‘ओपेक’च्या बैठकीनंतर सौदी अरेबियाने दिलेल्या धक्क्याने इंधनाचे दर पाच टक्क्यांनी उसळले

व्हिएन्ना – इंधन उत्पादक देशांची संघटना ‘ओपेक’च्या दोन दिवस चाललेल्या बैठकीत कच्च्या तेलाचे उत्पादन स्थिर ठेवण्याबाबत एकमत झाले होते. मात्र बैठकीनंतर सौदी अरेबियाने आपण इंधन उत्पादनात प्रतिदिन १० लाख बॅरल्सची कपात करणार आहोत, अशी घोषणा करून खळबळ उडविली. सौदीचा हा निर्णय ‘ओपेक’सह आंतरराष्ट्रीय समुदायाला धक्का देणारा ठरला असून गेल्या २४ तासांमध्ये कच्च्या तेलाच्या दरांनी पाच टक्क्यांहून अधिक उसळी घेतली. कोरोनाच्या वाढत्या फैलावाच्या पार्श्‍वभूमीवर प्रमुख देशांमध्ये पुन्हा ‘लॉकडाऊन’ची घोषणा होत असून, या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय लक्ष वेधून घेणारा ठरतो.

चीनमधून सुरू झालेल्या कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे गेल्या वर्षाच्या सुरुवातीला जागतिक अर्थव्यवस्थेची गती मंदावली होती. अनेक देशांमध्ये ‘लॉकडाऊन’ची घोषणा करावी लागल्याने प्रमुख उद्योगांसह दैनंदिन व्यवहारही ठप्प झाले होते. याचा मोठा?फटका इंधनक्षेत्राला बसला होता. मार्च २०२०मध्ये कच्च्या तेलाचे दर २३ डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत खाली आले होते. आंतरराष्ट्रीय विश्‍लेषकांनी हे दर १० डॉलर्सपर्यंत कोसळू शकतात, असा इशाराही दिला होता.

मात्र काही महिन्यांपूर्वी अनेक देशांनी लॉकडाऊन उठवून दैनंदिन व्यवहार व उद्योगक्षेत्राला गती देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे कच्च्या तेलाच्या दरांमध्ये टप्प्याटप्प्याने वाढ होण्यास सुरुवात झाली होती. दर वाढावेत म्हणून उत्पादनात कपात करण्याचा प्रस्ताव सौदी अरेबिया व ‘ओपेक’च्या काही सदस्यांनी मांडला होता. मात्र त्याला रशिया व इतर सदस्य देशांनी विरोध केल्याने दरांमध्ये मोठी वाढ दिसून आली नव्हती. त्यामुळे इंधनावर अवलंबून असणार्‍या देशांच्या अर्थव्यवस्थांना जबरदस्त फटके बसले होते.

गेल्या दोन महिन्यात कोरोनाची तीव्रता पुन्हा वाढत असल्याचे दिसू लागले असून युरोपिय देशांसह आशियाई देशांकडूनही पुन्हा ‘लॉकडाऊन’चे निर्णय घेण्यात आले आहेत. आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी कोरोनाची तिसरी लाट आल्याचे इशारेही देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे उद्योगक्षेत्रातील व्यवहार  काहा काळासाठी पुन्हा एकदा थंडावण्याचे संकेत मिळत आहेत. त्याचा थेट परिणाम इंधनाच्या मागणीवर होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे सोमवारी सुरू झालेली ‘ओपेक’ व रशियाची बैठक महत्त्वाची मानली जात होती.

इंधन उत्पादक देशांची संघटना ‘ओपेक’ व रशियामधील मतभेद पुन्हा एकदा तीव्र होत असल्याचे  गेल्या काही महिन्यात दिसून आले होते. मागणी घटण्याचे संकेत असताना, इंधनाचे उत्पादन कमी करण्याचा प्रस्ताव ओपेकेचे नेतृत्त्व करणार्‍या सौदी अरेबिया व इतर देशांनी दिला होता. पण रशियाने हा इशारा धुडकावला होता. काही वर्षांपूर्वी रशियाने सौदीकडे अशीच मागणी करून इंधनाचे दर घसरलेले असताना उत्पादन कमी करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यावेळी सौदीने तो प्रस्ताव झिडकारला होता. आता रशिया सौदी व ओपेकचा प्रस्ताव धुडकावून त्याला उत्तर देत असल्याचे दिसत आहे.

या पार्श्‍वभूमीवर, मंगळवारी झालेले निर्णय व त्यानंतर सौदीने दिलेला धक्का ही महत्त्वाची घटना ठरते.  मंगळवारी ओपेक व रशियाच्या बैठकीत, सध्या असलेली कपात फेब्रुवारी महिन्यात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेतानाच रशिया व कझाकस्तान या दोन देशांना फेब्रुवारी व मार्च या दोन्ही महिन्यात प्रतिदिन ७५ हजार बॅरल्सची वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मार्च महिन्यात ‘ओपेक’चे सदस्य देशही उत्पादनात वाढ करणार आहेत. या निर्णयानंतर सौदी अरेबियाने अचानक आपण फेब्रुवारी व मार्च या दोन्ही महिन्यात प्रतिदिन १० लाख बॅरल्सची कपात करणार असल्याची घोषणा केली.

सौदीच्या या घोषणेनंतर २४ तासांमध्ये कच्च्या तेलाच्या दरांनी पाच टक्क्यांहून अधिक उसळी घेतली असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ५४ डॉलर्स प्रति बॅरलने व्यवहारांची नोंद झाली. अमेरिकेतील कच्च्या तेलाचे दरही ५० डॉलर्स प्रति बॅरलच्या वर गेले आहेत. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यानंतर प्रथमच इंधनाच्या दरांनी ५० डॉलर्सच्या वर उसळी घेण्यात यश मिळविले आहे.

leave a reply