले यांनी दिला. हॅले यांच्या पाठोपाठ अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ तसेच रिपब्लिकन सिनेटर्सनी देखील चीनच्या ऑलिंपिकवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे.

अमेरिकेच्या माजी राजदूत हॅले यांनी अमेरिकी वृत्तसंस्थेसाठी लिहिलेल्या लेखात हिटलर आणि चीनमधील जिनपिंग यांच्या राजवटीची तुलना केली आहे. ‘हिटलरने वेगाने आपल्या लष्करी सामर्थ्यात वाढ केली आणि धर्मविद्वेषाला कायदेशीर स्वरूप दिले होते. 1936 सालच्या बर्लिन ऑलिंपिकपर्यंत हिटलरने शेजारी देशांवर आक्रमण केले नव्हती. पण जर्मनीत ज्यूधर्मियांवर अत्याचार करण्यासाठी छळछावण्या स्थापन केल्या होत्या. पण विंस्टन चर्चिल यांच्यासारख्या दूरदर्शी नेत्याने हिटलरचा धोका वेळीच ओळखला होता. बाकीचे हिटलरच्या प्रचाराला मुर्खासारखे फसले व हिटलर सुधारेल अशी त्यांची आशा होती. कम्युनिस्ट चीनकडून अशी अवाजवी आशा ठेवू नका’, अशा कठोर शब्दात निक्की हॅले यांनी बायडेन प्रशासनाला खडसावले.

‘चीनने आपले इरादे आधीच स्पष्ट केले होते. फार आधीच चीनने तिबेटच्या जनतेचे अधिकार पायदळी तुडविले. हाँगकाँगची लोकशाही संपवून टाकली. चीन तैवानच्या लोकशाहीला प्रतिदिनी धमकावत आहे. तर या शतकातील सर्वात भीषण महामारी ठरलेला कोरोनाव्हायरसचा उगम लपविण्यासाठी चीनचे पद्धतशीर प्रयत्न सुरू आहेत’, याकडे हॅले यांनी बायडेन प्रशासनाचे लक्ष वेधले.

झिंजियांगमधील उघुरांवर चीन करीत असलेल्या अत्याचाराबाबत संपूर्ण जगाला माहिती आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन उघुरांवर करीत असलेल्या अत्याचाराविरोधात आवाज उठविला होता, याची आठवण हॅले यांनी करून दिली. 1940च्या दशकात हिटलरने जे काही केले, ते चीनने आधीच सुरू केले आहे. तेव्हा अमेरिकेने पुढच्या वर्षी चीनमध्ये होणार्‍या विंटर ऑलिंपिकमध्ये सहभागी होऊन चीन उघुरांवर करीत असलेल्या अत्याचाराचे समर्थन करता कामा नये, असे आवाहन हॅले यांनी केले.

अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी देखील 2022 साली चीनमध्ये होणार्‍या ऑलिंपिकमध्ये अमेरिकेने अजिबात सहभागी होऊ नये, अशी मागणी केली. ही स्पर्धा चीनबाहेर आयोजित केल्याशिवाय अमेरिकेने यात सहभाग घेऊ नये, असे पॉम्पिओ म्हणाले. तर ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होऊन, अमेरिका चीन उघुरांवर करीत असलेल्या अत्याचाराला समर्थन देऊ शकत नाही, अशी भूमिका रिपब्लिकन सिनेटर रिक स्कॉट यांनी मांडली. पण बायडेन प्रशासनाने यावर कुठलाही निर्णय झाला नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. या व्यतिरिक्त ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडातूनही चीनच्या ऑलिंपिकवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर पकडू लागली आहे. ब्रिटनच्या संसदेत काही लोकप्रतिनिधींनी उघुरांवरील अत्याचाराचा मुद्दा उपस्थित करून ऑलिंपिकवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले. तर कॅनडाच्या संसदेत या स्पर्धेवर बहिष्कार टाकण्यासंबंधी प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

दरम्यान, पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चीनची राजधानी बीजिंगमध्ये हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा होणार आहे. 2008 साली पार पडलेली बीजिंग ऑलिंपिक स्पर्धा ही चीनची प्रतिमा उजळविण्यासाठी उपकारक ठरली होती. त्याच धर्तीवर पुढच्या वर्षी होणारी विंटर ऑलिपिंक स्पर्धा चीनच्या हुकूमशाहीला बळ देईल, असे पाश्‍चिमात्य माध्यमे सांगत आहेत.

leave a reply