जनरल रावत यांच्या मृत्यूमुळे देश शोकात आहे, पण प्रगती थांबणार नाही

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश

नवी दिल्ली/बलरामपूर – ‘संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत, त्यांची पत्नी व त्यांच्या ११ सहकार्‍यांचा दुर्घटनेत झालेल्या अकाली मृत्यूचा शोक सर्व भारतवासियांना आहे. प्रत्येक राष्ट्रभक्ताची या अपघाताने मोठी हानी केली आहे. मात्र याच्या यातना सहन करत असतानाही देशाच्या प्रगतीची गती कुठेही थांबणार नाही. भारत पुढे जातच राहिल’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. शनिवारी पंतप्रधानांच्या हस्ते उत्तर प्रदेशात शरयू नदीवर ९,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून उभारलेल्या कालवा व जलसिंचन प्रकल्पाचे उद्घाटन झाले. या प्रकल्पामुळे १४ लाख हेक्टर इतकी शेतजमीन सिंचनाखाली येणार असून २९ लाख शेतकर्‍यांना याचा लाभ मिळेल. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू पावलेल्या जनरल रावत आणि त्याच्या सहकार्‍यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

जनरल रावत यांच्या मृत्यूमुळे देश शोकात आहे, पण प्रगती थांबणार नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश‘जनरल बिपीन रावत योद्धे होते. भारताच्या सीमांची सुरक्षा अधिक भक्कम व्हावी, तिन्ही संरक्षणदलांनी आत्मनिर्भर बनावे, यासाठी जनरल रावत अफाट परिश्रम करीत होते. सारा देश याचा साक्षिदार आहे. त्यामुळे जनरल रावत व त्यांच्या सहकार्‍यांच्या मृत्यूमुळे सारा देश अतीव दु:खात आहे. याच्या वेदना, यातना सहन करीत आहे’, असे सांगून पंतप्रधानांनी जनसामान्यांच्या भावना व्यक्त केल्या.

‘‘मात्र या यातना सहन करीत असतानाही आपली गती आणि प्रगती थांबवायची नाही. देशाच्या सीमांची सुरक्षा अधिक भक्कम करणे, सीमा क्षेत्रातील पायाभूत सुविधा अधिक भक्कम करणे, तिन्ही संरक्षणदलांना आत्मनिर्भर बनविणे, त्याचबरोबर संरक्षणदलांमधील समन्वय अधिकच दृढ करणे, ही कामे त्याच वेगाने पुढे नेली जातील’’, असा निर्धार पंतप्रधानांनी व्यक्त केला.

‘आपण सारे भारतीय मिळून प्रखर परिश्रम करू आणि देशामधील व देशाबाहेरील आव्हानांचा सक्षमपणे मुकाबला करू. भारताला आपण शक्तीशाली व समृद्ध राष्ट्र बनवू’, असा संदेश पंतप्रधान मोदी यांनी दिला. ‘जनरल बिपीन रावत जेथे कुठे असतील, तेथून भारताला नव्या संकल्पासह वेगाने प्रगती करताना पाहतील’, असा विश्‍वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

‘सैनिक केवळ सैन्यात असेपर्यंत सैनिक नसतो. तर तो आयुष्यभरासाठी सैनिकच असतो. सैनिकाचे संपूर्ण जीवन योद्ध्यासारखे असते. सैनिकांचा प्रत्येक क्षण देशाच्या सन्मान, प्रतिष्ठेसाठी असतो. सैनिकांचा या निर्धाराला व देशाप्रती समर्पण भावाला कोणतेही शस्त्र छिन्न-भिन्न करु शकत नाही’, असे पंतप्रधानांनी भगवद्गीतेतील श्लोकाचा दाखला देऊन सांगितले.

या अपघातात गंभीर जखमी झालेले ग्रुप कॅप्टर वरुण सिंह लवकर बरे व्हावेत, यासाठी पंतप्रधान मोदी यांनी प्रार्थना केली. दरम्यान, शनिवारी कुन्नूर येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या संरक्षणदलाच्या सहा अधिकार्‍यांवर अंत्यसंस्कार झाले. स्क्वाड्रन लिडर कुलदिप सिंग यांच्यावर राजस्थानातील त्याच्या गावी अंत्याविधी पार पडले, तर आग्रा येथे कमांडर पृथ्वी सिंग चौहान यांना अखेरचा निरोप देण्यात आला. ज्युनियर वॉरंट ऑफिसर राणा प्रताप दास यांच्यावर ओडीशातील त्यांच्या मूळ गावी अंतिम संस्कार करण्यात आले.

leave a reply