कच्च्या तेलाचे दर 100 डॉलर्स प्रति बॅरलवर जातील

- आंतरराष्ट्रीय इंधन कंपन्यांच्या सीईओंचा दावा

दोहा- आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दरात वाढ होऊन, लवकरच हे दर 100 डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत पोहोचतील, असा दावा आंतरराष्ट्रीय स्तरावरील बड्या इंधन कंपन्यांच्या सीईओंनी केला. गुंतवणूकीच्या अभावामुळे इंधनाच्या दरात वाढ होईल, असे या वरिष्ठ अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. गेल्या दोन दिवसांपासून इंधनाच्या दरात पहायला मिळालेल्या वृद्धीमुळे इंधन कंपन्या सुखावल्याचा दावा केला जातो. तर बुधवारी अमेरिकेच्या इंधन साठ्यात घसरण झाल्याच्या बातमीचा परिणाम कच्च्या तेलाच्या दरावर झाल्याचे आंतरराष्ट्रीय माध्यमांचे म्हणणे आहे.

कच्च्या तेलाचे दर 100 डॉलर्स प्रति बॅरलवर जातील - आंतरराष्ट्रीय इंधन कंपन्यांच्या सीईओंचा दावायेत्या वर्षअखेरीपर्यंत कच्च्या तेलाचे दर शंभर डॉलर्सवर पोहोचतील, असा दावा अमेरिकी विश्‍लेषकाने साधारण दहा दिवसांपूर्वी केला होता. वर्षाच्या दुसर्‍या सत्रात आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाची मागणी वाढली आणि कोरोनाची चौथी लाट टळली, तर ही गणिते जुळतील, असे या विश्‍लेषकाने म्हटले होते. यासाठी जगभरातील प्रमुख देशांची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येणे आणि कच्च्या तेलाची मागणी प्रतिदिन 10 कोटी बॅरल्सपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे या विश्‍लेषकाने सांगितले होते. न्यूयॉर्क आणि इतर ट्रेडिंग हब्समध्ये या किंमतीवर सट्टेबाजारांनी करारांची खरेदी सुरू केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

कतार येथे सुरू असलेल्या इकोनॉमिक फोरमच्या बैठकीत रॉयल डच शेल आणि टोटल इनर्जीज् या इंधनक्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांनी देखील कच्च्या तेलाचे दर शंभर डॉलर्सपर्यंत जातील, असा विश्‍वास व्यक्त केला. या क्षेत्रातील गुंतवणूक कमी झाल्यामुळे ही वाढ दिसेल, असे एक्सॉन मोबिल कंपनीचे सीईओ डॅरेन वुड्स यांनी सांगितले. पण ही दरवाढ अल्पकाळासाठी असेल. गोल्डमन सॅच्स, बँक ऑफ अमेरिकाचे वरिष्ठ अधिकारी देखील 100 डॉलर्स प्रति बॅरलची हमी देत आहेत.

कच्च्या तेलाचे दर 100 डॉलर्स प्रति बॅरलवर जातील - आंतरराष्ट्रीय इंधन कंपन्यांच्या सीईओंचा दावाअमेरिका आणि युरोपमधील अर्थव्यवस्था, बाजारपेठा पुन्हा खुल्या होत आहेत. याचा सकारात्मक परिणाम म्हणून इंधनाच्या दरात वाढ दिसेल. पण ही वाढ फार काळ टिकणार नाही. आपण सध्या नित्याच्या अस्थिरतेवर असल्याचा दावा टोटल एनर्जीज्चे सीईओ पॅट्रिक पोयेन यांनी केला. पण या अस्थिरतेमागील नेमके कारण पोयेन यांनी स्पष्ट केले नाही.

गेल्या दोन दिवसांपासून कच्च्या तेलाच्या प्रति बॅरल दरात दीड डॉलर्सची वाढ झाली आहे. रविवारी 20 जून रोजी मध्यरात्रीपर्यंत अमेरिकन बाजारातील कच्च्या तेलाचे दर 71.82 डॉलर्सवर होते. तर बुधवारी हेच दर 73.64 डॉलर्सवर पोहोचले. 2018 सालानंतर पहिल्यांदा कच्च्या तेलाच्या दरात एवढी वाढ झाल्याचा दावा अमेरिकेतील विश्‍लेषक व पाश्‍चिमात्य माध्यमे करीत आहेत.

दरम्यान, अमेरिकेचे बायडेन प्रशासन इराणवरील इंधनविषयक निर्बंध शिथिल करण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या येत आहेत. असे झाले तर आंतरराष्ट्रीय बाजारातील इराणच्या इंधनाची मागणी वाढेल व असे झाले तर त्याचा थेट परिणाम इंधनाच्या दरावर होईल. इराणने सहा कोटी, 90 लाख बॅरेल्स इंधनाचा साठा करून ठेवला आहे. बायडेन प्रशासनाने निर्बंध मागे घेतल्यावर हा साठा खरेदीदारांसाठी रवाना करण्याची तयारी इराणने ठेवल्याच्या बातम्या आल्या होत्या.

leave a reply