मारक क्षमता वाढलेल्या पिनाका रॉकेट यंत्रणेच्या पोखरणमध्ये चाचण्या

नवी दिल्ली – राजस्थानच्या पोखरण रेंजमध्ये अतिरिक्त मारक क्षमता असलेल्या पिनाका रॉकेट सिस्टिमच्या चाचण्या पार पडल्या आहेत. गेल्या तीन दिवसात एकूण २४ रॉकेट डागून या यंत्रणेच्या अचूकता तपासण्यात आली. त्याचवेळी पिनाका रॉकेटसाठी विकसित करण्यात आलेल्या एरिया डिनायल म्युनिशन (एडीएम) आणि स्वदेशी बनावटीच्या प्रॉक्झिमेट्री फ्युजच्या चाचण्याही यावेळी झाल्या. या सर्व चाचण्या यशस्वी ठरल्या असून अपेक्षित परिणाम यातून मिळाल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

मारक क्षमता वाढलेल्या पिनाका रॉकेट यंत्रणेच्या पोखरणमध्ये चाचण्या‘संरक्षण संशोधन व विकास संस्था-डीआरडीओ’ने विकसित केलेली पिनाका एमके-१ रॉकेट यंत्रणा आधीपासून भारतीय लष्करात तैनात आहे. त्याची मारक क्षमता ४० किलोमीटर आहे. तर यापेक्षा जास्त मारक क्षमता असलेली पिनाका-२ ही आवृत्ती देखील विकसित केली आहे. त्याची मारक क्षमता ६० किलोमीटर इतकी आहे. तर नुकत्याच पोखरणमध्ये पार पडलेल्या चाचण्या याहून प्रगत आवृत्तीच्या असल्याचे वृत्त आहे.

पिनाका एक्स्टेंडेड रेंज अर्थात पिनाका-ईआर या अत्याधुनिक आवृत्तीची मारक क्षमता किती याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही. मात्र पिनाका-ईआरच्या शनिवारी घेण्यात आलेल्या चाचण्या यशस्वी ठरल्या आहेत. डीआरडीओ आणि लष्कराने या चाचण्या घेतल्या. गेल्या तीन दिवसांपासून पिनाका यंत्रणेचे मूल्यांकन पोखरणमध्ये करण्यात येत आहे. यावेळी पिनाका एक्स्टेंडेड रेंज अर्थात पिनाका-ईआरच्या चाचण्या पार पडल्या आहेत. चाचण्यांमध्ये ही रॉकेट यंत्रणा सर्व निकषात खरी उतरल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

यावेळी एरिया डिनायल म्युनिशन (एडीएम) आणि स्वदेशी बनावटीच्या प्रॉक्झिमेट्री फ्यूजच्या चाचण्याही घेण्यात आल्या आहेत. एरिया डिनायल म्युनिशन (एडीएम) हे पुण्यातील आर्मामेंट रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशनेंट (एआरडीई) आणि हाय इंजिनिअरिंग मटेरियल रिसर्च लॅबोरेटरी (एचईएमआरएल) या डीआरडीओच्या दोन प्रयोगशाळांमध्ये विकसित करण्यात आले आहेत. हा पिनाका रॉकेट सिस्टिमचा महत्त्वाचा भाग आहे.

याशिवाय स्वदेशी बानवटीच्या प्रॉक्झिमेट्री फ्युजची क्षमताही चाचण्यांदरम्यान तपासण्यात आली आणि या फ्युजच्या चाचण्या यशस्वी ठरल्या आहेत. प्रथमच देशांतर्गत विकसित हे फ्युज आयात फ्युजची जागा घेतील. यामुळे रॉकेट यंत्रणेसाठी लागणार्‍या फ्युजच्या आयातीवरील निर्भरता कमी होईल व परकीय चलनाचीही बचत होईल, असा दावा केला जात आहे. दरम्यान, ‘पिनाका-ईआर’चे तंत्रज्ञान हस्तांतरणाद्वारे औद्योगिक उत्पादन सुरू करण्याची योजना आहे. त्यासाठी या यंत्रणेच्या कामगिरीचे मूल्यमापन सतत केले जात आहे.

leave a reply