फिलिपाईन्सच्या हद्दीतील सागरी गस्त थांबणार नाही

- फिलिपाईनसच्या राष्ट्राध्यक्षांनी चीनला सुनावले

मनिला/बीजिंग – ‘फिलिपाईन्स आपल्या सागरी क्षेत्राच्या सार्वभौमत्वाशी तडजोड करू शकत नाही. म्हणूनच या क्षेत्रातील फिलिपाईन्सच्या नौदल आणि तटरक्षकदलाची गस्त थांबणार नाही’, अशा स्पष्ट शब्दात फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुअर्ते यांनी चीनला सुनावले. गेल्या काही दिवसांपासून फिलिपाईन्सने या सागरी क्षेत्रात गस्त सुरू करून येथे सरावाचे आयोजन केले आहे. यावर संताप व्यक्त करून चीनने फिलिपाईन्सला सागरी हालचाली रोखण्याची सूचना केली होती. पण फिलिपाईन्सच्या नौदलाने आपल्या हद्दीत काय करायचे, हे चीनने सांगायची गरज नाही, असे फिलिपाईन्सच्या संरक्षण मंत्रालयाने फटकारले आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून ‘वेस्ट फिलिपाईन्स सी’च्या क्षेत्रात तैनात असलेल्या २०० हून अधिक मिलिशिया जहाजांना माघारी घेण्यास चीनने स्पष्ट नकार दिला आहे. मिलिशिया जहाजांची या क्षेत्रातील तैनाती योग्य असल्याचा दावा चीन करीत आहे. याउलट फिलिपाईन्सने चीनच्या सार्वभौमत्वाचा आणि अधिकारांचा आदर करावा व या क्षेत्रातील हालचाली बंद कराव्या, अशी सूचना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वँग वेंबिन यांनी केली होती.

वेस्ट फिलिपाईन्सच्या क्षेत्रातील स्प्रार्ट्ले, पाग-असा आणि स्कारबोरो या द्विपसमुहांवर देखील चीनचा अधिकार असल्याचा दावा वँग यांनी अमेरिकी वृत्तवाहिनीशी बोलताना केला होता. पण सदर द्विपसमुह आपल्या हद्दीत असल्याचे सांगून फिलिपाईन्सच्या संरक्षण मंत्रालयाने चीनवर टीका केली होती.

२०१६ साली आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार, सदर सागरी क्षेत्रावर फिलिपाईन्सचा अधिकार आहे व चीनने आमच्या सागरी क्षेत्रात कृत्रिम बेटांचे बांधकाम सुरू केल्याची आठवण फिलिपाईन्स करून देत आहे. त्यामुळे फिलिपाईन्सने स्वत:च्या हक्काच्या सागरी क्षेत्रात काय करायचे, याच्याशी चीनचे घेणेदेणे नाही, अशा परखड शब्दात फिलिपाईन्सच्या संरक्षण मंत्रालयाने चीनला फटकारले होते.

राष्ट्राध्यक्ष दुअर्ते यांनी देखील फिलिपाईन्सच्या नौदल आणि तटरक्षक दलाने सुरू केलेली सागरी गस्त थांबणार नसल्याचे ठणकावले. ‘व्यापारी तसेच कोरोनाच्या काळात चीनने केलेल्या सहकार्यासाठी फिलिपाईन्स ऋणी आहे. पण म्हणून फिलिपाईन्स आपल्या सागरी क्षेत्राच्या सार्वभौमत्वाशी सौदा करू शकत नाही. आम्हाला चीनबरोबर वाद नको आणि युद्धही नको. पण फिलिपाईन्स या क्षेत्रातून माघारही घेणार नाही’, असे राष्ट्राध्यक्ष दुअर्ते यांनी बजावले.

काही दिवसांपूर्वीच राष्ट्राध्यक्ष दुअर्ते यांनी सागरी सार्वभौमत्वाच्या सुरक्षेसाठी, चीनने बळकावलेले सागरी क्षेत्र परत मिळविण्यासाठी रक्तरंजित युद्धाखेरीज पर्याय नसल्याची घोषणा केली होती. त्याचबरोबर आपल्या सागरी क्षेत्राच्या सार्वभौमत्वाच्या सुरक्षेसाठी अमेरिकेचे लष्करी सहाय्य घेण्याचे संकेतही राष्ट्राध्यक्ष दुअर्ते यांनी दिले होते. त्यानंतर अमेरिकेच्या युद्धनौकांनी फिलिपाईन्सला भेट दिली होती.

leave a reply