देशाची संरक्षणक्षेत्रातील निर्यात सात वर्षात ३८ हजार कोटींवर पोहोचली

- संरक्षणमंत्री राजनाथ सिंग

नवी दिल्ली – भारताची संरक्षणक्षेत्रातील निर्यात गेल्या सात वर्षात ३८ हजार कोटी रुपयांवर जाऊन पोहोचली असून लवकरच भारत या क्षेत्रात आघाडीचा देश बनेल, असा विश्‍वास केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केला. राजधानी नवी दिल्लीत आयोजित केलेल्या एका परिषदेत केंद्रीय संरक्षणमंत्र्यांनी, भारताच्या संरक्षण व अंतराळक्षेत्रातील उद्योगांची उलाढाल सुमारे ८५ हजार कोटी रुपयांपर्यंत गेल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी भारताच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांनी संशोधन व विकासक्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्यावर भर द्यावा, असे आवाहनही केले आहे.

देशाची संरक्षणक्षेत्रातील निर्यात सात वर्षात ३८ हजार कोटींवर पोहोचली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंगशनिवारी नवी दिल्लीत संरक्षण मंत्रालयाच्या ‘डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स प्रॉडक्शन’ व ‘सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्स’कडून (एसआयडीएम) ‘एमएसएमई कॉन्क्लेव्ह’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला संबोधित करताना संरक्षणमंत्र्यांनी गेल्या सात वर्षात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे संरक्षणक्षेत्रातील निर्यात वाढल्याचे स्पष्ट केले. या काळात संरक्षणक्षेत्रात नवे स्टार्टअप्स सुरू झाले आहेत. त्यांच्याकडून संरक्षणविषयक संशोधन व विकासावर भर देण्यात आला. म्हणूनच या क्षेत्रातील उद्योगांचा विस्तार होऊ लागला आहे, असे सांगून संरक्षणमंत्र्यांनी त्यावर समाधान व्यक्त केले.

सध्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगाच्या कक्षेत येणार्‍या जवळपास बारा हजार कंपन्या संरक्षणक्षेत्रात कार्यान्वित आहेत, अशी महत्त्वाची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी दिली. भारताने गेल्या काही वर्षांपासून संरक्षणसाहित्याच्या निर्यातीला विशेष प्राधान्य दिले आहे. यामुळे शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्याचा सर्वात मोठ आयातदार देश असलेला भारत पुढच्या काळात याची निर्यात करणारा देश बनेल, असा विश्‍वास राजनाथ सिंग यांनी व्यक्त केला. ‘यासाठी केंद्र सरकारने समोर लक्ष्य ठेवलेले आहे. २०२४-२५ सालापर्यंत संरक्षणसाहित्याची निर्यात सुमारे ३५ हजार कोटी रुपयांवर नेण्याचे सरकारचे ध्येय आहे. सध्या भारत जवळपास ७० देशांना संरक्षणसाहित्याची निर्यात करीत आहे, याकडे संरक्षणमंत्र्यांनी लक्ष वेधले.

संरक्षणसाहित्य व शस्त्रास्त्रांच्या खरेदीव्यवहाराची नोंद ठेवणार्‍या ‘सिप्री’ या संघटनेने आपल्या २०२० सालच्या अहवालात भारत संरक्षणसाहित्याची निर्यात करणार्‍या आघाडीच्या २५ देशांमध्ये असल्याचा उल्लेख केला होता. याचीही आठवण संरक्षणमंत्र्यांनी करून दिली. संरक्षणक्षेत्रातील खाजगी उद्योगांची हिस्सेदारी सुमारे १८ हजार कोटींनी वाढलेली आहे, याचीही नोंद राजनाथ सिंग यांनी केली. या क्षेत्रात बड्या कंपन्यांची भूमिका महत्त्वाची असली तरी या क्षेत्राला फार मोठे योगदान सूक्ष्म, लघू व मध्यम क्षेत्रातील कंपन्यांकडून दिले जाते. म्हणूनच सूक्ष्म, लघू व मध्यम क्षेत्रातील कंपन्यांनी संशोधनावर अधिकाधिक गुंतवणूक करावी, असा संदेश संरक्षणमंत्र्यांनी दिला आहे. या गुंतवणुकीचा फार मोठा लाभ देशाच्या सुरक्षेला मिळेल, असा विश्‍वास संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

leave a reply