देशात खाजगी उद्योगाने प्रथमच लष्करासाठी दारूगोळा बनविला

- ‘मल्टी मोड हँड ग्रेनेड’ लष्कराकडे सुपूर्द

नवी दिल्ली – ‘संरक्षण संशोधन व विकास संस्था’ने (डीआरडीओ) विकसित केलेले ‘मल्टी-मोड हँड ग्रेनेड’चे एका खाजगी कंपनीने उत्पादन घेतले असून हे स्वदेशी बनावटीचे अत्याधुनिक ग्रेनेड मंगळवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत लष्कराला सुपूर्द करण्यात आले. लष्करासाठी पहिल्यांदाच भारतात एका खाजगी उद्योगाने दारुगोळा बनविला आहे. संरक्षण साहित्य निर्मिती क्षेत्रात भारताला स्वयंपूर्ण बनविण्याच्या दिशेने भारताच्या प्रवासाचे, तसेच सार्वजनिक-खाजगी उद्योगामधील भागिदारीचे हे उत्तम उदाहरण असल्याचे संरक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे.

देशात खाजगी उद्योगाने प्रथमच लष्करासाठी दारूगोळा बनविला - ‘मल्टी मोड हँड ग्रेनेड’ लष्कराकडे सुपूर्द‘संरक्षण संशोधन विकास संस्थे’च्या (डीआरडीओ) टर्मिनल बॅलेस्टिक्स रिसर्च लॅब्रोरेटरी’ने (टीबीआरएल) ‘मल्टी-मोड हँड ग्रेनेड’ (एमएमएचजी) विकसित केले होते व याचे उत्पादन घेण्यासाठी नागपूर येथील इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्ह लिमिटेडशी करार करण्यात आला होता. या कंपनीला लष्करासाठी दहा लाख एमएमएचजी पुरविण्याचे कंत्राट देण्यात आले होते. यासाठी तंत्रज्ञान हस्तांतरण करार पार पडला होता. या ग्रेनेडची पहिली खेप संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत भारतीय लष्कराला सुपूर्द करण्यात आली. भारतीय इतिहासात प्रथमच लष्करासाठी दारुगोळा तयार करण्याचे काम हे खाजगी कंपनीने केले आहे.

सध्या भारतीय लष्कर वापरत असलेले ग्रेनेड हळूहळू बाद करण्यात येणार आहेत. भारतीय लष्कर अजूनही ब्रिटीश बनावटीचे हँड ग्रेनेड वापरत असून लष्कराच्या मागणीनुसार डीआरडीओने लष्करासाठी अत्याधुनिक मल्टी मोड हँड ग्रेनेड विकसित केले. त्यामुळे ब्रिटीश बनावटीच्या ग्रेनेडला स्वदेशी तंत्रज्ञानाचा पर्याय मिळाला. मात्र वेगाने या हँड ग्रेनेडचा पुरवठा लष्कराला व्हावा यासाठी खाजगी कंपनीलाही कंत्राट देण्यात आले. यातील सुमारे चाळीस हजार ग्रेनेड लष्कराला सुपूर्द करण्याची माहिती मिळत आहे. साधारण महिनाभरापूर्वी एमएमएचजीचा पुरवठा लष्कराला सुरू झाला. मात्र त्याचा औपचारीक कार्यक्रम मंगळवारी संरक्षणमंत्र्यांच्या उपस्थित पार पडला. यावेळी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे, डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. जी. सतीश रेड्डी, इन्फन्ट्रीचे अध्यक्ष आणि महासंचालक लेफ्टनंट जनरल ए. के. सामंत्र उपस्थित होते.

देशात खाजगी उद्योगाने प्रथमच लष्करासाठी दारूगोळा बनविला - ‘मल्टी मोड हँड ग्रेनेड’ लष्कराकडे सुपूर्दएमएमएचजी ग्रेनेडचा वापर बचावात्मक आणि आक्रमक अशा दोन्ही पद्धतीने होऊ शकतो. हे ग्रेनेड हलक्या वजनाचे असून त्याची तीव्रता पाच मीटर क्षेत्रात जाणवते. वापरण्यास लवचिक असलेले हे हँड ग्रेनेड अत्यंत प्रभावी आहेत. मैदानी प्रदेश, वाळवंट आणि अधिक उंचीवरील भागात या ग्रेनेडच्या घेण्यात आलेल्या चाचण्या अतिशय यशस्वी ठरल्या होत्या.

या हँड ग्रेनेडचा जलदगतीने पुरवठा केल्याबद्दल संरक्षणमंत्र्यांनी डीआरडीओ आणि इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्ह लिमिटेडची प्रशंसा केली आहे. ‘मल्टी मोड ग्रेनेड’, ‘अर्जुन मार्क-1’ रणगाडा, ‘मानवरहित सर्फेस वेहिकल’ आणि ‘सी थ्रू आर्मर’ सारखी स्वदेशी उत्पादने विकसित केल्याबद्दलही उद्योगक्षेत्राचे राजनाथ सिंग यांनी कौतुक केले आहे. संरक्षण साहित्याचे देशांतर्गत उत्पादन वाढले आहे. तसेच नवे तंत्रज्ञान देशातच विकसित होत आहे. यामुळे आता संरक्षण साहित्याची भारत निर्यातही करू लागला आहे. गेल्या दोन वर्षात 17 हजार कोटी रुपयांहून अधिकचे संरक्षण साहित्य भारतातून निर्यात झाल्याच्या बाबीकडे संरक्षणमंत्र्यांनी लक्ष वेधले. तसेच लवकरच केवळ देशांतर्गत वापरासाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी संरक्षण उत्पादनांची निर्मिती भारत करेल, असा विश्‍वास संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला.

leave a reply