नेपाळमध्ये ओली सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शने

काठमांडू – नेपाळचे सरकार भ्रष्ट आहे, कोरोनाव्हायरसविरोधी संघर्षात हे सरकार अपयशी ठरले आहे, आरोप करून नेपाळच्या जनतेने शनिवारी राजधानी काठमांडूमध्ये जोरदार निदर्शने केली. नेपाळमध्ये पुन्हा राजेशाही प्रस्थापित करा, नेपाळला हिंदू राष्ट्र घोषित करा, अशी मागणी निदर्शकांनी केली आहे.

2008 सालापर्यंत नेपाळमध्ये 240 वर्षांची परंपरा लाभलेली राजेशाही व्यवस्था होती. पण 2008 साली नेपाळच्या राजघराण्यात झालेल्या मोठ्या उलथापालथीनंतर या देशात राजेशाही संपुष्टात आणून लोकशाही प्रस्थापित करण्यात आली होती. गेल्या बारा वर्षांपासून नेपाळमध्ये लोकनियुक्त सरकार आहे. सध्या नेपाळमध्ये पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाल’ (युएफएल) तसेच पुष्प कमल दहल ऊर्फ प्रचंड यांच्या ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाल’ (माओईस्ट सेंटर) या पक्षांच्या आघाडीचे सरकार आहे. पंतप्रधान ओली यांचे सरकार भ्रष्ट असल्याचा आरोप नेपाळमधून होत आहे. ओली सरकारमध्येही अंतर्गत वाद असून कोरोनाव्हायरसच्या विरोधात पंतप्रधान अपयशी ठरल्याचा ठपका ठेवून शनिवारी राजधानी काठमांडूमध्ये मोठी निदर्शने काढण्यात आली. नेपाळच्या वेगवेगळ्या भागातून जमा झालेल्या या निदर्शनांमध्ये मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा केला जातो. पंतप्रधान ओली यांचे सरकार बरखास्त करा, नेपाळमध्ये पुन्हा राजेशाही प्रस्थापित करा, नेपाळला हिंदू राष्ट्र घोषित करा, अशा मागण्या यावेळी निदर्शकांनी केल्या.

‘नॅशनल सिव्हिक मुव्हमेंट कमिटी 2020’ या संघटनेने शनिवारच्या या निदर्शनांचे आयोजन केले होते. गेल्या महिन्यात चार वेळा राजेशाहीच्या समर्थनार्थ काठमांडूच्या वेगवेगळ्या भागात निदर्शने झाली होती व या निदर्शनांसाठी अनेक संघटना एकत्र आल्या होत्या. पण या निदर्शनांची तीव्रता फारच कमी होती. पण शनिवारी झालेल्या निदर्शनांची तीव्रता मोठी असल्याचे नेपाळच्या माध्यमांचे म्हणणे आहे.

leave a reply