देशातील ‘एफडीआय’ने 500 अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला

- साडेपाच वर्षात अडीचशे अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली

नवी दिल्ली – गेल्या वीस वर्षात भारताने थेट परकीय गुंतवणुकीचा (एफडीआय) 500 अब्ज डॉलर्सचा ऐतिहासित टप्पा ओलांडला आहे. भारतीय रुपयात सुमारे 37 लाख कोटी रुपये इतकी थेट परकीय गुंतवणूक खेचण्यात भारत यशस्वी ठरला आहे. विशेषत: 2015-16 सालानंतर भारतातील ‘एफडीआय’मध्ये मोठी उसळी दिसून आली आहे. गेल्या पाच वर्षापासून दरवर्षी 40 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त ‘एफडीआय’ भारतात येत आहे, तर 2019-20 या आर्थिक वर्षात 50 अब्ज डॉलर्सची थेट परकीय गुंतवणुक भारतात झाली होती. यावर्षात पहिल्या सहामाहितच 30 अब्ज डॉलर्सचा ‘एफडीआय’ भारतात आल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले होते.

‘डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्री ॲण्ड इंटर्नल ट्रेड’ने (डीपीआयआयटी) प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार 2000 सालच्या सप्टेंबरपासून 2020 पर्र्यत भारतात 500.12 अब्ज डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक झाली आहे. सर्वाधिक ‘एफडीआय’ मॉरिशसमधून भारतात आला आहे. मॉरेिशसच्या मार्गाने 29 टक्के इतका प्रचंड ‘एफडीआय’ भारतात आल्याचे ‘डीपीआयआयटी’ने जाहिर केलेल्या माहितीवरून स्पष्ट होते.

मॉरेिशसच्या पाठोपाठ 21 टक्के ‘एफडीआय’ सिंगापूरमधून, तसेच अमेरिका, जपान व नेदरलॅण्डमधून 7 टक्के आणि ब्रिटनमधून 6 टक्के ‘एफडीआय’ आला आहे. मॉरिशसमधून एकूण 144.71 अब्ज डॉलर्स, सिंगापूरमधून 106 अब्ज डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक झाल्याचा अहवाल आहे. याशिवाय जर्मन, सायप्रस, फ्रान्स, कॅमन आयलँण्डमधूनही मोठी गुंतवणूक झाली आहे.

2015-16 या आर्थिक वर्षापासून भारतात ‘एफडीआय’चा ओघ मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. 2015-16 सालात 40 अब्ज डॉलर्सचा ‘एफडीआय’ खेचण्यात भारत यशस्वी ठरला होता. याआधीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही गुंतवणूक तब्बल 35 टक्क्याने जास्त होती. त्यानंतर 2016-17 सालात 43.5 अब्ज डॉलर्स, 2017-18 सालात 44.85 अब्ज डॉलर्स, 2018-19 मध्ये 44.37 अब्ज डॉलर्स आणि 2019-20 या आर्थिक वर्षात 50 अब्ज डॉलर्स इतकी थेट परकीय गुंतवणूक भारतात झाली. यानुसार गेल्यातच 222 अब्ज डॉलर्स ‘एफडीआय’ भारतात आला आहे. तर यावर्षात पहिल्या सहा महिन्यात 30 अब्ज डॉलर्सची परकीय गुंतवणूक झाल्याने साडेपाच वर्षात 250 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त एफडीआय देशात आल्याचे स्पष्ट होते. सेवा क्षेत्र, कम्प्युटर सॉफ्टवेअर व हार्डवेअर, दूरसंचार, वाहन, बांधकाम उद्योग, रसायन, औषध निर्मिती उद्योगात सर्वाधिक गुंतवणूक झाली आहे.

1999 साली देशात फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट (फेमा) कायदा आणण्यात आला. जुनाट झालेल्या ‘फेरा’ कायद्याची जागा ‘फेमा’ ने घेतली. तेव्हापासूनच भारतात ‘एफडीआय’ची द्वारे खुली झाल्याचे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. गेल्या 20 वर्षात अर्धा ट्रिलियन डॉलर्स इतका ‘एफडीआय’ भारतात येणे ही गोष्ट भारताला परकीय गुंतवणुकदार मोठ्या प्रमाणावर पसंती देत असल्याचे अधोरेखित करते, असेही विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

leave a reply