तालिबान पाकिस्तानला काश्‍मीर मिळवून देईल

- पाकिस्तानी नेत्यांचा विश्‍वास

इस्लामाबाद – तालिबानच्या अफगाणिस्तानातील राजवटीचा वापर करून पुन्हा एकदा जम्मू व काश्‍मीरमध्ये दहशतवादाचे थैमान घालण्याचे भयंकर स्वप्न पाकिस्तान पाहत आहे. या तालिबानी दहशतीच्या बळावर भारतापासून काश्‍मीर तोडता येईल, असा विश्‍वास पाकिस्तानचे नेते जाहीरपणे व्यक्त करीत आहेत. एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत पाकिस्तानच्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्या ‘नीलम इर्शाद शेख’ यांनी ही घोषणा करून टाकली. पाकिस्तानातून असे दावे केले जात असताना, संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार परिषदेत भारताने अफगाणिस्तानचा ‘जैश’ व ‘लश्‍कर’सारख्या दहशतवादी संघटनांकडून वापर होता कामा नये, असे बजावले आहे.

तालिबान पाकिस्तानला काश्‍मीर मिळवून देईल - पाकिस्तानी नेत्यांचा विश्‍वासअजूनही अफगाणिस्तानात अधिकृतरित्या तालिबानची सत्ता प्रस्थापितझालेली नाही. दहशतीचा मार्ग सोडून दिल्याखेरीज तालिबानच्या राजवटीला मान्यता देणार नाही, असे जगातील जवळपास सर्वच जबाबदार देशांनी जाहीर केले आहे. महिलांबरोबरील तालिबानच्या वर्तणुकीवर आपली नजर असेल, असे संयुक्त राष्ट्रसंघाने बजावले आहे. मात्र या साऱ्या गोष्टींशी आपले काही देणेघेणे नसल्याचे संकेत देऊन पाकिस्तान तालिबानचा विजय साजरा करीत आहे. इतकेच नाही तर तालिबानच्या बळावर काश्‍मीर भारताकडून हिसकावून घेण्याचे स्वप्ने पाकिस्तानला पडू लागली आहेत. एका वृत्तवाहिनीवर बोलताना, पाकिस्तानचा सत्ताधारी पक्ष असलेल्या ‘तेहरिक-ए-इन्साफ’च्या नेत्या ‘नीलम इर्शाद शेख’ यांनी तशी कबुली दिली.

‘अफगाणिस्तानातील तालिबानच्या विजयाचा पाकिस्तानलाफार मोठा लाभ मिळेल. भारतापासून काश्‍मीरला मुक्त करण्यासाठी तालिबान पाकिस्तानला सहाय्य करील’, असे दावे नीलम शेख यांनी केले. तालिबानच्या खडतर काळात पाकिस्तानने तालिबानला सहाय्य पुरविले होते. आता पाकिस्तानला काश्‍मीरसाठी भारताविरोधात सहाय्य करून तालिबान या उपकाराची परतफेड करील, असा विश्‍वास नीलम शेख यांनी व्यक्त केला. त्यांच्या विधानांच्या गांभीर्याची जाणीवझालेल्या न्यूज अँकरने नीलम शेख यांना रोखण्याचा प्रयत्न केला.

पाकिस्तानचे लष्कर काश्‍मीर भारतापासून मुक्त करू शकत नसेल, तर हे काम तालिबान कसे काय करील? हा प्रश्‍न या अँकरने नीलम शेख यांना केला. त्याचे उत्तर त्या देऊ शकल्या नाहीत. काश्‍मीरबाबत थेटपणे असे दावे केले नसले, तरी तालिबानच्या अफगाणिस्तानातील विजयामुळे भारताला आव्हान देता येईल, असे पाकिस्तानचे नेते व लष्करी विश्‍लेषक आत्मविश्‍वासाने सांगत आहेत. तालिबानने काश्‍मीरशी आपला संबंध नसल्याचे जाहीर करून टाकले असले, तरी पाकिस्तानच्या नेत्यांचा व लष्करी विश्‍लेषकांचा हा विश्‍वास कायम असल्याचे दिसते.

दरम्यान, संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार परिषदेत बोलताना भारताचे प्रतिनिधी इंद्रा मणी पांडे यांनी अफगाणिस्तानातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. “अफगाणिस्तानातील परिस्थितीमुळे शेजारी देशांसमोर आव्हान खडे ठाकता कामा नये. ‘लश्‍कर-ए-तोयबा’ व ‘जैश-ए-मोहम्मद’सारख्या दहशतवादी संघटनांना अफगाणिस्तानचा वापर करण्याची मुभा दिली जाऊ नये”, अशी अपेक्षा पांडे यांनी व्यक्त केली.

leave a reply