देशाच्या व्यापारी मालाची निर्यात 70 टक्क्यांंनी वाढण्याचा अंदाज

मुंबई – देशातून होणार्‍या व्यापारी मालाच्या निर्यातीत 70 टक्के वाढीचा अंदाज एक्सपोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ इंडियाने (एक्झिम बँक) वर्तविला आहे. चालू असलेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ही वाढ होईल. या तिमाहीत एकूण माल निर्यात 87.2 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल, अशी शक्यता एक्झिम बँकेने व्यक्त केली आहे.

व्यापारी मालाची निर्यातकोरोनाच्या लाटेचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम जाणवत असला तरी भारतीय निर्यातीवर त्याचा परिणाम दिसून आलेला नाही. उलट गेल्यावर्षीच्या तुलनेत निर्यातीत मोठी वाढ झाली आहे. याचे प्रमुख कारण विकसित अर्थव्यवस्थाही आता कोरोनाच्या साथीतून सावरल्या असून त्यांच्या अर्थव्यवस्थेतही वाढ दिसून येत आहे. देशातील आयात व निर्यातदरांना अर्थिक सहाय्य करणार्‍या एक्झिम बँकेने आपल्या अहवालात ही बाब अधोरेखित केली आहे. गेल्या आर्थिक वर्षात एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत 51.3 अब्ज डॉलर्सच्या व्यापारी मालाची निर्यात करण्यात आली होती. तेच चालू आर्थिक वर्षात 87.2 अब्ज डॉलर्सची निर्यात अपेक्षित असल्याचे एक्झिम बँकेने म्हटले आहे.

एक्झिम बँकेकडून पहिल्या तिमाहीत व्यक्त करण्यात आलेला व्यापारी मालाच्या निर्यातीचा अंदाज गेल्यावर्षीच्या तुलनेत तब्बल 70.1 टक्क्यांनी जास्त आहे. एप्रिल व मे महिन्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रभाव जाणवला असला, तरी आता ही लाट ओसरत असून पुढील काळात निर्यातीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यात फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्सनी (एफपीआय) जूनच्या पहिल्या 11 दिवसात भारतीय भांडवली बाजारात तब्बल 13 हजार 424 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. कोरोनाची लाट ओसरत असल्याने भारतीय बाजारात तेजी दिसण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे एफपीआयकडून भारतातील शेअर बाजारात गुंतवणूक वाढल्याचे स्पष्ट दिसत आहे. एफपीआयनी 1 ते 11 जून दरम्यान 15 हजार 520 कोटी रुपये भारतीय शेअर बाजारात गुंतवले. मात्र याच काळात 2 हजार 96 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली. यानुसार 11 सत्रात निव्वळ 13 हजार 424 रुपयांची गुंतवणूक झाल्याचे स्पष्ट होते.

leave a reply