टँकरवरील इराणच्या कारवाईनंतर दक्षिण कोरियाने पर्शियन आखातासाठी विनाशिका रवाना केली

पर्शियन आखातासाठी

सेऊल – इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनी पर्शियन आखातातून आपल्या टँकरचे अपहरण केल्यानंतर दक्षिण कोरियातून त्यावर प्रतिक्रिया आली आहे. दक्षिण कोरियाने पर्शियन आखाताासाठी चाचेगिरी विरोधी पथक रवाना केल्याचे या देशाच्या संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले. पण या चाचेगिरी पथकामध्ये दक्षिण कोरियाची विनाशिका व त्यात स्पेशल फोर्सेसच्या जवानांचा समावेश असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

पर्शियन आखातासाठी

सोमवारी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या गस्ती जहाजांनी सौदी अरेबियाच्या अल-जुबैल बंदरातून निघालेले दक्षिण कोरियाचे ‘हानकूक चेमी’ टँकर ताब्यात घेतले. सौदीतून संयुक्त अरब अमिरात असा प्रवास करणार्‍या या जहाजातून इथेनॉलची वाहतूक केली जात होती. पण दक्षिण कोरियन जहाजाने पर्यावरणाची हानी केल्याचा आरोप करून इराणने ही कारवाई केली. गेल्या चोवीस तासांपासून ‘हानकूक चेमी’ टँकर इराणच्या बंदार अब्बास बंदरात ओलीस धरले आहे. यामध्ये म्यानमार, व्हिएतनामच्या कर्मचार्‍यांचा समावेश असल्याचा दावा केला जातो.

पर्शियन आखातासाठी

इराणने आपल्या जहाजावर केलेल्या कारवाईबाबत दक्षिण कोरियाने भडक प्रतिक्रिया दिलेली नाही. पण दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने पर्शियन आखातासाठी चाचेगिरी विरोधी पथक रवाना करणार असल्याचे जाहीर केले. या व्यतिरिक्त दक्षिण कोरियाचे राजनैतिक अधिकारी देखील इराणला भेट देणार आहेत. अमेरिकी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण कोरियाने पर्शियन आखातासाठी ‘चोई याँग’ ही विनाशिका तसेच ‘चाँघाए युनिट’ या स्पेशल फोर्सेसचे जवान रवाना केल्याचे म्हटले आहे.

या पथकाने २०११ साली केलेल्या कारवाईत २१ सोमालियन चाचे ठार केले होते. त्यामुळे दक्षिण कोरियाने पर्शियन आखातासाठी रवाना केलेले चाचेगिरी पथक इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्ससाठी आव्हान असल्याचा दावा अमेरिकी वृत्तवाहिनी करीत आहे. दरम्यान, अमेरिकेच्या निर्बंधांमुळे इराणचा सात अब्ज डॉलर्सचा निधी दक्षिण कोरियाच्या बँकांमध्ये गोठीत आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या इराणने हा निधी मिळविण्यासाठी दक्षिण कोरियन टँकरचे अपहरण केल्याचा दावा केला जातो. पण सदर अपहरणामागे इराणचे वेगळेच हेतू असल्याचेही बोलले जाते.

leave a reply