रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या भारतभेटीत भारत व रशियामध्ये दहा सहकार्य करार संपन्न होणार

नवी दिल्ल्ली/मॉस्को – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या भारतभेटीत दोन्ही देशांमध्ये सुमारे दहा सामंजस्य करार संपन्न होणार आहेत. यातील काही करार गोपनीय असतील, अशी माहिती रशियन राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने दिली. या सामंजस्य करारामध्ये लष्करी व तंत्रज्ञानविषयक सहकार्याचा समावेश असल्याचे सांगितले जाते. याच्या पूर्वतयासाठी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेेई लॅव्हरोव्ह भारतात रविवारीच दाखल होणार आहेत. या सामंजस्य कराराबरोबरच दोन्ही देशांमध्ये होणारी पहिलीच ‘टू प्लस टू’ चर्चा अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या भारतभेटीत भारत व रशियामध्ये दहा सहकार्य करार संपन्न होणारयुक्रेनच्या प्रश्‍नावर रशियाचे अमेरिका व युरोपिय देशांबरोबरील संबंध ताणले गेले आहेत. चीनबाबत बोटचेपे धोरण स्वीकारणारे अमेरिकेचे बायडेन प्रशासन रशियाच्या विरोधात मात्र जहाल भूमिका स्वीकारत असल्याचे दिसते. यामुळे रशियाने लष्करी तसेच राजनैतिक पातळीवरील हालचाली तीव्र केल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर, रशियन राष्ट्राध्यक्षांची भारतभेट सामरिक तसेच धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाची ठरते. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या या भारतभेटीचे महत्त्व अधोरेखित करताना, रशियन राजनैतिक अधिकारी युरी उशाकोव्ह यांनी उभय देशांमध्ये दहा सहकार्य करार होणार असल्याची माहिती दिली.

यातील काही करार अंशतः गोपनीय असतील व यावर चर्चा सुरू आहे, अशी माहिती असे उशाकोव्ह यांनी दिली. अत्यंत वेगळ्या क्षेत्रात भारत व रशियाचे द्विपक्षीय सहकार्य दृढ करण्यासाठी हे करार अत्यंत उपयुक्त ठरतील, असे उशाकोव्ह पुढे म्हणाले. भारत व रशियामधील या सहकार्याकडे अमेरिका, चीन व पाकिस्तानही संशयाने पाहत आहे. अमेरिकेने भारत व रशियामधील एस-४०० हवाई सुरक्षा यंत्रणेच्या व्यवहारावर आक्षेप घेतले होते. हा व्यवहार करणार्‍या भारतावर अजूनही अमेरिका निर्बंध लादू शकते, असा इशारा बायडेन प्रशासनाने दिला होता. मात्र भारताने त्याकडे लक्ष दिलेले नाही.

रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या भारतभेटीत भारत व रशियामध्ये दहा सहकार्य करार संपन्न होणार‘एस-४००’च्या खरेदीनंतर भारत रशियाबरोबर अधिक प्रगत यंत्रणा असलेल्या ‘एस-५००’ची खरेदी करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. त्याला अधिकृत पातळीवर दुजोरा मिळालेला नसला तरी यामुळे अमेरिका, चीन व पाकिस्तान हैराण झाल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे. भारतासारखा देश एकाच वेळी अमेरिका व रशिया या प्रतिस्पर्धी देशांमध्ये समतोल कसा काय राखू शकतो, इतर देशांना ते का जमत नाही, असा प्रश्‍न पाकिस्तानचे विश्‍लेषक विचारत आहेत.
दरम्यान, चीन देखील भारत व रशियामधील या सहकार्यावर नाखूश आहे. रशियालाही याची जाणीव आहे. पण चीनने यावर आक्षेप घेतला आणि रशियावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केलाच, तर त्याचे विपरित परिणाम होतील, याची चीनला जाणीव असल्याचे रशियन राजनैतिक अधिकार्‍यांनी याआधी स्पष्ट केले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या द्विपक्षीय चर्चेत दोन्ही देशांचे द्विपक्षीय सहकार्य नव्या उंचीवर नेण्यासाठी तसेच धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यावर चर्चा होईल. तसेच क्षेत्रिय आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीवरही दोन्ही नेते विचारविनिमय करतील, असे सांगितले जाते. स्पष्टपणे उल्लेख केला नसला तरी अफगाणिस्तानातील घडामोडींवर दोन्ही नेत्यांची चर्चा अपेक्षित असल्याचे दिसत आहे.

leave a reply