मलेशियातील रोहिंग्या संघटनेचा भारतात हल्ला घडविण्याचा कट

नवी दिल्ली – मलेशियात कार्यरत रोहिंग्या संघटना भारतात मोठा हल्ला घडविण्याच्या तयारीत आहेत. यासाठी महिला दहशतवाद्याचा वापर केला जाऊ शकतो, अशी माहिती भारतीय गुप्तचर संघटना ‘रॉ’ला मिळाली आहे. यानंतर सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या हल्ल्यासाठी 2 लाख डॉलर्स व्यवहार झाला असून यातील काही पैसे चेन्नईतील हवाला रॅकेटपर्यंत पोहोचल्याची बाब समोर आली आहे.

भारतात हल्ला

गुप्तचर संघटनांना मिळालेल्या माहितीनुसार दहशतवादी नेपाळ किंवा बांगलादेशमार्गेभारतात प्रवेश करू शकतात. दिल्ली, आयोध्या, बोधगया आणि पश्‍चिम बंगालमधील काही शहरे या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. यानंतर केंद्रीय गुप्तचर संघटनेने पश्‍चिम बंगाल, पंजाब, बिहार, दिल्ली आणि उत्तरप्रदेश या राज्यांच्या गुप्तचर यंत्रणा आणि तपास यंत्रणांना ॲलर्ट दिला आहे.

गेल्या काही काळापासून दहशतवादी संघटना भारतात हल्ला घडविण्याच्या प्रयत्नात आहेत. स्थानिक अतिरेकी संघटनांशी हातमिळवणी करून हा हल्ला घडविण्याची योजना आखण्यात आली आहे. भारतात हल्ले घडविण्यासाठी दोन लाख डॉलर्सचा व्यवहार झाला असून यातील काही भाग चेन्नईतील हवाला रॅकेटपर्यंत पोहोचला आहे. या हवालामार्फत आलेल्या पैशाचा खुलासा झाल्यावर हा कट उघड झाला. तसेच या कटाचे संबंध झाकीर नाईक आणि रोहिंग्या दहशतवादी मोहम्मद नासीरशी असल्याचेही समोर येत आहे. झाकीर सध्या मलेशियातच अश्रयाला आहे.

आत्मघाती हल्ला घडविण्यासाठी एका महिलेला विशेष प्रशिक्षण देण्यात आल्याची माहितीही गुप्तचर संघटनांच्या हाती लागली आहे. ही महिला मलेशियन असून म्यानमारमध्ये तीला प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यावर्षीच्या सुरुवातीला या महिलेला मलेशियातून म्यानमारमध्ये पाठविण्यात आल्याचा दावा गुप्तचर संस्थांच्या हवाल्याने एका वृत्त अहवालात करण्यात आला आहे.

याआधी 2015 साली पुण्यात एका 20 वर्षी तरुणीला सोशल मीडियाद्वारे भडकावून आत्मघाती हल्लेखोर बनण्यासाठी तयार केल्याची बाब समोर आली होती. या तरुणीला फितविण्यासाठी सोशल मीडियावर झाकीर नाईकच्याच भडकावू भाषणाचा वापर करण्यात आला होता. तसेच गेल्यावर्षी देशात 127 दहशतवाद्यांना एनआयएने अटक केली होती. मुख्यत: हे दहशतवादी आयएसशी संबंधीत होते, तसेच त्यांना भडकावून दहशतवादी संघटनेत सामील करून घेण्यासाठी झाकीर नाईकच्याच भाषणाचा वापर करण्यात आल्याचे चौकशीत समोर आले होते.

दरम्यान, भारतात बेकायदेशीर घुसखोरी करून सुमारे 40 हजार रोहिंग्या निर्वासित राहत आहेत. देशात 17 ठिकाणी त्यांच्या वस्त्या आहेत. रोहिंग्यांचा संबंध कट्टरपंथी आणि दहशतवादी संघटनांशी आहे. तसेच विविध गुन्हेगारी कारवायातही रोहिंग्या सहभागी आहेत. त्यामुळे हे निर्वासीत देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतात, असे केंद्र सरकारने चार वर्षांपूर्वी न्यायालयात सांगितले होते. तसेच रोहिंग्यांना पुन्हा म्यानमारमध्ये पाठविण्याचा निर्धार सरकारने व्यक्त केला होता.

leave a reply