येत्या चार महिन्यात कोरोनाच्या बळींची संख्या दुपटीने वाढेल

- अमेरिकी संशोधन संस्थेचा इशारा

वॉशिंग्टन – अमेरिकेसह जगभरात कोरोनाच्या साथीत बळी जाणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढू शकते, असा इशारा अमेरिकेतील संशोधन संस्थेने दिला आहे. ‘इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स ॲण्ड इव्हॅल्युएशन’ने(आयएचएमई) वर्तविलेल्या अंदाजानुसार, येत्या चार महिन्यात जगभरात कोरोनामुळे बळी पडणाऱ्यांची संख्या 30 लाखांवर जाण्याचा धोका आहे. कोरोनाची लस आल्यानंतरही बळींच्या संख्येत विशेष फरक पडणार नसल्याचा दावा ‘आयएचएमई’ने केला आहे.

अमेरिकेतील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीचा भाग असलेल्या ‘आयएचएमई’ने ‘कोविड-19 प्रोजेक्शन्स’ अंतर्गत तयार केलेल्या अहवालात बळींची संख्या वाढण्याबाबत अंदाज वर्तविला आहे. अहवाल तयार करताना सध्याची उपलब्ध आकडेवारी, चाचण्यांची स्थिती, लोकसंख्या, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन, मास्कचा वापर, दैनंदिन व्यवहार तसेच हॉस्पिटल्स व संबंधित आरोग्य सुविधा यासारखे घटक विचारात घेण्यात आले आहेत. विविध कंपन्यांनी जाहीर केलेल्या लसी व प्रमुख देशांनी व्यापक लसीकरणाबाबत दिलेले संकेत हे घटक देखील अंदाज वर्तविताना लक्षात घेतल्याची माहिती ‘आयएचएमई’कडून देण्यात आली आहे.

सध्या अमेरिकेत कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या दोन लाख 81 हजारांवर गेली आहे. तर जगभरात कोरोनामुळे दगावणाऱ्यांची संख्या 15 लाखांवर पोहोचली आहे. पुढील चार महिन्यात अमेरिकेतील बळींची संख्या पाच लाख 39 हजारांपर्यंत जाऊ शकते, असे ‘आयएचएमई’ने म्हटले आहे. तर जगभरातील बळींची संख्या 30 लाख 63 हजारांपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला आहे. लसीकरणाला व्यापक स्वरुपात सुरुवात झाल्यानंतरही त्याचे परिणाम दिसून येण्यास काही काळ जावा लागेल, ही बाब लक्षात घेऊन बळींबाबत अंदाज वर्तविण्यात आल्याची माहिती ‘आयएचएमई’ने दिली.

‘आयएचएमई’ने आपल्या अहवालात लसीकरणापेक्षा मास्कचा वापर कोरोनाच्या साथीची व्याप्ती कमी करण्यात अधिक फायदेशीर ठरु शकतो, असाही दावा केला आहे. जगातील अनेक देशांमध्ये कोरोना साथीची दुसरी लाट आल्याचे उघड झाले आहे. अमेरिका, युरोप, आशिया व आफ्रिका खंडातील बहुतांश देशांमध्ये साथीची दुसरी लाट सुरू झाली असून रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढताना दिसत आहे. या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेतील संस्थेने दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

leave a reply