संसदेवरील भ्याड दहशतवादी हल्ला देश कधीही विसरणार नाही

- पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली – ‘आपल्या संसदेवर झालेला भ्याड हल्ला देश कधीही विसरणार नाही’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 13 डिसेंबर 2001 रोजी संसदेवर पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी संघटना ‘जैश-ए-मोहम्मद’ने हा भ्याड हल्ला केला होता. त्याच्या स्मरणदिनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. संसदेवर हल्ला चढवून भयंकर हत्याकांड घडविण्याचे कारस्थान उधळण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांना देश कधीही विसरणार नाही, असा संदेश या नेत्यांनी दिला आहे.

भ्याड हल्ला

‘जैश-ए-मोहम्मद’च्या पाच दहशतवाद्यांनी संसदेवर हा भ्याड हल्ला चढविला होता. मात्र सुरक्षा दलांच्या जवानांनी या हल्लेखोरांना वेळीच रोखले व त्यामुळे अनर्थ टळला होता. या दहशतवाद्यांनी चढविलेल्या हल्ल्यात नऊ जण शहीद झाले, यात आठ जवानांचा समावेश होता. या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची तीव्र लाट उसळली होती. या भ्याड हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या सीमेवर हालचाली सुरू केल्या होत्या. यामुळे दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर आले होते. भारताच्या या लष्करी दडपणामुळे पाकिस्तानचे तत्कालिन हुकूमशहा परवेझ मुशर्रफ यांनी भारतविरोधी दहशतवादी संघटनांना पाकिस्तानात थारा दिला जाणार नाही, असे आश्‍वासन द्यावे लागले होते. यानंतर काश्‍मीरच्या सीमेवर संघर्षबंदीलाही मुशर्रफ तयार झाले होते.

या साऱ्या घटनाक्रमाला 19 वर्षे उलटून गेली असली तरी अजूनही भारतीय आपल्या संसदेवर झालेला तो हल्ला विसरू शकलेले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशातही याचे प्रतिबिंब उमटले आहे. ‘देश आपल्या संसदेवर झालेला भ्याड हल्ला कधीही विसरू शकणार नाही. या दहशतवादी हल्ल्यात संसदेचे रक्षण करीत असताना आपले बलिदान देणाऱ्यांचा देशाला कधीही विसर पडणार नाही’, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.

‘सीआरपीएफ’च्या महिला कॉन्स्टेबल कमलेश कुमारी यांच्या नजरेस ‘जैश’चे हे पाच दहशतवादी पडले होते. त्यांनी याची माहिती आपल्या वरिष्ठांपर्यंत पोहचवली होती व या दहशतवाद्यांना रोखण्यासाठी त्यांनी आपले प्राण पणाला लावले. यावेळी झालेल्या चकमकीत कमलेश कुमारी शहीद झाल्या, पण त्याआधी त्यांनी दहशतवाद्यांचे भयंकर कारस्थान उधळले होते. त्यांच्या बलिदानापासून देश कायम प्रेरणा घेत राहिल’, अशा भावपूर्ण शब्दात उपराष्ट्रपतींनी कमलेश कुमारी व या हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

साऱ्या जगाची लोकशाही व आर्थिक घडी विस्कटून मानवतेला पुन्हा अंधारयुगाकडे ढकलणे हाच दहशतवादी शक्तींचे एकमेव ध्येय आहे. त्यासाठी देशाची यंत्रणा व देशाची सीमा न जुमानणाऱ्या दहशतवाद्यांचा वापर करून आपले राजकीय हेतू साधण्याची कारस्थाने काही देशांकडून आखली जात आहेत. अशा देशांची आंतरराष्ट्रीय पातळीवर कोंडी केली जावी, अशी अपेक्षा व्यक्त करून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी पाकिस्तानला लक्ष्य केले. तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या शौर्याला आपण सॅल्युट करतो, असे सांगून या शहिदांचे बलिदान देशाच्या सदैव स्मरणात राहिल अशी ग्वाही दिली आहे.

leave a reply